थंडीच्या दिवसांत सर्वसामान्य व्यक्तीने आरोग्य चांगले रहाण्याच्या अनुषंगाने खाण्या-पिण्याविषयी पाळावयाचे नियम !

शहर आणि गाव येथील थंडी वेगळी असते. गावातील थंडीत भूक वाढते, तर शहरात आजारपण वाढतात. मुख्य कारणांमध्ये प्रदूषण, व्यायाम नसणे आणि कार्यालयामध्ये जाणार्‍या लोकांचा वातानुकूलित यंत्राच्या ठिकाणी (‘एसी’मध्ये) वावर यांमुळे त्रास अधिक टिकतात. या लेखात थंडीच्या अनुषंगाने देत असलेले नियम साधारण आजार नसणार्‍या आणि भूक लागणार्‍या सगळ्यांना उपयोगी ठरतील. 

१. थंडीमध्ये न्याहारी करावी. न्याहारीसाठी मिक्स डाळींचे घावन, भाजणीचे थालीपीठ, पोहे, उपमा, धपाटा, कटलेट, घावन-सांबार, तूप-मेतकूट भात, पराठा इत्यादी पदार्थ खाऊ शकता. बाजरीच्या भाकरीचा गूळ, तूप आणि वेलची पावडर घालून केलेला लाडू खाण्यास छान होतो. तिखट पदार्थांसह थोडा सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता, खजूर), एखादा पिठापासून बनवलेला पौष्टिक लाडू खाऊ शकता.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

२. पूर्ण जेवण करावे. खीर, गाजर हलवा, शिरा असे गोड पदार्थ आहारात घ्यायला हरकत नाही. काही विशिष्ट कारणाने जर केवळ भाकरी खात असाल, तर ज्वारीची खाल्लेली चांगली. नाचणी आणि बाजरी रूक्ष किंवा कोरड्या असल्याने त्याची भाकरी खायची झाल्यास तीळ लावून आणि पुष्कळ तूप घालून गूळ वगैरे पदार्थांसह घेऊन मग खावी. बाजरी, गूळ आणि खजूर घालून केलेले रोटही छान होतात.

३. आहारात तूप असावे. भाजीला लसूण, आले, धने, जिरे, तीळ असे मसाले चवीसाठी घालावे. शेंगदाणा कूट, नारळ यांसारख्या अधिक उष्मांक असणार्‍या पदार्थांचा समावेश असावा.

४. वयस्कर व्यक्ती, शिक्षक, गायक यांनी शक्यतो कोमट पाणीच प्यावे. फळांचा रस (ज्यूस) किंवा रसांपेक्षा सूपचा अवश्य समावेश करावा. त्यात आले, लसूण, मिरपूड वापरावी.

५. ताक प्यायची सवय असल्यास तूप आणि जिरे यांची फोडणी देऊन प्यावे. थोडेसे आले किसून मठ्ठा बनवून प्यायले तरी चालेल. ताक स्वभावाने उष्ण असले, तरी बाहेरच्या थंडीमुळे घशाला त्रासदायक होऊ शकते.


हे ही वाचा → थंडीमध्ये विशेषकरून वाढलेला कोरडेपणा न्यून करण्यासाठी अंगाला प्रतिदिन तेल लावण्याचे महत्त्व !


६. थंडीच्या दिवसात दुपारी भूक असता काहीतरी खावे. एखादे घावन, थालीपीठ, उपमा, डोसा असे खायला हरकत नाही. चांगली भूक असतांना लाडू, खीर, शिराही चालेल. शेंगदाणा, नारळ, जवस, कारळे, तीळ अशा तैलमय पदार्थांचा वापर वाढवावा. रात्रीचे जेवण नेहमीसारखेच असावे. गोड पदार्थांचा समावेश नको. थोडा भात दोन्ही जेवणात घेता येईल.

७. काय करावे ?

व्यायाम, अभ्यंग, स्निग्ध पदार्थ अधिक खाणे, रात्री वेळेवर झोपणे, कोवळ्या उन्हात बसणे.

८. काय टाळावे ?

दिवसा झोपणे, कोरडे अन्न, दुचाकी वाहनावरून दूरवर फिरायला जाणे.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंडये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१९.११.२०२५)