सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांनी सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू, वय ९० वर्षे) यांना जिज्ञासेने एक प्रश्न विचारला. तो प्रश्न आणि त्याचे पू. अनंत आठवले यांनी दिलेले उत्तर पुढे दिले आहे.

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांनी विचारलेला प्रश्न
तुम्ही तुमच्या काही लेखांमधून ‘मी’ म्हणजे देह, मन आणि बुद्धी नाही अन् ‘मी म्हणजे कोण ?’, याविषयी विश्लेषण केले होते; पण त्याप्रमाणे मला स्वतःकडे पहाता येत नाही. माझ्या मनात वेगवेगळे विचार सतत येत असतात. वाईट आठवणीसुद्धा येत रहातात. त्यामुळे माझ्या मनाची एकाग्रता साधत नाही, तसेच काही वेळा मला या विचारांचा त्रास होतो. यावर उपाय काय ?

पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजी
पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत.
पू. अनंत आठवले यांनी दिलेले उत्तर :
१. मनावर नियंत्रण ठेवणे न जमणे आणि भगवान् श्रीकृष्णांनी सांगितलेले उपाय
तुम्ही म्हणता ‘‘माझ्या मनात वेगवेगळे विचार सतत येत असतात. त्यामुळे माझ्या मनाची एकाग्रता साधत नाही, तसेच काही वेळा मला या विचारांचा त्रास होतो.’’ अर्जुनसुद्धा भगवान् श्रीकृष्णांना हेच म्हणाला होता-
चञ्चलं हि मन: कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्।। – गीता अध्याय ६ श्लोक ३४
अर्थ – हे कृष्ण, मन चंचल, बंडखोर, शक्तिवान् आणि ठाम असते. त्याचा निग्रह करणे मी वायूला पकडण्याइतकेच खूप कठीण मानतो.
ते मान्य करून भगवान् श्रीकृष्णांनी पुढीलप्रमाणे उपाय सांगितले –
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते।। – गीता अध्याय ६ श्लोक ३५
अर्थ – महाबाहू अर्जुना, मन निग्रह करण्यास खूप कठीण आणि चंचल आहे ह्यात शंकाच नाही. परंतु सरावाने आणि वैराग्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवता येते.
राग म्हणजे अनुराग, प्रीती, सुखदायक विषयांची अभिलाषा. अशा सुखांच्या आकर्षणाने त्यांना प्राप्त करण्यासाठी मनुष्य चांगली-वाईट कर्मे करत राहतो. अशा अभिलाषांना-आकर्षणांना सोडणे, भोगांमध्ये रुची न राहणे म्हणजे वैराग्य. हे जाणले तरी एका झटक्यात सुटत नाही म्हणून त्याचा सराव करावा लागतो.
२. अन्य उपायांची आवश्यकता
मनात सतत काही ना काही विचार येतच राहतात, जुन्या चांगल्या-वाईट आठवणी येतच राहतात. त्यांना थांबवता येत नाही. ईश्वरप्राप्ती करायची असेल किंवा मोक्ष मिळवायचा असेल, तर मनावर नियंत्रण मिळवावे लागेल आणि त्यासाठी भगवान् श्रीकृष्णांनी वर उत्तम उपाय सांगितलेला आहे. पण हा उपाय करणे अत्यंत कठीण आहे. पुराणांमध्ये आपण अनेक कथा वाचतो की थोर ऋषी-मुनींना, अगदी कठोर तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केलेल्या महात्म्यांनासुद्धा मनावर नियंत्रण शक्य झाले नाही. ते काही थोडे मनाविरुद्ध झाले तरी दुसर्यांना शाप देत असत. म्हणजे क्रोध इत्यादी मनाच्या विकारांवर त्यांना नियंत्रण मिळवता आले नाही, मग सामान्य मनुष्यांसाठी तर हे खूपच अवघड आहे. पूर्ण आयुष्य मनाला वश करण्यातच निघून जाईल, मग ईश्वरप्राप्तीचे प्रयत्न कधी करणार? तेव्हां, ह्या विषयावर काही वेगळे विचार करूया.
मन, बुद्धी आणि अहंकार हे तीन केवळ करण आहेत. आपण त्यांच्या अधीन व्हायचे नाही, तर त्यांना आपल्या अधीन ठेवायचे आहे. कसे ते पुढे पाहूया.
३. मन, बुद्धी आणि अहंकार
३ अ. मनाचे स्वरूप
आधी ‘मन’ म्हणजे काय, हे समजून घेऊया.
‘मन’शब्दाची व्याख्या : ‘सङ्कल्पविकल्पात्मकं मनः ।’ मनात सतत संकल्प, विकल्प येत रहातात, वेगवेगळे विचार येत राहतात. संकल्प-विकल्प, विचार, हेच मनाचे स्वरूप आहे.
३ अ १. मनाशी संबंधित उपाय
मन हे केवळ साधन असणे, साध्य नव्हे : आपल्या शरीरामध्ये तेरा साधन आहेत. त्यांनाच ‘करण’ असे म्हणतात. ‘करण’ म्हणजे कार्य करण्यासाठी लागणारे उपकरण, हत्यार. उदा. शेतीसाठी नांगर, कुदळ, घमेले इत्यादी करण आहेत. त्याप्रमाणे मनुष्याच्या शरीरात कार्य करण्यासाठी पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये, हे दहा बाह्य करण आहेत. त्या व्यतिरिक्त मन, बुद्धी आणि अहंकार हे तीन करण आंतरिक आहेत, त्यांना अंतःकरण म्हणतात. ह्या एकूण तेरा करणांच्या साहाय्याने आपण शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्रिया करतो. आपण आपले हात आणि पाय ह्यांचा अधिक विचार करत नाही. आपण उपयोगापुरता त्यांचा विचार करतो; पण आपण मनाला अधिक महत्त्व देतो. त्यामुळे त्याचा आपल्याला त्रास होतो. परंतु ही गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की मन तेरा करणांपैकी केवळ एक करण म्हणजे साधन आहे, साध्य नाही. मन हे ध्येय नाही, ईश्वरप्राप्ती हे ध्येय आहे. विचारांचीच चिंता करत राहिलो तर चिंतन कोणाचे होते ? मनाचे ! पण चिंतन व्हायला पाहिजे ईश्वराचे(ज्ञानमार्गात ब्रह्मानुसंधान) ! तेव्हां, मनात विचार येतच राहतील, त्यांना महत्त्व न देता त्यांची उपेक्षा करून चिंतन ईश्वराकडे वळवण्याने मनातील इतर विषयांचे महत्त्व कमी होत जाईल.
३ आ. बुद्धीचे स्वरूप
‘बुद्धी’शब्दाची व्याख्या : ‘निश्चयात्मिका बुद्धि:’ निश्चय करणे, निर्णय घेणे, हे बुद्धीचे स्वरूप आहे. मनातील विचारांवर काय योग्य किंवा अयोग्य ते आपण बुद्धीने ठरवतो, कोणते कर्म करायचे ते ठरवतो. म्हणजे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. भगवान् श्रीकृष्णांनी ‘मनसस्तु परा बुद्धि:’(गीता अध्याय ६ श्लोक ३५) म्हणजे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे.
३ आ १. बुद्धीने करण्याचा उपाय
मनात कोणतेही विचार येत राहोत, त्यांच्यावर योग्य काय ह्याचा निर्णय आपण बुद्धीने घ्यायचा आहे. मनातील विचार दाबण्याचा प्रयत्न केला तर ते अधिकच उफाळून वर येतात. तेव्हां बुद्धीने मनावर मात करून कोणतेही पाप लागेल असे अनुचित कर्म करायचे नाही. विचार मनात येत-जात राहू देत, बुद्धीच्या योग्य निर्णयावर ठाम राहायचे, मग मनातील विचारांनी कोणतीही हानी होणार नाही. जे विचार हानी करू शकणारच नाहीत, त्यांचे महत्त्वच काय ?
३ इ. अहंकार न बाळगण्याचा उपाय
अहंकार : अहंकार म्हणजे ईश्वरापासून किंवा ब्रह्मापासून आपल्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव. आपण जोपर्यंत जिवंत असतो, तोपर्यंत आपल्या अस्तित्वाची जाणीव राहते(ह्याला अपवाद ‘उन्मनी अवस्था’ हा आहे, ह्या अवस्थेत आपल्या अस्तित्वाचे भान राहत नाही). ह्या अहंकारातून कर्तृत्व, दातृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व इत्यादी अहंकार निर्माण होतात. अनेक वेळा ‘मी अमुक केले, मी तमुक केले, मी अमक्याला अशी मदत केली, मला दुसर्यापेक्षा अधिक कळते, मी साधना करतो’, असे अहंकाराचे विचार मनात येत राहतात. असे चुकीचे विचार सत्य जाणल्याने जातात. ‘मी केले’ असा अहंकार, कर्तृत्वाची भावना नसेल तर आपल्याला पुण्य-पाप लागत नाही, हा विषय पुढे ‘पुण्य-पाप’ मध्ये अधिक स्पष्ट केला आहे.
४. पुण्य आणि पाप कर्मांवर आधारित आहेत, विचारांवर नाही
आपले ध्येय पुनर्जन्म टाळून ईश्वरात विलीन होणे, हे आहे. आपल्या कर्मांमुळे पुण्य किंवा पाप लागते आणि त्याची फळे भोगावी लागतात. उरलेल्या पुण्य आणि पापांमुळे पुनर्जन्म घ्यावा लागतो. हे पुण्य-पाप टाळले तर मनात कोणतेही विचार येत राहिले तरी पुनर्जन्म होणारच नाही, म्हणून पुण्य-पाप कसे टाळायचे ते थोडक्यात पाहूया.
४ अ. मनात आलेल्या चांगल्या-वाईट विचारांप्रमाणे कृती केली, तरच त्याचे पुण्य किंवा पाप लागते ! : मनात केवळ वाईट विचार आल्याने त्याचे पाप लागत नाही. त्यामुळे त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. हे पटकन पटणार नाही, म्हणून दुसर्या बाजूने पाहूया. एखाद्याची दया येऊन ‘त्याला दान देऊया’, असा विचार आपण मनात केला, पण प्रत्यक्ष दान दिले नाही तर दानाचे पुण्य मिळेल का ? नाही. कारण आपल्या मनात परोपकार करण्याचा केवळ विचार आला आहे, परोपकार केला नाही. आपल्याकडून तशी कृती झालेली नाही. मग त्याचप्रमाणे मनात वाईट विचार केवळ आला, तर त्याचे पाप का लागेल ? लागणार नाही ! कारण तो केवळ विचार होता पण तशी कृती केली नाही. शास्त्रांमध्ये ‘कर्मफळ’ सांगितलेले आहे, ‘विचारफळ’नाही. म्हणून पाप कर्म करू नये, मग मनातील विचारांची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता मनात येणार्या अनिष्ट विचारांचे, वाईट आठवणींचे, अनावश्यक विचारांचे महत्त्वच किती आहे, हे स्पष्ट झाले असेल.
४ अ १. पाप : वाईट कर्म केले, तर पाप लागते. पाप कशा प्रकारच्या कर्माने लागते, ते थोडक्यात पाहूया.
१. ‘आत्मन: प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्।’
म्हणजे दुसरे आपल्याशी जसे वागलेले आपल्याला आवडणार नाही, तसे आपण दुसर्याशी वागू नये.
२. ‘अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ।
परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम् ।।’
म्हणजे व्यासांनी अठरा पुराणांमध्ये जे सांगितले आहे, त्याचे सार दोन-दोन शब्दांमध्ये सांगता येईल(परोपकार-पुण्य, परपीडन-पाप). दुसर्यावर उपकार(दुसर्याचे हित होईल असे कार्य) केला तर पुण्य, दुसर्याला त्रास दिला तर पाप. (हे ढोबळ मानाने सांगितलेले आहे. कर्म आणि पुण्य-पापाचा विषय खूपच गहन आहे. गीतेच्या चवथ्या अध्यायात सतराव्या श्लोकामध्ये भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे- ‘गहना कर्मणो गति:’ अर्थ-कर्माची गती खूप गहन आहे.)
४ अ २. पुण्य : पुण्य हे सत्कर्म असते, पण तेही बंधनकारक असते आणि पुनर्जन्माचे कारण बनते. चांगले कर्म करतांना कर्तृत्वाची भावना असेल, तर पुण्य लागते. ‘मी केले’ ही भावनाच नसेल, तर पुण्यही लागणार नाही. सत्कर्मसुद्धा फळाची इच्छा न धरता निष्कामतेने करायचे. पुण्यकर्म करणे चांगलेच पण त्याचे कर्तृत्व स्वत:कडे घ्यायचे नाही. अन्यथा त्याचे पुण्य आपल्याला लागेल आणि ते संचितात जाईल आणि पुनर्जन्माचे कारण बनेल. केलेल्या कर्माचा, कर्तृत्वाचा, अभिमान वाटू नये, ह्यासाठी भगवान् श्रीकृष्णांची शिकवण लक्षात ठेवायला हवी. ते म्हणतात की कोणतेही कर्म घडण्यासाठी पुढे सांगितलेली पाच कारणे असतात-
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।। – गीता अध्याय १८ श्लोक १४
अर्थ – आधार आणि कर्ता, वेगवेगळे करण म्हणजे साधन, अनेक प्रकारचे प्रयास (कर्म) आणि पाचवे कारण दैव हे असते.
हे स्पष्ट होण्यासाठी एक उदाहरण बघू. शेती करायची असेल तर शेतकरी हा कर्ता असतो, पण त्यासाठी शेत-भूमी हे अधिष्ठान लागते. त्याविना शेतकरी शेतीच करू शकणार नाही आणि ती माती-भूमी शेतकर्याने निर्माण केलेली नसते. नांगरणीसाठी नांगर लागतो, तसेच कुदळ, फावडे, घमेले लागतात. हे साधन म्हणजे करण झाले. पुढे पेरणी, खत घालणे, पाणी देणे, कीटनाशक फवारणे, तण काढणे इत्यादी प्रयत्न लागतात (हे चेष्टा म्हणजे प्रयास, कर्म आहेत). हे सर्व करूनही दैव अनुकूल असावे लागते. व्यवस्थित पाऊस झाला आणि कोणतीच अडचण आली नाही, तर पीक चांगले येते; पण योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस पडणे किंवा न पडणे, हे आपल्या हातात नसते. तसेच किडी लागणे, शेतात जनावरे घुसणे, टोळधाड, पिकांचे रोग इत्यादी घडू शकते. हे सर्व आपल्या हातात नाही तर दैवाच्या अधीन असते. हे लक्षात ठेवले, तर कर्तृत्वाचा अभिमान येणार नाही. असे असताना ‘मी उत्तम पीक घेतले’, असा अभिमान बाळगणे चुकीचे होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या किंवा पुण्यकारक कर्माचे कर्तृत्व केवळ आपले नाही, हा विचार राहिला तर पुण्यापासूनसुद्धा अलिप्त राहू.
भगवान् श्रीकृष्णांनी तेच पुढे सांगितले –
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु य:।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मति:।। – गीता अध्याय १८ श्लोक १६
अर्थ – असे असताना केवळ स्वत:ला कर्ता मानतो तो निर्बुद्ध, बुद्धी नीट घडलेली नसल्यामुळे योग्य जाणत नाही.
सर्व प्रकारच्या कर्तृत्वाचा अहंकार गेल्याने पुण्य-पापापासून अलिप्त झाल्याने मनातील विचारांना काहीच महत्त्व राहत नाही.
५. अन्य सामान्य उपाय मनातील विचारांऐवजी मनाला दुसर्या विचारांमध्ये गुंतवणे
मनात विचार तर येतच राहणार, पण अनावश्यक आणि अयोग्य विचारांऐवजी चांगले विचार येतील, असे करू शकतो.
अर्थपूर्ण सुमधुर भक्तीगीते ऐकण्याची आवड असेल तर ती ऐकावीत. ह्याने केवळ तेवढ्या वेळेपुरतेच नको असलेले विचार थांबतात असे नाही, तर नंतरसुद्धा गाण्याच्या ओळी, सात्विक विचार काही वेळ मनात घोळत राहतात.
वाचनात रुची असेल, तर भागवतपुराण, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत किंवा इतर आवडीचे अध्यात्मावरील लिखाण वाचल्याने त्यातील सूत्रांवर मन आपोआप विचार करू लागते.
ज्यांना गाता येते, ते तर भाग्यशाली आहेत! शांत बसून, साथीसाठी वाद्यांची चिंता न करता, श्रोत्यांचा विचार न करता, स्वत:साठी किंवा ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी मध्यम स्वरात आवडीचे भक्तीगीत गावे. गायक तन्मय होतो. गातांना आणि नंतरही दीर्घकाळ इतर विचार मनात येतच नाहीत.
इतरही काही कार्य ज्याने आपले मन दुसरीकडे लागेल असे करू शकतो.
६. मनाला स्वैर सोडू नये
आपण मन नाही, तर आत्मा आहोत. आत्मा ईश्वराचा अंश आहे. मनात विचार येणारच; पण त्यांच्यामध्ये अडकायचे नाही. आपल्या मनात वाईट विचार आले, तरी त्याप्रमाणे वागायचे नाही. ‘मनात वाईट विचार आले, तरी पाप लागत नाही’, असे सांगितले आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपल्या मनाला स्वैर सोडायचे. अन्यथा मनात सतत मलिन विचार राहिल्यास बुद्धी त्यानुसार वाईट विचारांनाच लक्षात घेऊन अयोग्य कार्य करण्याचा निर्णय घेऊन तशी कृती केली जाऊ शकते. मनाला महत्त्व द्यायचे नाही एवढेच.
टीप : मनातल्या विचारांना महत्त्व न देणे, हा शास्त्रसंमत उपाय आहे का, असा विचार एखाद्याला पडू शकतो. त्यावर अथर्ववेदातील मुण्डकोपनिषदामधील मुण्डक ३, खण्ड १, मन्त्र ३ पाहावा. सनातनने प्रकाशित केलेल्या ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचा बोध’ ह्या लघुग्रंथात ‘आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात’ ह्या लेखामध्येही उपनिषदातील तोच विषय स्पष्ट केला आहे. तिथे प्रतिपाद्य विषय वेगळा असल्याने शब्दरचना वेगळी असली तरी तात्पर्य तेच आहे.


देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !