काश्मिरी हिंदु समुदायाला संघटित करण्याचा निर्धार !

‘पनून कश्मीर’च्या वतीने ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन !

नवी देहली – ‘पनून कश्मीर’ (आपले काश्मीर) या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी कार्यरत संघटनेच्या वतीने एका राष्ट्रीय ऑनलाईन परिसंवादाचे (‘वेबिनार’चे) नुकतेच आयोजन करण्यात आले होते. देशाच्या विविध भागांत रहाणार्‍या विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या प्रमुख नेत्यांनी यात सहभाग घेतला. जम्मू-काश्मीर, देहली, नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम, मुंबई इत्यादी ठिकाणांहून काश्मिरी हिंदु नेत्यांचा यामध्ये सहभाग होता. काश्मिरी हिंदूंचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासह खोर्‍यातील मूळ रहिवासी म्हणून या समुदायाला संघटित ठेवणे, या २ महत्त्वाच्या पैलूंवर सदस्यांचे एकमत झाले.

उपस्थित काश्मिरी हिंदु नेते !

या परिसंवादामध्ये उत्पल कौल, वीरेंद्र रैना, अनुपम कौल, उपिंदर स्वरूप, उपिंदर कौल, कमल बागती, विजय हंडू, राजिंदर कौल, प्रदीप हंडू आणि आर्.के. धर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. काश्मिरी हिंदु असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते अश्‍वनी कुमार च्रुंगू हे विशेष अतिथी तथा वक्ते म्हणून उपस्थित होते.

परिसंवादात घेण्यात आलेले निर्णय !

१. भारत सरकारच्या स्तरावर विस्थापित हिंदूंना साहाय्यनिधीत वाढ करण्याच्या सूत्राचा पाठपुरावा करण्याचा निर्णय.

२. वर्ष २०२६ मध्ये काश्मिरी हिंदु तरुणांसाठी नोकर्‍या उपलब्ध करून देणे, हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असावे. याची मागणी करण्यात येणार.

३. काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित झाले. तथापि काश्मिरी हिंदूंच्या काश्मीर खोर्‍यातील पुनर्वसनासाठी प्रत्यक्षात अद्याप ठोस उपाययोजना काढण्यात आलेली नाही. काश्मीरमध्ये वांशिक नरसंहार आणि नरसंहार करणार्‍यांशी कोणत्याही तडजोडीचा प्रश्‍नच उद्भवत नाही. जे घडले, ते काश्मिरी हिंदू कधीही विसरणार नाहीत किंवा क्षमाही करणार नाहीत. काश्मीरमधील हिंदु समुदायाविरुद्ध झालेल्या नरसंहाराच्या कृत्यांसाठी ‘विशेष गुन्हे न्यायाधिकरण’ स्थापन करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. (यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आधीच नकार दिल्याने आता काश्मिरी हिंदूंसह भारतभरातील हिंदूंनी केंद्र सरकारवरच दबाव आणला पाहिजे ! – संपादक)