संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज : अन्य विद्या शाखांमधील माहिती मराठीत आणण्यासाठी विविध विद्यांमध्ये प्राविण्यप्राप्त मराठीजनांसाठी एक आदर्श उदाहरण !

सातारा येथे चालू असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हा विषय समोर आला की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांचे योगदान मनात आल्याखेरीज रहात नाही, तसेच या भाषेचा विकास हाही विचार मनात येतोच. या संतांचे योगदान आपल्याला अध्यात्म सोडून भाषेच्या अन्य पैलूंच्या विकासासाठीही प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरू शकते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज

१. ज्ञानप्राप्तीसाठी महत्त्वाची भाषा इंग्रजी आणि क्षेत्र म्हणजे विज्ञान !

नवनवीन विद्या शाखांची होत असलेली निर्मिती, तसेच आहे त्या विद्या शाखांमधील ज्ञानात पडत रहाणारी मोठी भर ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. महत्त्वाचे म्हणजे नवीन ज्ञानाचे विविध उपयोग सामान्य जनतेच्या सुविधांमध्ये, तसेच जीवनातील समस्यांविषयीची तिची समज यांत भर घालत असतात. या दृष्टीकोनातून विशेष नोंद घ्यायची भाषा स्वाभाविकच इंग्रजी असून विशेष लक्ष देण्याचे क्षेत्र, म्हणजे विज्ञान हेच असणार आहे.

डॉ. दुर्गेश सामंत

२. इंग्रजी भाषेतून विशिष्ट विद्याशाखेत प्राविण्यप्राप्त मराठीजनांचे दायित्व !

इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठी भाषेत आणणे, हा प्रयत्न पूर्वीपासून होत आला आहे. गेल्या दोन दशकांपासून इंग्रजी भाषेत उपलब्ध होणार्‍या माहितीमध्ये मुळातच मोठ्या प्रमाणात पुष्कळ वेगाने भर पडत आहे. ती माहिती मराठीत येण्याची गती मुळातच अल्प असल्याने या पार्श्वभूमीवर ती आणखी अल्प पडत आहे, असे वाटते. यावर उपाय, म्हणजे इंग्रजी भाषेत विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेऊन उत्तम स्थान प्राप्त केलेल्या मराठी माणसांनी अशा प्रकारचे साहित्य लिहिणारे साहित्यिक बनायला हवे. साहित्यिक, म्हणजे केवळ कविता, कथा, कादंबरी आदींचेच लेखन ही समजूत कधीच कालबाह्य बनली आहे.

३. पार्श्वभूमी

मध्यंतरी प्रस्तुत लेखकाने काही वैद्यकीय विषयांतर्गत इंग्रजीत प्रसिद्ध झालेले साहित्य मराठीत यायला हवे, या भूमिकेतून काही लेख लिहिले. हे लिखाण करतांना स्वत:ला काही समस्या जाणवल्या, तशा त्या इतरांनाही जाणवल्या असतील. हे करू इच्छिणार्‍या मराठी सुविद्यजनांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आदर्श ठेवावा.

‘ज्ञानेश्वरी’ हीच एक क्रांती !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. त्या काळात ती एक मोठी क्रांतीच होती. संस्कृतमध्येच उपलब्ध असणारा ‘गीतार्थ’ त्यांनी मराठीत आणला. यामुळे किती लोककल्याण झाले ? मराठी भाषेला काय मिळाले ? याचे मोजमापन करणे केवळ अशक्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘ज्ञानेश्वरी’तच आपल्या या कार्यासंबंधाने जे लिहिले आहे, त्यातून अन्य भाषेतून मराठीत ज्ञान आणण्यासाठी प्रयत्न करायला दिशा, प्रेरणा आणि साहाय्य मिळेल. ही सूत्रे अशी आहेत की, या सूत्रांचा उल्लेख करतांना अध्याय आणि ओवीचा क्रमांक यांचा उल्लेख केला आहे. ओवीचे आशयरूप आवश्यक तेवढे भाषांतर केले आहे.

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

४. मराठी भाषेची थोरवी समजून घ्यावी !

जेव्हा अन्य विद्या शाखांमधील ज्ञान मराठीत कसे मांडायचे ? असा प्रश्न पडतो, तेव्हा मनात कुठेतरी असे करायला आपल्या मराठीचीच स्वत:ची काही मर्यादा आहे की, काय ? असे वाटू शकते. हे पालटण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ते पहा.

(कंसातील आकडे ओवी क्रमांक असून त्या त्या ओवीचा संक्षेपात अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे.)

अ. असे मराठी शब्द वापरीन की, ती अमृतालाही पैज मारून दाखवील. (अध्याय ६, ओवी १४)

आ. श्रोते म्हणतात, महत्भाग्य आमचे ! काय ही सुंदर भाषा ! (अध्याय ६, ओवी १३२)

इ. ब्रह्मज्ञान ऐकण्याची इच्छा नसणार्‍यालाही ते ऐकण्याची इच्छा निर्माण करते, ही भाषेची थोरवी आहे. (अध्याय ६, ओवी १३५)

मराठीविषयी अशी दृष्टी ठेवून प्रयत्न करावेत. या सकारात्मकतेतून वाट नक्कीच सापडते. स्वभाषेविषयी अभिमान आपणच ठेवला नाही, तर अन्य कोण ठेवणार ? असा विचार मुळात असावा.

ई. सामान्यांना लाभ होणार, ही भूमिका केंद्रस्थानी असावी ! : ज्या हेतूने आपण ज्ञान मराठीत आणू, त्यातून सामान्यांना केवळ तात्कालिक नव्हे, तर दीर्घकालीन लाभ होत रहाणार आहे, हे लक्षात घ्यावे. संत ज्ञानेश्वर सांगतात, ‘गीतार्थाचा लाभ एकट्या अर्जुनालाच झाला आहे, असे का म्हणावे ? ‘गीतार्थ’ हा मराठी भाषेत आल्याने वाटेल त्याला सहज प्राप्त होण्याजोगा झाला आहे.’ (अध्याय ११, ओवी १४)

गीतार्थ सांगणारे ग्रंथ आजतागायत प्रसिद्ध होतच आहेत; परंतु त्यासह ‘ज्ञानेश्वरी’चीच थोरवी सांगणारे ग्रंथ असेही प्रसिद्ध होत आहे.

ज्ञानेश्वरीचे लिखाण करतांना ‘हा ग्रंथ शतकानुशतके मराठी मनावर इतके अधिराज्य करील’, असा विचार त्या वेळी कुणाच्या मनात आला असेल का ? तरी ग्रंथाचे लिखाण, मूळ दृष्टीच सामान्य माणूस केंद्रित असल्याने हे घडू शकले, हे त्याचे एक कारण तर नक्कीच असेल ना !

५. विषयावरील पकड महत्त्वाची !

आपण ज्या विद्येच्या शाखेत काम करतो, त्या विषयावर चांगली पकड असणे, हा मापदंड कुणालाही प्रयत्न करायला पुरेसा आहे. मराठी भाषाभिमानाला त्याची जोड मिळाली, तर कार्य सफल होणारच. असे असेल, तर नवीन मराठी शब्दांचाही त्यातून उगम होऊ शकतो. जे लिखाण होईल, त्यामुळे मराठीत काही भर पडेल, हे निश्चित. अन्य भाषेतील मूळ शब्दाविषयी चिंतन होऊन प्रत्येकाचा अर्थ सांगायचा, असे मनी धरले, तर अधिक चांगले !

संत ज्ञानेश्वर सांगतात, ‘ही मूळ कथा शांतरसाला धरून असली, तरी श्रृंगाररसापेक्षाही अधिक आकर्षक होईल, अशारीतीने मराठीमध्ये सांगेन. (अध्याय ११, ओवी ११५६) मूळ ग्रंथातील प्रत्येक शब्द स्पष्ट करून प्रत्येकाचा अर्थ आणि त्यातील भाव सांगेन. (अध्याय ११, ओवी ११६५)’

‘संत ज्ञानेश्वर महाराज यांचे उद्गार अहंकाराचे नाहीत, तर त्यांची गीतार्थावर जी पकड आहे, त्यांची गुरूंवर जी श्रद्धा आहे यामुळे आहेत’, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ! आपण ज्या विद्याशाखेत कार्यरत आहोत, त्या शाखेतील अनुभव, रूची यांच्यामुळे व्यक्तीची त्या ज्ञानावर पकड असतेच. त्यामुळे असलेला आत्मविश्वास नक्कीच साहाय्य करील.

६. विनम्रता आणि यशसापेक्ष अल्पसंतुष्टता

लेखन करतांना लेखकाची वृत्ती विनम्र असू देत. वाचणार्‍यांना लेखकाच्या मनातील तळमळीची जाणही कदाचित् नसेल, परिश्रमांचीही नसेल; परंतु काहींना तरी हे लिखाण लाभकारी ठरणार आहेच, याचे भान मात्र पक्के असू देत. संत ज्ञानेश्वर सांगतात…

अ. मी अजाणतेपणाने ओबडधोबड मराठीत गीतार्थ सांगितला. (अध्याय १५, ओवी ५९४)

आ. अरसिकाला शेवंतीच्या फुलात रस असणार नाही; परंतु भुंगा मात्र त्यातील मकरंद घेऊन जाईल. (अध्याय १५, ओवी ५९५)

इ. काही न्यून, चूक वाटले, तरी मी ते स्वीकारीन. (अध्याय १५, ओवी ५९६)

७. न्यूनगंड नको !

इंग्रजी भाषेत हे शास्त्र जसे सांगितले गेले आहे, त्याची सर याला म्हणजे मराठी रूपांतराला नाही, असे कुणी म्हणतीलच. असे म्हणणार्‍यांचे कदाचित् अगदी योग्यही असेल. याचे कारण मुळातच त्या विद्येचे शिक्षण घेतांना ती व्यक्ती इंग्रजीतूनच ते घेत असते. तिचे त्या विषयासंबंधीचे सारे आकलन इंग्रजीतून घडलेले असते. या पार्श्वभूमीवर येथे दिल्याप्रमाणे भाष्य होत असते. असे घडणार; म्हणून अन्य भाषेतील विद्या मराठीमध्ये आणणार्‍यांनी मागे हटू नये. यासंबंधी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार वास्तववादी आणि मननीय आहेत.

अ. राजहंसाचे चालणे उत्तम; म्हणून बाकीच्यांनी चालूच नये काय ? (अध्याय १८, ओवी १७१४)

आ. व्यासादिकांसारखे गीता सांगतात; म्हणून आम्ही आपल्या अल्पबुद्धीने त्याचे विवरण केले, तर चूक काय ? (अध्याय १८, ओवी १७१८)

इ. अरुण सूर्याजवळ म्हणून त्याला पहातो, तर मुंगीही पहात नाही काय ? (अध्याय १८, ओवी १७२०)

ई. गीतेचे ज्ञान मला सहज मिळाले, ते मी मराठीत सांगितले, तर त्यात आश्चर्य काय ? (अध्याय १८, ओवी ११३०)

भाषा पालटतांना मूळ साहित्यवस्तूच्या प्रतिपादनाला धक्का न लावता मूळ साहित्यापेक्षा अधिक विस्तारलेले आणि अधिक रसपूर्ण साहित्य निर्माण होणे यांचे ‘संपूर्ण ज्ञानेश्वरी’, हे एकमेव उदाहरण असेल. यातही एक गमक आहे, ते म्हणजे आवश्यकता आणि रचनात्मक क्षमता असेल, तर विस्ताराचे भय नकोच नको.

येथे एक महत्त्वाचे सूत्र, म्हणजे मी ‘ज्ञानेश्वरी’चा अभ्यास करणारा इयत्ता पहिलीतील विद्यार्थी आहे, तरी केवळ ज्ञानेश्वरी आणि मराठी भाषा यासंबंधीची आत्मीयता या बळावरच जे वाटले ते लिहिले. काही चुकत असल्यास क्षमा असावी.

८. विद्यमान आणि भविष्यकालीन स्थिती

जाता जाता… गेल्या काही वर्षांत मराठी भाषेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मिळालेल्यांची संख्या २५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत न्यूनतम होत आहे. त्यामुळे जेवढी वर्षे जातील, तेवढे अन्य भाषांतून मराठीत काही ज्ञान आणण्याचे हे प्रयत्न अधिक कठीण होत रहातील. त्याची कारणे द्यायची आवश्यकता नाही. मग मराठीतून वाचण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेने दिलेले भाषांतर हाच उपाय राहील. दुसर्‍या बाजूला हे शिक्षण इंग्रजी भाषेत मिळालेल्या मंडळींना ते ज्या विद्याशाखेत आहेत, ती सोडून अन्य विद्याशाखांमधील माहिती इंग्रजीतून संपादन करण्यामध्ये गती असेल, याची खात्री नाही; मात्र अशांचीही मातृभाषा मराठीच राहिल्याने अशी माहिती मराठीतून समजून घेणे तुलनेने सोपेच रहाणार आहे.

।। श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।।

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०२५)

संपादकीय भूमिका

अन्य भाषेतून मराठीत ज्ञान आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीची दिशा, प्रेरणा आणि साहाय्य ज्ञानेश्वरीतून मिळेल हे निश्चित !