ख्रिस्ती नववर्षात आरोग्याच्या दृष्टीने प्रतिदिन करायच्या मोजक्या गोष्टी !

ख्रिस्ती वर्ष २०२६ च्या उंबरठ्यावर आपण सगळे उभे आहोत. दूषित हवा, पाणी आणि अन्न, म्हणजेच शरीर चांगले रहायला ज्या मूलभूत गरजा आहेत, त्याच बिघडल्या असल्याने सर्वांनी तब्येत चांगली रहाण्यासाठी विशेष काळजी अजून घेणे आवश्यक आहे. रुग्णांशी बोलतांना, तसेच स्वतःसुद्धा वयाने पुढे पुढे वाटचाल करत असतांना आपापल्या बुद्धी, मेंदू आणि ज्ञानेंद्रिये यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे आवर्जून वाटते.

आयुर्वेदानुसार दिनचर्या सांगतांना या सगळ्या गोष्टींची काळजी चांगल्या पद्धतीत घेतली आहे, हे वारंवार जाणवते. ख्रिस्ती नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त पुढील काही मोजक्या गोष्टी आपण प्रतिदिनच्या आयुष्यातील १० ते १५ मिनिटे काढून पालट करून चालू केल्या, तरी भरपूर लाभ दिसतील, हे निश्चित.

१. सकाळी उठल्यावर स्वतःच्या इष्टदेवतेचे स्मरण करून दिवसाचा प्रारंभ करावा, ही झाली मनाची काळजी. ‘Indulging oneself in higher realms’, म्हणजेच ‘आपल्यापेक्षा मोठ्या शक्तीला नमन करणे’, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे मेंदूमधील विशिष्ट भाग उत्तेजित करून मेंदूवर चांगले परिणाम करते. यावर ‘न्यूरोथियोलॉजी’ नावाची संपूर्ण शाखा आहे, ज्यात अनेक संशोधने चालू आहेत.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

२. उठल्या उठल्या मलविसर्जन करून मग पुढील कामे चालू करावीत. यामुळे शरिरातील मल वेळेवर बाहेर टाकून दिल्यामुळे नवीन पदार्थ शरिरात घेण्याची आणि पचवायची शक्ती मिळते, अग्नी चांगला रहातो. प्रतिदिन पोट साफ न झाल्याने मल पदार्थ परत शरिरात शोषले जातात आणि त्याचा संबंध केवळ सर्वसामान्य पचन लक्षणांशी निगडित नाही. मल आतड्यात पडून राहिला, तर ‘एस्ट्रोबॉलोम’ नावाचा गट ‘बॅक्टेरिया इस्ट्रोजेन’ या संप्रेरकाला परत मोकळे करून रक्तात सोडतो, ज्याने झालेल्या असंतुलनाचा संबंध ‘इंडोमेट्रीओसिस’पासून ते स्तनांचा कर्करोग अशा सध्या सामान्यपणे दिसणार्‍या; पण अतिशय गंभीर अशा आजारांशी आहे. आयुर्वेदात सगळ्या रोगांचा संबंध पोट किंवा अग्नी यांच्याशी आहे. या विधानाला गंभीर पुष्टी देणारी अनेकानेक संशोधने पुढे येत आहेत.

३. चेहरा आणि तोंड हे स्वच्छ केल्यावर केले जाणारे नस्य (नाकात वैद्यकीय सल्ल्याने तेल किंवा तूप यांचे थेंब) हे डोक्याच्या, डोळ्याच्या, मेंदूच्या आजारासाठी, तसेच सध्या सगळीकडे चर्चित बिघडलेल्या ‘ए.क्यू.आय.’ (हवा प्रदूषण मोजण्यासाठी असलेले मोजमाप)मुळे वाढत चाललेल्या श्वसन संस्थेचे विकार टाळण्यासाठी उपयोगी आहे.

४. अंघोळीच्या आधी केला जाणारा अभ्यंग हा त्वचा, हाडे, तसेच सांधे यांसाठी उपयोगी आहे. सततच्या चिंता, प्रवास, वैचारिक थकवा या सगळ्यांसाठी स्नेह, म्हणजेच तेल उत्तम काम करते. विविध ठिकाणी तुमच्या वाचनात आलेले ‘स्ट्रेस हार्मोन’ (तणावाच्या वेळी निर्माण होणारी संप्रेरके) न्यून करून सगळ्या शरिरातील चलनवलन चांगले करायला साहाय्य करतात. यासह कानात टाकलेले तेलाचे थेंब हे कानाचे आरोग्य चांगले ठेवायला साहाय्य करतात. वयानुसार कानात येणारे आवाज (tinnitus) आणि त्यातून येत जाणारा बहिरेपणा हे टाळता येते.

५. नियमित व्यायाम, जेवण आणि झोप ही तुमचे ‘बायोलॉजिकल क्लॉक’ (शरिरात असलेली एक नैसर्गिक यंत्रणा) नीट ठेवून अग्नी आणि मन स्थिर ठेवायला साहाय्य करतात. या सगळ्यांवर भरपूर काम चालू आहे. रोग न होण्यासाठी, तसेच झाल्यावर लक्षणांना पटकन आळा घालण्यासाठी आयुर्वेद उत्तम काम करते. आजारांवर औषधे घेतांना त्याचे तोटे हे परत नवीन आजारच नाहीत ना ?, याचा विचार करून सर्व पर्यायांचा विचार करून मग सुयोग्य निर्णय घेणे श्रेयस्कर ठरते.


हे ही वाचा → थंडीच्या दिवसांत सर्वसामान्य व्यक्तीने आरोग्य चांगले रहाण्याच्या अनुषंगाने खाण्या-पिण्याविषयी पाळावयाचे नियम !


स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प

नवीन वर्षासाठी आता एवढी सोपी ५ सूत्रे सांगितली आहेत. याचा क्रम यातील तांत्रिक अडचणी, प्रतिदिनच्या आयुष्यात त्याचा अवलंब कसा करावा ? आणि त्याविषयीची संशोधने, यांविषयीची सखोल माहिती लवकरच एका पुस्तकरूपात प्रकाशित करणार आहे. ‘ब्रेन रॉट’, ‘पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोम’, ‘डिजिटल डिमेंशिया’, अशा अनेक वेगवेगळ्या संकल्पना आपल्या कानांवर आदळत असतात. त्याविषयी वाचून नुसत्या भरपूर चर्चा करत बसण्यापेक्षा तंत्रज्ञानातील नवीन गोष्टींचा स्वतःच्या लाभासाठी यथायोग्य उपयोग आणि पालटत्या घडामोडींसाठी शरिराला सज्ज करणे, यादृष्टीने केलेले दिनचर्येतील पालट यामुळे स्वतःला तंत्रज्ञानाच्या भडिमाराचा दुष्परिणाम आणि नैसर्गिक पालट यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प निश्चितच साध्य करता येईल.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.

🪷 → वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ← 🪷