Russia Recruited Indians : रशियाच्या सैन्यात २०४ भारतियांची झाली होती भरती !

११९ जणांना भारतात परत आणले, तर २६ जणांचा युद्धात मृत्यू

मॉस्को (रशिया) – राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत २०४ भारतीय नागरिक रशियाच्या सैन्यात सहभागी झाले आहेत. यांपैकी ११९ भारतियांना मुदतपूर्व सुटी देऊन भारतात परत आणण्यात आले आहे. या युद्धात आतापर्यंत २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ७  भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची नोंद आहे. सध्या रशियाच्या सैन्यात असलेल्या उर्वरित ५० भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मुक्त करून भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच मृत्यू झालेल्या १० भारतीय नागरिकांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रक्रिया चालू आहे.

भारताने पाठवले डीएन्ए नमुने  

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारत सरकार रशियाच्या अधिकार्‍यांच्या सतत संपर्कात आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षितता, कल्याण आणि तातडीने सुटका यांसाठी रशियाशी सर्व पातळ्यांवर चर्चा चालू आहे. यामध्ये दोन्ही देशांचे नेते, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यातील संवादाचाही समावेश आहे. मृत्यू झालेल्या किंवा बेपत्ता असलेल्या भारतियांपैकी १८ जणांचे डी.एन्.ए. (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक.) नमुने रशियाच्या अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आले असून ओळख आणि पुढील प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

१२८ देशांमधून सैनिक भरती करण्याचा रशियाचा प्रयत्न

युद्ध चालू झाल्यानंतर रशियाने अनेक देशांमध्ये भरती मोहीम तीव्र केली आहे. उपलब्ध माहितीनुसार रशियाने आतापर्यंत सुमारे १२८ देशांतील परदेशी नागरिकांना सैन्यात भरती करण्याचा प्रयत्न केला आहे. हे युद्ध आतापर्यंतचे सर्वांत भीषण संघर्ष मानले जाते. या लढाईत आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोक मृत किंवा घायाळ झाल्याचा अंदाज आहे. केवळ रशियाचेच सुमारे ७ लाख ९० सैनिक मृत किंवा घायाळ झाले आहेत, तर ८५ सहस्र सैनिक बेपत्ता असल्याचे सांगितले जाते.