Prayagraj Maghamela Influencers Arrested : साधूसंतांची प्रतिमा मलिन करणारे व्हिडिओ बनवणार्‍या २ इन्फ्लूएन्सर्सना अटक

प्रयागराज माघमेळा !

(‘इन्फ्लूएन्सर्स’ म्हणजे विविध सामाजिक माध्यमांवरून लोकांना प्रभावित करणारे)

अटक केलेले इन्फ्लूएन्सर्स प्रदीप साहू आणि चंदन कुमार

प्रयागराज (उत्तरप्रदेश) : येथे माघमेळा चालू होताच सामाजिक माध्यमांवर सक्रीय असलेले इन्फ्लूएन्सर्स व्हिडिओ बनवत आहेत. काही जण सकारात्मक आणि माहितीपूर्ण आशय प्रसारित करत आहेत; मात्र काही जण अधिक कमाईच्या लालसेपोटी दिशाभूल करणारे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करत आहेत. अशाच एका प्रकरणात सायबर पोलिसांनी साधूसंतांची अपकीर्ती करणारे व्हिडिओ प्रसारित करणार्‍या २ इन्फ्लूएन्सर्सना नुकतीच अटक केली.

सायबर पोलीस ठाण्याचे प्रमुख ओम नारायण गौतम यांनी सांगितले की,

१. सिकंदरा बहरिया येथील रहिवासी प्रदीप साहू याने बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील चंदन कुमार याच्या साहाय्याने माघमेळ्यातील साधूसंतांना अपकीर्त करणारा व्हिडिओ बनवला होता.

२. चंदन कुमार याने साधूसंतांमध्ये जाऊन टिळा लावण्याच्या बहाण्याने संवाद साधला. या चित्रफितीत असे दाखवण्यात आले की, प्रदीप साहू एका साधूला गायत्री मंत्र म्हणण्यास सांगतो, तेव्हा संबंधित साधू ते म्हणून शकत नाही. त्यानंतर तो त्या साधूजवळ ओळखपत्र मागतो; मात्र ते देण्यास साधू नकार देतो आणि नंतर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. माघमेळ्यातील साधूसंतांची प्रतिमा मलिन व्हावी, अशा पद्धतीने हे सर्व चित्रीकरण करण्यात आले होते.

३. पोलीस अधिकारी कुलदीप सिंह गुनावत यांच्या मते, प्रदीप साहू याने हा व्हिडिओ त्याच्या सामाजिक माध्यमावरील खात्यावरून प्रसारित केला. १ दिवसात हा व्हिडिओ ६० लाख दर्शकांनी पाहिला. ‘व्हिडिओ प्रचंड प्रमाणात प्रसारित झाल्यास स्वतःची लोकप्रियता वाढेल. तसे झाले, तर माघमेळ्याशी संबंधित तंबू, निवासस्थाने आणि इतर व्यावसायिक त्यांच्या विज्ञापनांसाठी बोलावतील आणि त्याद्वारे चांगली कमाई होईल, असे साहू याला वाटत होते’, असे गुनावत यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

स्वतःच्या स्वार्थासाठी साधू-संतांची प्रतिमा मलिन करणार्‍या अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! असे लोक कधी भ्रष्ट पाद्री किंवा मौलाना यांचे चित्रीकरण करून त्यांची प्रतिमा मलिन करतात का ?