Shankhnad Mahotsav Delhi : हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात लढण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या संघटनांनी संघटित होणे आवश्यक ! – चर्चासत्रात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील ‘सनातन संस्कृतीचे रक्षण’ चर्चासत्र

डावीकडून श्री. कुरु ताई, अधिवक्ता अरुण गुप्ता, डॉ. सुरेश चव्हाणके, कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) आणि श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव

भारत मंडपम्, इंद्रप्रस्थ (नवी देहली) – अनेक हिंदू विविध क्षेत्रांमध्ये म्हणजेच धर्मांतर, लव्ह जिहाद, भूमी जिहाद रोखणे, संस्कृतीरक्षण आणि घरवापसी करणे यांसाठी कार्य करत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन कार्य केल्यास हिंदु धर्मावरील आघातांशी लढता येईल. असे असले, तरी सनातन राष्ट्राची स्थापना झाल्यावरच खर्‍या अर्थाने सनातन धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण होणार आहे, अशी दिशा १३ डिसेंबर या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त झालेल्या ‘सनातन संस्कृतीचे रक्षण’ या विषयावरील चर्चासत्रातून उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना मिळाली. या चर्चासत्रामध्ये छत्तीसगड येथील भाजपचे नेते श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव, ‘प्राच्यम्’ ओटीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त), अरुणाचल प्रदेशातील बांबू संसाधन आणि विकास संस्थेचे उपसंचालक श्री. कुरु ताई अन् ‘गंगामित्र’ म्हणून ओळखले जाणारे उत्तरप्रदेश येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अरुण गुप्ता सहभागी झाले होते. चर्चासत्राचे संचालन ‘सुदर्शन न्यूज नेटवर्क’चे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी केले.

जानेवारी २०२६ पर्यंत अरुणाचल प्रदेशातील घुसखोरांना पिटाळून लावू ! – श्री. कुरु ताई, उपसंचालक, बांबू संसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

श्री. कुरु ताई

अरुणाचल प्रदेशात धर्मांतर, भूमी जिहाद आणि अवैध घुसखोरी यांच्या विरोधात तरुण एकवटले आहेत. त्यामुळे जानेवारी २०२६ पर्यंत तेथील सर्व अनधिकृत भूमी अतिक्रमणमुक्त होऊन भूमी जिहाद संपुष्टात येईल, तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये रहात असलेल्या अवैध घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी हे तरुण पुरेसे आहेत. यासमवेतच येत्या ५ वर्षांत आम्ही बलपूर्वक होणारे धर्मांतरही थांबवणार आहोत.

केंद्र सरकारने गंगाजलावर वैद्यकीय संशोधन करून त्याचा लाभ जनतेला करून द्यावा ! – अधिवक्ता अरुण गुप्ता, उच्च न्यायालय आणि ‘गंगामित्र’

अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता

संपूर्ण विश्वात केवळ भारतातील ऋषिमुनींनी नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा चालू केली. गंगाजल वैज्ञानिक असल्याने ते अनेक जिवांचे रक्षण करते. गंगानदीविषयी न्यायालयात वैज्ञानिक पुरावे सादर केल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून १२५ आदेश (निवाडे) प्राप्त झाले आहेत. गंगाजलामुळे अनेक आजार बरे होऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने त्यावर वैद्यकीय संशोधन करून त्याचा लाभ लोकांना करून द्यावा.

सत्य भारतीय संस्कृती जगासमोर आणण्यासाठी ‘प्राच्यम् ओटीटी’ची स्थापना ! – कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त), मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘प्राच्यम्’ ओटीटी

श्री. प्रवीण चतुर्वेदी

राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या विरोधात अनेक स्तरांवर युद्ध लढले जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्या त्या क्षेत्रात लढले पाहिजे. पाश्चात्त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी अनेक अपसमज होते. त्यामुळे ते प्रसारमाध्यमांद्वारे भारत, हिंदु धर्म आणि संस्कृती यांना विरोध करत होते. जगाला वास्तव कळावे, यासाठी मी ‘प्राच्यम्’ हे ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ चालू केले. यासमवेतच भारतियांना १ सहस्र वर्षांच्या खर्‍या इतिहासापासून वंचित ठेवण्यात आले. ज्यांना आपला इतिहास ठाऊक नाही, त्यांना शत्रूबोध होत नाही, हे लक्षात घेऊन भारतियांना खर्‍या इतिहासाची ओळख व्हावी, हाही ‘प्राच्यम्’चा उद्देश आहे.

ख्रिस्ती धर्मांतर थांबवण्यासाठी छत्तीसगडमध्ये कठोर कायदा करू ! – प्रबल प्रताप सिंह जुदेव, भाजप नेते, छत्तीसगड

प्रबल प्रताप सिंह जुदेव

जेव्हा एक धर्मांतर होते, तेव्हा एक शत्रू वाढतो. काँग्रेस सरकारच्या काळात छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर झाले, तसेच नक्षलवाद फोफावला. आता भाजपचे मुख्यमंत्री श्री. विष्णु देव साय यांच्या सरकारच्या काळात आदिवासी संस्कृतीचे रक्षण होत असून लोक मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत, तसेच नक्षलवादही नष्ट होत आहे. येत्या अधिवेशनामध्ये छत्तीसगड सरकार धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा आणत आहे. एक राजा असतांनाही माझे वडील स्वर्गीय दिलीप सिंह जुदेव यांनी दलित बंधूंचे पाय धुऊन लक्षावधी धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत आणण्याचे कार्य केले. त्याच धर्तीवर आम्हीही सहस्रो आदिवासी लोकांना स्वधर्मात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

क्षणचित्रे

१. चर्चासत्राच्या वेळी ‘प्राच्यम् ओटीटी प्लॅटफॉर्म’चे लघुपट दाखवण्यात आले.

२. ‘पूर्वाेत्तर राज्यांमध्ये ज्यांना पत्रकार व्हायचे आहे, त्यांना विनामूल्य पत्रकारिता शिकवून पदवी देण्यात येईल’, अशी घोषणा ‘सुदर्शन न्यूज नेटवर्कचे’ मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी चर्चासत्राच्या वेळी केली.

अरुणाचल प्रदेशमध्ये श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज, जय बाबाजी परिवार यांचा आश्रम उघडण्यात येईल’, असेही ते म्हणाले.

३. उपस्थित १ सहस्र हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने भूमी जिहाद आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या विरोधात लढणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांना पाठिंबा घोषित करण्यात आला.