हिंदुत्व जागृतीमुळे हिंदुत्वविरोधी मायावी टोळ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये पालट केलेला दिसत असून त्यांनी आता देवता आणि श्रद्धास्थाने यांच्या आधारे हिंदु समाजात गोंधळ अन् संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. छत्रपती शिवरायांची जयंती आणि पंढरपूरची वारी हे असे उत्सव आहेत की, त्या उत्सवात जातीपातीच्या वर उठून हिंदु समाज ‘हिंदु’ म्हणून एकत्र येत असतो. त्यामुळे निधर्मी मायावी टोळ्या वारीला लक्ष्य करत आहेत. पूर्वी त्यांनी शिवजयंती तिथीप्रमाणे कि इंग्रजी दिनांकाप्रमाणे असा प्रयोग केला तथा खोटे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) उभे करून शिवभक्तांमध्ये फूट पाडली आहे. आता त्याच धर्तीवर पंढरपूर वारीला लक्ष्य करून वारीमधील एकतेची वीण विस्कळीत करण्यासाठी त्यात निधर्मी दांभिकांचा मुक्त संचार वाढला आहे.

१. वारकर्यांमध्ये घुसखोरी ही धोक्याची घंटा !
पंढरपूरची वारी ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने होत असते. या वारीमध्ये वैष्णवांचा मोठा जनसागर आपल्या दैवताचे रूप पहाण्यासाठी उपस्थित होत असतो. पंढरपूरच्या वारी उत्सवाला कुणालाही निमंत्रण नसते किंवा ‘चलो पंढरपूर’ अशी घोषणासुद्धा कुणी करत नाही. केवळ कालदर्शिकेच्या तिथीप्रमाणे देशाच्या विविध भागांमधून ग्रामीण, तसेच शहरी भागातून शेतकरी ते श्रीमंत स्वखर्चाने स्वतःला ‘विठ्ठलभक्त’ म्हणत आणि त्याला मायबाप म्हणत पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघतो. दशमीच्या दिवशी पंढरपुरात विसावा घेत विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावतो. दशमी ते पौर्णिमा हे ५ दिवस पंढरपुरात विठ्ठल भक्ताचा जनसागर उसळतो. सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकता यांच्या मोठ्या उत्सवाचे दर्शन तेथे घडते. हिंदुत्वाच्या एकतेचे विशाल स्वरूप असलेल्या वारीमधील समरसता, बंधुभाव काही समाजविघातक मायावी टोळ्या, संघटना आणि संस्था यांच्या डोळ्यांत सतत खुपत आहे. त्यामुळे त्यांनी पंढरपूरच्या वारीमध्ये प्रवेश करून वारकरी बंधूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. सामाजिक समरसतेचा कणा मोडण्यासाठी त्यांनी समाजमाध्यमांद्वारे काही छुपे प्रयोग करणे चालू केले. पावसाळ्यात ज्याप्रमाणे जागोजागी कुत्र्याच्या छत्र्या उभ्या रहातात किंवा पावसात जिकडे तिकडे बेडकाची पैदास पहावयास मिळते, त्याप्रमाणेच हिंदुत्वविरोधी मायावी टोळ्या वारीपर्वाच्या कालावधीत बिळांमधून पटापट बाहेर पडून समाजविरोधी आवाज करत असतात. स्वतःला नास्तिक म्हणणार्या टोळ्या मुळातच सहिष्णू असलेल्या ‘वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ या वारीला वेगवेगळ्या विचारात विभागण्यासाठी आटापिटा करत आहेत. त्यासाठी ‘संविधान दिंडी’पासून ‘समता दिंडी’ असे षड्यंत्र, ख्रिस्ती मिशनर्यांचे वारीत येशू ख्रिस्ताच्या माहितीपत्रक वितरणाचे प्रयोग आणि मुसलमान वारकरी यांना माध्यमांमध्ये अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. ही वारीमधील निधर्मीय दांभिकांचा मुक्तसंचार किंवा घुसखोरी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
२. वारीमध्ये घुसलेल्यांचा हेतू अशुद्ध

पंढरपूरच्या दिशेने पायी निघणार्या दिंड्यामध्ये नास्तिक मंडळी खोटे वारकरी बनून वावरत असून ‘आपण वारकरी असल्याचा बनाव करत आहेत’, तसेच काही हिंदुत्वविरोधी साम्यवादी पत्रकार, लेखकही घुसले आहेत आणि ते वारीमधील चुकीचे वार्तांकन करून संभ्रम निर्माण करत आहेत. वारीमध्ये कुणीही येऊ शकते. वारी सर्वांची आहे. विठ्ठलसुद्धा सर्व वैष्णवांचा त्यामुळे वारी आणि विठ्ठल यांवर कुणाचीही मक्तेदारी नाही, हे सत्य आहे; पण त्यामध्ये सामील होण्याचा हेतू शुद्ध असला पाहिजे. वारीचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. संत तुकोबांनी ‘शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी’ म्हटले आहेच. आता वारीमध्ये काही पत्रकार मंडळी, तथाकथित समाजसेवक आणि ख्रिस्ती मिशनरी घुसले असून त्यांचा हेतू शुद्ध नसल्याचे लक्षात येत आहे. संत तुकोबांनी ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ हा विचार मांडलेल्या वारीत निधर्मी टोळ्या वारकरी बंधूंना समतेचा विचार सांगत आहेत. ‘विठ्ठल विष्णूचे अवतार नाहीत, तर बुद्ध मूर्ती आहे’, असा वाद निर्माण करणारेसुद्धा वारीत सहभागी झाले. एखादा मुसलमान अभंग म्हणतो, अशा काही घटनांना माध्यमांमध्ये अवास्तव प्रसिद्धी दिले जाते, तसेच ख्रिस्ती मिशनरी वारीमध्ये पत्रके आणि बायबलच्या प्रती वाटप करण्याचे कामसुद्धा करत आहेत. एकूणच वारीला समाजविघातक मंडळींनी चारही बाजूंनी घेरल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून चिंतनीय आहे.
३. दुटप्पी आणि बेगड्या नास्तिक राजकीय नेत्यांची तुलना विठ्ठलाशी करणे कितपत योग्य ?
मागील वर्षापासून पंढरपूर वारीमध्ये दांभिक राजकीय मंडळींचा मुक्तसंचार चालू असून राजकारणसुद्धा केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बबनराव पाचपुते एक वारकरी म्हणून वारीमध्ये सामील व्हायचे. त्यांनी कधी वारीमध्ये राजकारण केल्याची किंवा वारकरी संप्रदायामध्ये संभ्रम निर्माण करण्याची नोंद नाही; परंतु आताच्या वारीमधील चित्र आश्चर्यकारक आहे; कारण काही वर्षांपूर्वी हिंदु देवीदेवता, सण-उत्सव, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची टिंगलटवाळी करणार्या सुषमा अंधारे यांनी मागील वर्षी वारीत प्रवेश केला होता. त्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये होते किंवा जाणीवपूर्वक फिरवले जात असावेत. शरद पवार यांचे काही समर्थकसुद्धा वारीत घुसले होते. त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची विठ्ठल-रुक्मिणीशी तुलना केली होती. वास्तविक पहाता एम्.बी. पाटील यांनी शरद पवार यांच्या जीवनकार्यावर ‘दगाबाज’ पुस्तक लिहून त्यांना नामोहरम केले आहे; मात्र त्याच शरद पवारांना ‘विठ्ठल’ संबोधणे थट्टा म्हणावी लागेल. हिंदु देवीदेवतांची खिल्ली उडवणार्या शरद पवारांची विठ्ठलाशी तुलना करणे कितपत योग्य आहे ? ज्यांनी आयुष्यभर स्वतःला नास्तिक असण्याचा टेंभा मिरवून सतत मुसलमानांचा अनुनय आणि लांगूलचालन केले, सत्यनारायण पूजेला विरोध आणि इफ्तारमध्ये शिरखुर्मावर ताव मारला; ‘पूजा घरात आणि नमाज रस्त्यावर’, अशा दुटप्पी विचाराचे समर्थन करणार्यांची तुलना विठ्ठलाशी करतांना लाज कशी वाटत नाही ? जो राजकीय नेता हिंदूंना सरळ सरळ हिंसाचारी म्हणतो, त्यांना वारीमध्ये येण्याचे आमंत्रणसुद्धा दिले होते, तसेच नवरात्र उत्सवात भगवतीची आणि संत ज्ञानेश्वर यांची टिंगलटवाळी करणार्या सुषमा अंधारे यांचे वारीत काय काम आहे ? त्यामुळे ‘अशा दुटप्पी आणि बेगड्या नास्तिक मंडळींचे वारीमध्ये काय काम आहे ?’, असा प्रश्न सामान्य वारकरी बंधूंनी उपस्थित केला होता. वारकरी संप्रदायाने या प्रश्नावर विचार करण्याची आणि सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वेळ आली आहे. जर अशांना थांबवले नाही, तर पंढरपूरच्या वारीची वीण विस्कळीत केल्याविना ते स्वस्थ रहाणार नाहीत.
४. मोठ्या षड्यंत्राचा प्रयोग
हिंदु समाजात छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या वेळी प्रत्येक जण मावळा बनून, तर पंढरपूरच्या वारीत तो वारकरी म्हणून जातीपातींना विसरून हिंदु समाज एकत्र येतो. यामुळे निधर्मी मायावी टोळ्या वारीला लक्ष्य करत आहेत. वारीमध्ये मुसलमानांकडून पाणी, अल्पोपहार वितरण, दर्ग्यात वारीचे स्वागत करणे, तमाशा कलावंतांनी लावणी सादर करणे आणि अशा घटनांना प्रसिद्धीमाध्यमांत अवास्तव प्रसिद्धी देणे, हे सर्व प्रकार वारकर्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्र म्हणावे लागेल. त्यामुळे वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार हा मोठ्या षड्यंत्राचा प्रयोग आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
– श्री. अशोक राणे, मुक्त पत्रकार तथा ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई’चे पूर्व सदस्य, अकोला. (१८.७.२०२६)
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…
गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘त्याग’ आणि कला !