पटकन चिडणे किंवा संताप उफाळून येणे, याला मथळ्यातील वाक्प्रचार सहज वापरला जातो. पित्त खवळून राग येणे किंवा राग आल्याने पित्त खवळणे, या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. सध्या जिथे बघाल तिथे सगळ्यांचे पित्त सतत खवळलेले असते. राग नाकाच्या शेंड्यावर आणि तिखट बोल जिभेच्या टोकावर असतात. हे राग वाजणार्या हॉर्नमधून, वेगाने जाणार्या गाड्यांमधून, एकमेकांना सामाजिक माध्यमांवर ओढल्या जाणार्या ताशेर्यांवरून सहज लक्षात येतात. कडू, तिखट चवीचे, उष्ण स्वभावाचे पित्त जेव्हा नीट काम करते, तेव्हा कुठल्याही गोष्टीत पालट करण्याचे काम उत्तम करते. भले ते अन्नाचे पचन असो, अन्नपदार्थांचे शरिरातील विविध भावपदार्थात केलेले रूपांतर असो किंवा दृष्टी, अग्नी, त्वचा तेजस्वी ठेवणे असो. इतकेच काय, मनातील अनेक भाव पित्ताच्या अधीन आहेत.

१. पित्त वाढण्यामागील कारणमीमांसा
मुळात व्यायाम नसल्याने आणि पूर्ण भूक लागण्याच्या आधीच खात असल्याने जिभेची चव अल्प झाली आणि अधिक चव जाणवावी; म्हणून आंबट, खारट किंवा तिखट चवीचा वापर वाढत गेला. नवीन पदार्थांची भर जसजशी पडत गेली, कामांचे ताण वाढले आणि सोयींची आवश्यकता भासू लागली, तसतसे ‘पॅकेट’मधील (बंद पिशवीतील) पदार्थ उपयोगी येऊ लागले. यात प्रामुख्याने केला गेलेला आंबट, तिखट, खारट चवीचा वापर; घातलेले विविध रासायनिक घटक, त्यावर केलेल्या प्रक्रियांनी अल्प झालेली सकसता आणि एकूणात ‘प्रोबायोटिक’ (जिवंत सूक्ष्मजीव असलेले पदार्थ), ‘फायबर’ (तंतूमय पदार्थ) अशा विविध गोष्टींचे अतिरेकी सेवन, तसेच कांजी, पिकल्ड भाज्या (लोणच्यामध्ये घातलेल्या भाज्या) अन् एकांगी दही, ताक, ‘योगर्ट’ (दूधापासून तयार केलेला पदार्थ) या गोष्टीही पित्त बिघडवायला कारणीभूत ठरू लागल्या.
बर्याचशा लोकांमध्ये हळूहळू पित्त वाढून पुढे जाऊन मग पित्ताच्या संलग्न वेगवेगळे आजार दिसू लागले आहेत. वारंवार तोंड येणे, केस गळणे, अंगावरून अधिक जाणे, वारंवार पित्ताने झालेले सांध्यांचे त्रास, सांधे झिजणे, ‘गॉल स्टोन’ (पित्ताशयातील खडे), आम्लपित्त यांसारख्या तक्रारी इत्यादी. यातच नैसर्गिक भाग जसे हवेतील आणि पाण्यातील प्रदूषक हे अपरिहार्य भाग पूरक घटक आहेत. व्यायाम नसणे, अनियमित जेवण आणि झोप या गोष्टीही त्याच सूचीतील.
२. पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी पाळावयाची सूत्रे

पित्त वाढलेले असता ‘माझी ‘ॲसिडिटी’ची (पित्तशामक) गोळी माझी मैत्रीणच आहे’, असे अभिमानाने सांगत वर्षानुवर्षे गोळी घेत रहाणारे लोकही आहेत, बंद केल्यावर किंवा एका पॉईंटनंतर (ठराविक कालावधीनंतर) ज्याचा ‘साईड इफेक्ट’ (दुष्परिणाम) हा ‘ॲसिडिटी’ (पित्त) आहे, हे माहिती नसते. सततची घाई, चिंता आणि दुःख यांनीही पित्त वाढते. वर्षानुवर्षे गोळी घेत रहायची असलेली सवय आयुर्वेद औषधांनी त्रास आटोक्यात आणत आणत पूर्ण बंद करता येते. यासह थोडे पथ्य पाळले असता कधीकधी हॉटेलिंग आणि बाकी मजाही काही दिवसानंतर करता येणे शक्य होते. प्रतिदिनच्या पाळण्यासारख्या बाकी काही गोष्टी येथे देत आहे.
अ. मळमळ, जळजळ अशा पद्धतीत पित्त असता सकाळी साळीच्या लाह्यांचे चांगले साहाय्य होते.
आ. सततचे तोंड येण्यामागे पोटातील पित्तासह पान / ओवा / सुपारी खायची सवय, सिगारेट ओढणे, तसेच ग्रहणीसारख्या आजारांमध्ये हे कारण दिसते. केवळ ‘फोलिक ॲसिड सप्लीमेंट्स’ने हे त्रास आटोक्यात येत नाहीत, तर शरिरात औषध आणि पथ्य यांनी क्रियात्मक पालट घडवले असता हे त्रास कायमस्वरूपी जातात.
इ. फळे खातांना ‘बेरीज्’ आणि आंबट फळे खाऊ नयेत. गोड फळे ही सकाळी १०.३०, सकाळी ११ किंवा दुपारी ४ वाजता खावीत. जळजळणे हे लक्षण अधिक असल्यास ताकसुद्धा प्रमाणातच प्यावे.
ई. शिळे खाणे, रात्रीचे जागरण, हिरव्या मिरचीचा सढळ वापर, पोहे हे पदार्थ पूर्ण बंद करावेत. आंबट पदार्थांचा किंवा ॲसिडिक पदार्थांचा वापर अधिक असणे (चाट, टोमॅटो, चीज, आंबवलेले पदार्थ), हे त्रासदायक असल्याने न्यूनतम खावेत.
उ. मानसिक गोष्टींचे शरिरावर पटकन परिणाम होतात. छोट्या गोष्टींवर चिडचिड इथपासून इतरांशी तुलना केल्याने होणारे मनस्ताप इथपर्यंत सगळ्या गोष्टी पित्त आणि अग्नी बिघडवत नेतात. त्यासाठी समुपदेशन, छंद जोपासणे, शिरोधारा, अभ्यंग इत्यादी आणि आवश्यकता भासल्यास मेंदूवर काम करणार्या औषधी वनस्पती यांचा चांगला परिणाम दिसतो.
ऊ. पोट साफ असणे महत्त्वाचे. त्यासाठी व्यायाम, चौरस आहार, दूध, तूप, मनुका इत्यादी खावे. त्यानेही परिणाम न दिसल्यास औषधांचे साहाय्य घ्यावे.
ए. निरनिराळे नैसर्गिक सुगंध हेही पित्त आटोक्यात ठेवायला साहाय्य करतात. मोगरा, जाई, जुई, तसेच अत्तराचा वापरही शरीर आणि मन यांवर उपयोगी ठरतात.
३. लक्षणांवर औषध आणि रोगावर इलाज
आता आपण सगळे या सीमेवर उभे आहोत की, मानसिक त्रासाचे प्रमाण प्रचंड वाढत जाणार आहे. शरिरातील दोष वर-खाली झाल्याने मानसिक त्रास पटकन होणे, तसेच मानसिक त्रास असता शरिरात पटकन बिघाड होणे, अशा दोन्ही पद्धतीत हे त्रास होतात. विशेषकरून हे त्रास अग्नी आणि वात-पित्तावर पटकन होतांना दिसतात. लगोलग लक्षणे न्यून करण्यासह मानसिक त्रास न्यून करण्यावरही लक्ष द्यायला लागते.
आयुर्वेदाचे सौंदर्य हे आहे की, जेव्हा विशिष्ट निदान करून एखादा कल्प वापरला जातो, तेव्हा या दोन्ही गोष्टी आपोआप साध्य होतात आणि लक्षणांच्या बरे होण्यासह ते होण्यातील वारंवारताही दूर होतांना दिसते. ‘एक लक्षण एक औषध’ यांपेक्षा ‘लक्षणांवर औषध, रोगावर इलाज’, अशा पद्धतीत विचार असल्याने दूरगामी लाभ दिसतात, हे नक्की!
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !
परस्परावलंबनाचा बोध देणारा ‘योग’ !