India’s Sanskrit LLM : भारत बनवत आहे संस्कृत भाषेतील ‘चॅट जीपीटी’सारखे एआय तंत्रज्ञान !

  • तमिळनाडूतील ११९ वर्षांपासून कार्यरत एम्.डी.एस्. संस्कृत महाविद्यालयाने घेतला पुढाकार

  • १ लाख १० सहस्र संस्कृत पुस्तकांचा असणार अंतर्भाव

  • ‘संस्कृत लार्ज लँग्वेज मॉडल’ विकसित करणार

(एआय म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता)

चेन्नई (तमिळनाडू) – भारताचा गौरवशाली वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एक सुवर्ण संगम लवकरच पहायला मिळणार आहे. चेन्नईजवळ असलेल्या ११९ वर्षांपासून कार्यरत मैलापूर येथील ‘एम्.डी.एस्. संस्कृत महाविद्यालया’च्या नेतृत्वाखाली भारत आता स्वदेशी ‘संस्कृत लार्ज लँग्वेज मॉडल’ विकसित करत आहे. अतीमहत्त्वाकांक्षी; परंतु धर्मप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या प्रकल्पाच्या अंतर्गत तब्बल १ लाख १० सहस्रांहून अधिक संस्कृत ग्रंथांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये दुर्मिळ हस्तलिखिते आणि शास्त्रे यांचा समावेश आहे. ‘कुप्पुस्वामी शास्त्री संशोधन संस्थे’कडील साहित्यालाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. हा प्रकल्प केवळ भाषांतरापुरता मर्यादित नसून संस्कृत व्याकरण, तर्कशास्त्र आणि संरचना यांवर आधारित एक पूर्णतः स्वदेशी ‘एआय मॉडल’ असणार आहे. यातून संस्कृत ग्रंथांचे अचूक दाखले आणि त्यांचा अर्थ मिळू शकेल.

लार्ज लँग्वेज मॉडल काय आहे ?

लार्ज लँग्वेज मॉडल ही एक प्रकारची कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणाली आहे, जी इतर कामांसह लिखाण ओळखू शकते अथवा बनवूही शकते. या प्रणालीला प्रचंड मोठ्या मजकुराद्वारे तयार केले जाते. त्यामुळे याला ‘लार्ज’ ही संज्ञा आहे. ही संगणकीय प्रणाली बनवतांना शब्दांचे क्रम हाताळण्यासाठीही तिला प्रशिक्षित केले जाते. सोप्या भाषेत सांगायचे, तर ‘लार्ज लँग्वेज मॉडल’ ही एक संगणकीय प्रणाली आहे, ज्यामध्ये मानवी भाषा किंवा इतर प्रकारच्या जटिल मजकुराची (डेटा’ची) ओळख आणि अर्थ लावण्यासाठी पुरेशी उदाहरणे दिली जातात.)

प्रकल्पाची वैशिष्ट्ये !

१. अचूकता आणि वेग : महाविद्यालयाने स्वत: बनवलेल्या विशेष प्रणालीच्या (‘सॉफ्टवेअर’च्या) साहाय्याने ‘स्कॅन’ केलेली संस्कृत हस्तलिखिते ९७ टक्के अचूकतेसह डिजिटल स्वरूपात संरक्षित करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, एका प्रायोगिक चाचणीत केवळ २४ तासांत १ सहस्रांहून अधिक संस्कृत पुस्तकांचे ‘डिजिटायझेशन’ करण्यात आले. त्यात केवळ ३-४ टक्केच त्रुटी राहिल्या.

२. विद्वानांचे योगदान : केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून न रहाता प्रत्येक लिखाणाची पडताळणी संस्कृत विद्वानांकडून केली जात आहे, जेणेकरून माहितीची गुणवत्ता उच्च दर्जाची राहील.

३. तांत्रिक आव्हाने : संस्कृतमधील ‘संधी’, शब्दरचना आणि क्लिष्ट व्याकरण लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान बनवणे एक मोठे आव्हान आहे. यासाठी आयआयटी मद्रास, तसेच ‘नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी’ यांसारख्या प्रथितयश संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे.

या तंत्रज्ञानाचे हे आहे महत्त्व !

हा प्रकल्प ३ वर्षांचा असून पुढील २ वर्षांतच याचा वापर सर्वसामान्यांना करता येईल, असे सांगितले जात आहे. या उपक्रमामुळे भारताचे प्राचीन ज्ञान केवळ संग्रहालयापुरते मर्यादित न रहाता संगणकीय भाषेत जगभरात पोचण्यास साहाय्य होऊ शकणार आहे. ‘हा प्रकल्प म्हणजे केवळ तंत्रज्ञान नसून आपला सांस्कृतिक वारसा ‘एआय’च्या माध्यमातून भविष्यातील पिढ्यांकडे सोपवण्याचा एक प्रयत्न आहे’, असे महत्त्वपूर्ण मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

संपादकीय भूमिका

एम्.डी.एस्. संस्कृत महाविद्यालयाचे अभिनंदन करावे तेवढे थोडे ! सध्या भारतभरात सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे वहात असतांना अशा प्रकारचे भव्य-दिव्य प्रकल्प हाताशी घेणे अत्यंत आवश्यक आहेत. यासह अशा प्रकल्पांतून भारत आणि हिंदु विरोधी कथानकांच्या वैचारिक जाळ्यामध्ये अडकलेला मानव हिंदु धर्माचा वारसा अंगीकारून जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी पुढे सरसावेल, हे जाणा !