सेवेची तळमळ आणि सकारात्मकतेने परिस्थिती स्वीकारून स्वत:मध्ये पालट करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री मेघा चव्हाण (वय ४३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

वाढदिवसाच्या दिवशीच जन्म-मृत्यूचा फेरा केला पार !

सुश्री मेघा चव्हाण (उजवीकडे) यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

रामनाथी (गोवा) : प्रत्येक जिवाला जन्माला घालण्यामागे ईश्वराचे दैवी नियोजन आणि संकल्प कार्यरत असतो. जीव या भूतलावर जन्माला येतो, ती त्याची जन्मतिथी ! जिवाच्या जन्मतिथीला, म्हणजेच तिथीनुसार वाढदिवसाला त्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असलेल्या ईश्वरी लहरी त्या जिवाला अधिक पोषक असतात. तिथीची स्पंदने त्या जिवाच्या स्पंदनांशी सर्वाधिक जुळणारी असतात. अशा मंगलदिनी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे, यापेक्षा आनंददायी वार्ता काय असू शकते ? रामनाथी आश्रमात एका सोहळ्याच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य साधकांना लाभले. शिस्तबद्धता, चिकाटी, गुरूंप्रती अपार श्रद्धा, सेवेची तळमळ, सकारात्मकतेने परिस्थिती स्वीकारून सतत आनंदी रहाणे, अशा गुणांमुळे आश्रमात राहून साधना करणार्‍या सुश्री मेघा चव्हाण (वय ४३ वर्षे) यांनी पौष कृष्ण द्वितीया या त्यांच्या तिथीनुसार असलेल्या वाढदिवसाला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका सत्संगाद्वारे घोषित करण्यात आली. या वेळी सुश्री मेघा यांचे वडील डॉ. निवृत्ती चव्हाण (‍आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७५ वर्षे), आई सौ. अंजना चव्हाण (‍आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे), भाऊ श्री. महेश, भावजय सौ. स्नेहल, बहीण सौ. मीनाक्षी हर्षे आणि भावोजी श्री. धनंजय हर्षे उपस्थित होते. यासह भ्रमणभाषवरून बहीण सौ. श्रद्धा निंबाळकर आणि तिचे पती श्री. सागर निंबाळकर यांनी या सत्संगाचा लाभ घेतला. सुश्री मेघा यांच्यासमवेत सेवा करणारे साधकही या मंगलप्रसंगी उपस्थित होते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सुश्री मेघा चव्हाण यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून सातत्याने सेवा करणे

मेघा आश्रमाला भेट देणार्‍या अतिथींच्या नियोजनाची सेवा करते. गेल्या काही वर्षांपासून रामनाथी आश्रम पहायला येणार्‍या अतिथींचा ओघ वाढत चालला आहे. अतिथी सेवा करतांना मेघाने ‘मला ही सेवा जमणार नाही, मी करू शकणार नाही’, असे सांगितल्याचे मला कधी आठवत नाही. सेवेत येणार्‍या अडचणींमुळे तिला ताण यायचा, तिचा संघर्ष व्हायचा, चिडचिडही व्हायची; पण तरीही ‘मला सेवा जमणार नाही’, असे न म्हणता तिने सातत्याने सेवा चालू ठेवली. वेगवेगळ्या परिस्थितीत, तसेच आजारपणात ‘सेवा कशी होणार ?’, अशी चिंता तिला नसते. मनातल्या मनात तिचा संघर्ष चालू असला, तरी तिने त्याचा सेवेवर परिणाम होऊ दिला नाही.

२. मनापासून सेवा करत रहाणे

मेघाची मोठी शस्त्रक्रिया झाली; पण त्या सर्व कालावधीत ती स्थिर होती. तिला त्याचा ताण अथवा काळजी असे काही नव्हते. तिने सहजतेने परिस्थिती स्वीकारली आणि त्याही परिस्थितीत सेवा करण्याचे तिचे प्रयत्न होते. आजारपण अथवा शस्त्रक्रिया झाली, तर तिला ‘स्वत:साठी इतरांकडून काही वेगळे अपेक्षित आहे’, असे कधीच तिच्या बोलण्यात अथवा कृतीत जाणवत नाही. अत्यावश्यक गोष्टी, पथ्य-पाणी हे सर्व ती सहजतेने करते. ती दुसर्‍यांना भासवू देत नाही की तिला त्रास होत आहे. खरेतर ती पुष्कळ वेळ बसू शकत नाही. अशा स्थितीतच ती अतिथींचे नियोजन करण्याची सेवा करते. एका ठिकाणी बसून करण्यासारखी ही सेवा नाही. अतिथी आल्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन समन्वयाची सेवा करावी लागते. धावपळही करावी लागते. ही सेवा तिने अगदी मनापासून केली.

३. अन्यांचे साहाय्य घेऊन, स्वत:मध्ये पालट करून अडथळ्यांवर मात करणे

‘अडचणी न मांडणे’, ‘त्या त्या वेळी विचारून न घेणे’, हे तिचे अडथळे होते. त्यामुळे सेवेतील अडचणी वाढायच्या. याविषयी मी तिला मध्ये-मध्ये सांगायचे. गेल्या काही कालावधीपासून तिने चांगले प्रयत्न करून स्वत:मध्ये पालट करण्यासाठी धडपड केली. सुप्रियाताई (सौ. सुप्रिया माथूर), तसेच मेघा हिच्या सहसाधिका यांनी मेघाला पुष्कळ साहाय्य केले. त्यांचे साहाय्य आणि स्वत:चे प्रयत्न यांमुळे आज ती हा टप्पा गाठू शकली.

सुश्री मेघा चव्हाण यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आलेली आनंदाची अनुभूती !

सुश्री मेघा यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामागे ईश्वराचे नियोजन असल्याची साक्ष देतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘सुश्री मेघा हिच्या कार्यक्रमाचे नियोजन करतांना, नियोजनासंदर्भात बोलतांना आदल्या दिवसापासूनच पुष्कळ आनंद जाणवत होता. मनात आनंद, वातावरणात आनंद, सर्वत्र आनंद होता. ‘तिची आध्यात्मिक पातळी घोषित होणार; म्हणून तत्त्वालाच पुष्कळ आनंद होत आहे. त्यामुळेच तो आनंद सर्वत्र प्रसारित होत आहे’, असे वाटत होते.’’

अशी झाली आनंदवार्तेची  घोषणा !

५ जानेवारी २०२६ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांचा साधनेसंदर्भात सत्संग घेतला. सेवा करतांना साधनेच्या दृष्टीने साधक कसे प्रयत्न करत आहेत ? याविषयी त्यांनी साधकांकडून जाणून घेतले. सेवा करतांना साधकांमध्ये साधनेच्या प्रयत्नांमुळे काय परिवर्तन होत आहे ? हे साधकांनी या प्रसंगी सांगितले. या वेळी सुश्री मेघा यांच्यामध्येही या कालावधीमध्ये पुष्कळ परिवर्तन झाल्याचे साधकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. विशेष म्हणजे याच दिवशी सुश्री मेघा यांचा वाढदिवसही होता. सत्संगाच्या शेवटी सुश्री मेघा यांना वाढदिवसाचे शुभेच्छापत्र देण्याचे निमित्त करून त्या शुभेच्छापत्रातूनच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सुश्री मेघा यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर सुश्री मेघा चव्हाण यांनी व्यक्त केलेले मनोगत !

सुश्री मेघा चव्हाण

या मंगलप्रसंगी सुश्री मेघा म्हणाल्या, ‘‘पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी पुन्हा कधी हा टप्पा गाठू शकीन, असे वाटले नव्हते. पुन्हा गाठायला हवे, असे आधी मला काही काळ वाटायचे; पण ‘माझ्याकडून गुरूंना अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत’, याविषयी मनाच्या कोपर्‍यात सल होती; पण त्यानंतर काही कालावधीपासून ‘देवानेच ती सल नाहीशी केली’, असे मी अनुभवले. देवाने सांगितल्याप्रमाणे प्रयत्नरत रहायचे आहे, असाच विचार होता.’’

त्या पुढे म्हणाल्या की, ‘शस्त्रक्रिया झाली, तरी आपण सेवारत राहू शकतो’, अशी अनेक उदाहरणे पाहिली. ‘इतरांनी त्या परिस्थितीत कसे प्रयत्न केले’, हे आठवले. यातून मला उत्साह आणि प्रेरणा मिळाली. त्यामुळे माझ्या शस्त्रक्रियेच्या वेळी आणि वेगवेगळ्या परिस्थितीत तसे प्रयत्न करता आले. (वर्ष २०२४ मध्ये सुश्री मेघा यांची एक मोठी शस्त्रक्रिया झाली होती.)

सुश्री मेघा म्हणाल्या, ‘‘देवाच्या कृपेने मला साधनेत पुष्कळ अनुकूलता लाभली आहे. गुरूंचा सत्संग, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंचा सत्संग, तसे कुटुंबियांचे साहाय्य मला किती सहजतेने मिळत आहे, असे पहाण्यास आरंभ केला. अनेकांना अशी अनुकूलता मिळत नाही; पण माझ्या मनात परिस्थितीविषयी नकारात्मकता होती. विचारांना दिशा नव्हती. आता सौ. सुप्रिया माथूर, तसेच सहसाधक यांच्याशी बोलून मला ती दिशा मिळाली. त्यामुळेच मी आज या टप्प्याला पुन्हा पोचू शकले.’’

(टीप : काही वर्षांपूर्वी सुश्री मेघा चव्हाण यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती; पण काही कारणाने ती अल्प झाली होती. आता पुन्हा त्यांनी ६१ टक्के पातळी गाठली आहे. – संकलक)

सुश्री मेघा यांच्या आध्यात्मिक प्रगतीचे रहस्य उलगडणारे शुभेच्छापत्र !

सुश्री मेघा चव्हाण

नभात मेघ दाटती, मग वर्षती जलधारांच्या सरी ।
तैसे भाव दाटता मनी, अश्रूरूपे वर्षती नयनांतूनी ।।

गुरुकृपेचे मेघ बरसती आज भूवैकुंठरूपी रामनाथीवरी ।
कोसळती सर-सर धारा आनंदाच्या त्यातूनी आम्हावरी ।।

त्या आनंद सरी देती आध्यात्मिक उन्नतीची वार्ता मेघाच्या ।
६१ टक्के पातळी गाठून फेर्‍यांतून मुक्त झाली ती जन्म-मरणाच्या ।।

आनंदधारांत त्या सारे वैकुंठजन चिंब भिजती ।
मने सार्‍यांची कृतज्ञभावे गुरुचरणी लीन होती ।।

कुटुंबियांनी सुश्री मेघा चव्हाण यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

  • सौ. अंजना चव्हाण (‍आई, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे) – मला मेघामध्ये पालट जाणवत होता. ‘आज तिच्या वाढदिवसानिमित्त आनंदवार्ता मिळणार’, असे वाटत होते. गुरुदेवांनीच तो आनंद दिला.
  • डॉ. निवृत्ती चव्हाण (‍वडील, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७५ वर्षे) – आमच्या परिवारात ६१ टक्के पातळी गाठणारी मेघा सर्वांत पहिली होती. तिला ६ महिने गुरुदेवांचा सहवास मिळाला. त्यानंतर पुढील शिक्षण न घेता तिने पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय केला. तिच्या साधनेत चढ-उतार आले; पण आज तिने पुन्हा प्रगती केली. अशीच जोमाने प्रयत्न कर. गुरुदेवांना शरण जा. साधकांचे साहाय्य घे आणि संतपद गाठ, हीच गुरुचरणी प्रार्थना !
  • श्री. महेश चव्हाण (भाऊ) – आधी तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती, नंतर घसरली होती, तेव्हा ते स्वीकारणे तिच्या मनाला जड गेले होते; पण तिने त्यावर मात करून पुन्हा प्रयत्न चालू केले. ‘कुटुंबात आमच्यापेक्षा तीच साधनेत पुढे आहे’, असे वाटत होते. देवाने आम्हाला पुष्कळ छान भेट दिली. हे व्यक्त करता येत नाही, इतका आनंद झाला.
  • सौ. स्नेहल चव्हाण (भावजय) – मेघाताईंच्या मनाची निर्मळता तिच्या डोळ्यांत पण जाणवते. पूर्वी तिच्याशी बोलण्यास दडपण यायचे; पण आता तिच्याशी सहजतेने बोलता येते. ती परिस्थिती समजून घेऊन योग्य प्रकारे हाताळते. तिचा आधार वाटतो. तिच्याशी बोलावेसे वाटते.
  • सौ. मीनाक्षी हर्षे (बहीण) – आज सकाळी मेघाच्या खोलीत तिला भेटायला गेले, तेव्हा तिने सांगितले की, आज आम्हा साधकांसाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंचा सत्संग आहे. तेव्हाच मनात ‘मेघाची प्रगती झाली असेल’, असे वाटत होते; म्हणून ‘आपल्यालाही त्या सत्संगाला बोलावतील का ?’, याची मी वाट पहात होते. नंतर ‘आजच तिच्या आध्यात्मिक उन्नतीची घोषणा होईल’, असे वाटले नव्हते. ‘आपल्या कुटुंबातील एका सदस्याची प्रगती झाली’, याचा अनपेक्षित आनंद आज गुरुदेवांनी दिला.
  • सौ. श्रद्धा निंबाळकर (बहीण) – वर्ष २००१ मध्ये कोल्हापूर येथे असतांना गुरुदेवांनी आम्हा तिघी बहिणींचे ‘रिडिंग’ (सूक्ष्मातून अभ्यास) घेतले. तेव्हा माझे आध्यात्मिक त्रासामुळे नकारात्मक, मीनाक्षीताईचे सकारात्मक आणि मेघाचे अधिक सकारात्मक ‘रिडिंग’ होते. ‘पूर्वजन्मीच्या साधनेमुळे ती लवकर प्रगती करेल’, असे गुरुदेव म्हणाले होते. पुढे वर्ष २०११ मध्ये तिची पातळी ६१ टक्के घोषित करण्यात आली होती. नंतर तिची पातळी कमी झाली; पण या वर्षभरात तिच्यामध्ये चांगले पालट होत असल्याचे जाणवत होते आणि आज ती वेळ आली.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक