संपादकीय : युक्रेनची हतबलता !

वर्ष २०२२ पासून चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. हे युद्ध थांबण्यासाठी जोरदार वाटाघाटी चालू आहेत. ‘कधी नव्हे, एवढे आपण शांती करार होण्याच्या जवळ पोचलो आहोत’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी त्यांचा ‘नाटो’मध्ये (उत्तर अटलांटिक करार संघटना) सहभागी होण्याचा हट्ट सोडून दिला आहे. खरेतर युक्रेनचा ‘नाटो’मध्ये सहभाग हीच खरी युद्धाची दुखरी नस होती. ‘युक्रेन ‘नाटो’ गटात सहभागी झाला, तर त्याचा थेट परिणाम रशियाच्या सार्वभौमत्वावर होणार’, अशी भीती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना वाटत होती. ‘नाटो’मध्ये सहभागी असलेल्या एका जरी देशावर कुणी आक्रमण केले, तर ते आक्रमण गटातील सर्व देशांवरील आक्रमण’, असे ‘नाटो’च्या कार्यसूचीत म्हटले आहे. ‘युक्रेनवर सैनिकी कारवाई केल्यास सर्व नाटो देश एकवटणार’, हे पुतिन यांना ठाऊक होते. त्यामुळेच ‘युक्रेनने ‘नाटो’मध्ये प्रवेश करू नये’, असा पुतिन यांचा मानस होता. वर्ष २०१९ मध्ये युक्रेनमधील विनोदी कलाकार झेलेंस्की सत्तेत आले आणि देशात रशियाविरोधी वारे जोरात वाहू लागले. अमेरिकेलाही तेच हवे होते. हे रशियाविरोधी वातावरण अधिक भडकवत ठेवण्यासाठी अमेरिका आगीत तेल ओतत राहिली. झेलेंस्की राजकारणात नवखे. त्याही पुढे जाऊन जागतिक राजकारण आणि मुत्सद्देगिरी यांविषयी त्यांची पाटी कोरी ! राजकारणात अपरिपक्व असलेले झेलेंस्की कावेबाज अमेरिकेच्या जाळ्यात अडकले. झेलेंस्की यांचा वापर करून अमेरिका पुतिन यांना चिथावू लागली. ‘अमेरिकेच्या साहाय्याने रशियाचा एकदाच काय तो काटा काढू’, या भ्रमात झेलेंस्की वावरू लागले आणि येथेच त्यांचा आत्मघात झाला. झेलेंस्की यांची गाठ पुतिन यांच्याशी होती. सैन्य पार्श्वभूमी असलेले, विरोधकांना वेचून ठार मारणारे, जगाला झुकवण्याची महत्त्वाकांक्षा असलेले आणि राजकारण कोळून प्यालेले पुतिन यांच्यासमोर नवख्या झेलेंस्की यांचा निभाव काय लागणार होता ?

झेलेंस्की यांच्या कारवाया हाताबाहेर गेल्यावर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले. आरंभीचा काही काळ अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील देश यांनी युक्रेनला सैनिकी साहाय्य केले. रशिया कोणतेही निर्बंध आणि सैनिकी कारवाई याला बधत नाही, हे पाहून अमेरिका कुरबूर करू लागली. ‘नाटो’ आणि ‘युरोपियन युनियन’ या संघटनांमध्ये सहभागी होऊन युक्रेनचा उत्कर्ष करू पहाणारे झेलेंस्की हे आता परिस्थितीला शरण आले आहेत. आज जी काही शांती चर्चा होत आहे, ती एकतर्फी आहे. रशिया त्याच्या सर्व मागण्या मान्य करायला अमेरिकेला भाग पाडत आहे. एवढेच कशाला ? सध्या रशियाने युक्रेनचा २० टक्के भूभाग कह्यात घेतला आहे. ‘हा भूभाग परत देणार नाही’, तसेच शांती कराराच्या वेळी ‘जैसे थे’ स्थिती ठेवायची, यावर रशिया ठाम आहे. एकीकडे चर्चेच्या फेर्‍या झडल्या जात असतांना रशिया मात्र युक्रेनमध्ये शिरत आहे. त्यामुळे जेव्हा येणार्‍या काळात रशिया-युक्रेन युद्ध थांबेल, तेव्हा ‘जैसे थे’ निकषानुसार रशियाने युक्रेनचा मोठा भूभाग कह्यात घेतलेला असेल. दुर्दैव म्हणजे रशियाची ही अट मान्य करण्यासाठी अमेरिका युक्रेनची मनधरणी करत आहे. त्यामुळे जसे ‘नाटो’चा नाद झेलेंस्की यांनी सोडला, तसाच या भूभागावर तुळशीपत्र ठेवण्याचा त्यांनी निश्चय केल्यास आश्चर्य वाटणार नाही. या सर्व घडामोडी पहाता ‘या युद्धाने काय साध्य झाले ?’, हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न युक्रेनला न विचारता तो अमेरिकेला जगाने विचारायचा आहे. एखाद्या देशातील स्वतःचे स्वारस्य संपल्यावर त्याला वार्‍यावर सोडायची अमेरिकेची ही काही पहिलीच वेळ नाही. इराक, अफगाणिस्तान आदी देशांनी हेच पाहिले आहे. हे युद्ध थांबले, तर त्याचा सर्वाधिक लाभ हा रशियाला होणार आणि युक्रेनला हात चोळण्यापलीकडे काहीही करता येणार नाही. अमेरिकेने कितीही नाकारले, तरी हे अपयश युक्रेनचे अल्प आणि अमेरिकेचे अधिक आहे. अमेरिकेला याची कुणीतरी जाणीव करून देणे आवश्यक आहे.

जागतिक राजकारण पालटणार !

फिनलँडचे पंतप्रधान पेटेरी ऑर्पाे

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध काही कालावधीनंतर थांबेलही; मात्र या युद्धबंदीमुळे युरोपमध्ये खळबळ उडाली आहे. ‘युरोपने आता स्वतःचे रक्षण स्वतः करणे आवश्यक आहे’, असे फिनलँडचे पंतप्रधान पेटेरी ऑर्पाे यांनी म्हटले आहे, तर पोलंड, एस्टोनिया, लिथुआनिया हे देश सकल देशांतर्गत उत्पादनातील ५ टक्के निधी संरक्षण खर्चासाठी वापरणार आहेत. हे सर्व देश अमेरिकेचे बगलबच्चे; मात्र अमेरिकेच्या धरसोड वृत्तीमुळे या सर्व देशांना त्यांचे अंधारमय भविष्य दिसू लागले आहे. अमेरिका पाठीशी असल्यामुळे या सर्व देशांनी उसने अवसान आणून रशियाला विरोध केला होता. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियावर निर्बंध वगैरे लादले गेल्यामुळे पुतिन युरोप मधील देशांवर डूख धरून आहेत. भविष्यात संधी मिळाल्यावर पुतिन याचा वचपा काढणार, हे या देशांनी आता पुरते ओळखले आहे. हेच कशाला ? ‘नाटो’चे प्रमुख मार्क रुटे यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही (नाटो देश) रशियाचे पुढील लक्ष्य आहोत. रशियाने युरोपात युद्ध आणले आहे. आपल्या पूर्वजांनी युद्धाची जी झळ आणि व्याप्ती अनुभवली होती, ती अनुभवण्यासाठी आपण सिद्ध रहाणे आवश्यक आहे.’’ एकंदरित युरोपची स्थिती पहाता रशिया-युक्रेन युद्ध संपेल; मात्र भविष्यात रशिया-युरोप युद्ध चालू होईल, अशी स्थिती आहे.

युद्ध कुणी लढावे ?

रशिया-युक्रेन युद्धाने जगाला बरेच काही शिकवले. युद्ध हे स्वबळावर लढावे लागते. कुणाच्या भरवशावर वा कुणाच्या साहाय्याने रणांगणावर उतरता येत नाही. अमेरिकेने केलेला विश्वासघात युक्रेनला पचवायला नक्कीच वेळ लागणार. बरं, अमेरिकेच्या नादी लागण्याची युक्रेनची ही काही पहिलीच वेळ नाही. ‘तुमचे रक्षण करू’, अशी हमी अमेरिकेने वर्ष १९९४ मध्ये युक्रेनला दिली होती. त्यावर विश्वास ठेवून युक्रेनने त्याच्याकडे सोव्हिएत संघाच्या काळातील असलेली अण्वस्त्रे उद्ध्वस्त केली. आज युक्रेनकडे अण्वस्त्रे असती, तर रशियाने त्याच्यावर आक्रमण करण्याआधी नक्कीच विचार केला असता. छोटासा उत्तर कोरिया अमेरिकेला डोळे वटारून दाखवतो; कारण त्याच्याकडे अण्वस्त्रे आहेत. युक्रेनने भूतकाळात केलेली चूक त्याला आता महागात पडत आहे.

युक्रेनच्या नेतृत्वाने अनेक आघाड्यांवर चुका केल्या. नेतृत्वाने घेतलेला एक निर्णय राष्ट्राचे उत्थान करतो अथवा त्याला उद्ध्वस्त करतो. भविष्यात भारताला अनेक आघाड्यांवर लढायचे आहे. या युद्धातून तो बोध घेईल, हे नक्की !

नेतृत्वाने घेतलेला एक निर्णय राष्ट्राचे उत्थान करतो किंवा त्याला उद्ध्वस्त करतो !