उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती !

  • पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंची घोषणा

  • मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढवणार

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २४ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची घोषणा केली. ‘महाराष्ट्रातील अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये ही युती असणार का ?, याविषयीचा निर्णय येत्या १-२ दिवसांत होईल’, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या वेळी खासदार संजय राऊत व्यासपिठावर उपस्थित होते. १५ जानेवारी २०२६ या दिवशी राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून १६ जानेवारी या दिवशी निकाल घोषित होईल.

‘एकत्र आलो आहोत, ते एकत्र रहाण्यासाठी ! मुंबई आणि महाराष्ट्र यांवर वाकड्या दृष्टीने पहाणार्‍यांना नष्ट केल्याविना रहाणार नाही. मराठी माणूस फुटला, तर तो नष्ट होईल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार ! – राज ठाकरे

कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. या सूत्रावरून आम्ही एकत्र येण्याला प्रारंभ झाला. कोण किती जागा लढवणार, हे आता सांगणार नाही. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार !

महाविकास आघाडीतून बाहेर !

महाविकास आघाडीतील सहभागाविषयी पत्रकारांनी विचारले. ‘महाविकास आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडूनही महाविकास अबाधित आहे’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे महाविकास आघाडातील सहभागाविषयी उपरोधिकपणे बोलले. ‘ठाकरे गटासमवेत मनसे आल्यास काँग्रेसने त्या संदर्भातील भूमिका आधीच घोषित केली आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘ठाकरे गटासमवेत मनसे आल्यास त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल’, असे काँग्रेसच्या नेत्यांनी यापूर्वी म्हटले होते.

ठाकरे यांची युती दोन्ही पक्षांच्या अस्तित्वासाठी ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर रशिया आणि युक्रेन यांची युती होत असल्याप्रमाणे माध्यमे वृत्ते दाखवत आहेत; परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे फार काही घडेल, असे समजणे हा बाळबोध समज आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे. मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचे पाप ठाकरे यांनी केले आहे. अमराठींवर केलेली आक्रमणे यांमुळे तेही ठाकरे यांच्यासमवेत नाहीत. स्वहितासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंची युती ही दोन्ही पक्षांच्या अस्तित्वासाठीची युती आहे.