शंखनाद होतो, तेव्हा नेमके काय घडते ?

‘१३ ते १४ डिसेंबर या कालावधीत भारताची राजधानी ‘इंद्रप्रस्थ (नवी देहली)’ येथील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सेव्ह भारत सेव्ह कल्चर’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होत आहे. या निमित्ताने ‘शंखनाद’ म्हणजे काय ? त्याचे हिंदु धर्मात सांगितलेले महत्त्व आणि स्थूलमानाने दिसणार्‍या या छोट्याशा कृतीचे सूक्ष्म अन् दूरगामी परिणाम काय असतात, हे समजून घेऊया.

१. शंखनाद म्हणजे काय ?

शंख वाजवणे किंवा शंखाचा नाद (ध्वनी) करणे, याला ‘शंखनाद’ म्हणतात. हा नाद म्हणजेच शब्दब्रह्माचे, म्हणजे सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हा ॐ कार ध्वनी उमटला, त्याचे एक स्वरूप मानले जाते. याला ‘नादब्रह्म’ असेही म्हणतात.

श्री. योगेश जलतारे

२. शंखनादाचे महत्त्व

शंख हे भगवान विष्णूचे एक आयुध असल्यामुळे शंखनाद अत्यंत पवित्र मानला जातो. शंखनाद हा हिंदु धर्मातील एक अतिशय पवित्र धार्मिक विधी आहे. ‘पद्म’ आणि ‘स्कंद’ पुराणांत शंखनादाने परिसराच्या आध्यात्मिक शुद्धीकरणाचा उल्लेख आहे. शंखनाद करून देवतांचे आवाहन केले जाते. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ शंखनादाने केल्यास ते कार्य यशस्वी होते. शंखनाद केल्याने साक्षात् विष्णु आणि श्रीलक्ष्मी प्रसन्न होतात. यामुळे समृद्धी, ऐश्वर्य आणि कल्याण यांची प्राप्ती होते. शंखनादाच्या शक्तीशाली ध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ शक्ती दूर होतात. यामुळे परिसराची शुद्धी होते.

३. शंखनादाचे वैज्ञानिक लाभ

धार्मिक महत्त्वासह शंखनादाचे काही वैज्ञानिक लाभही आहेत. श्वासोच्छ्वासाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘शंखनाद करणे’, हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे श्वसनप्रणाली मजबूत होते आणि दम्यासारख्या रोगांवर लाभ होतो. सध्या फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी बरेच आधुनिक वैद्य रुग्णांना शंखनाद करण्याचा सल्ला देतात. शंखनादामुळे रोग निर्माण करणारे वातावरणातील जंतू निष्प्राण होत असल्याने वातावरण शुद्ध होते.

श्रीकृष्णाच्या ‘पांचजन्य’ शंखनादाचे वैशिष्ट्य !

‘पांचजन्य शंख’ हा ५ तत्त्वांचे, म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश यांचे प्रतीक मानला जातो. हा शंख विजय, यश, समृद्धी आणि कल्याण यांची प्राप्ती करून देणारा आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धात श्रीकृष्णाने ‘पांचजन्य’ शंख वाजवून युद्धाचा आणि धर्माच्या स्थापनेचा प्रारंभ केला होता. त्यामुळे शंखनाद धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे.

श्रीकृष्णाने केलेला शंखनाद हा अत्यंत भयानक, मोठा आणि गंभीर होता. जेव्हा श्रीकृष्ण पांचजन्य वाजवायचा, तेव्हा त्याचा आवाज सप्तलोक आणि सप्तपाताळ येथेही घुमत असे. हा नाद पाताळात पोचताच तिथे रहाणार्‍या आसुरी शक्तींच्या मनात अतिशय तीव्र भय आणि थरकाप निर्माण करत असे. हा नाद, म्हणजे आसुरी शक्तींच्या पराभवाची आणि त्यांच्या अंताची घोषणा होती. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खचून त्यांचे मनोबल पूर्णपणे नष्ट होत असे. त्यामुळे श्रीकृष्णाच्या शंखनादामुळे विविध शत्रूंच्या मनात भय आणि निराशा निर्माण होऊन त्यांचे मनोबल खचत असे, तर याउलट पांडवांमध्ये उत्साह अन् ऊर्जा संचारत असे.

थोडक्यात ‘पांचजन्य’ शंख हा धर्माचे रक्षण, असत्यावर सत्याचा विजय आणि दैवी शक्तीचे प्राकट्य यांचे प्रतीक होता.

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम. (२९.११.२०२५)

४. शंखनादामुळे शत्रूवर होणारे परिणाम

द्वापरयुगात झालेल्या महाभारताच्या युद्धात कुणी कोणत्या शंखाचा नाद केला आणि त्यांनी केलेल्या शंखनादामुळे काय परिणाम झाले, याचे वर्णन श्रीमद्भगवदगीतेच्या पहिल्या अध्यायात विविध श्लोकांत आले आहे.

तस्य सञ्जनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान् ।। – भगवद्गीता, अध्याय १, श्लोक १२

अर्थ : कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्याेधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला.

पितामह भीष्म सज्जन आणि धर्मपरायण असूनही त्यांनी महाभारतात अधर्माची साथ दिली. त्यांनी सिंहगर्जना करून शंखनाद केल्याने कौरवांना तात्कालिक अवसान मिळाले, आनंद झाला; परंतु अंती त्यांचा पराभवच झाला, तसेच आज अनेक बुद्धीजीवी सज्जन अधर्मी लोकांची बाजू घेतांना दिसतात. त्यांच्या सहकार्यामुळे अधर्मी लोकांची बाजू वरचढ दिसत असली, तरी त्यांचेही अवसान आज ना उद्या गळून पडणारच आहे.

ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ।। – भगवद्गीता, अध्याय १, श्लोक १४

अर्थ : यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णाने आणि पांडवानेही (अर्थात् पांडुपुत्र अर्जुनानेही) दिव्य शंख वाजवले.

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ।। – भगवद्गीता, अध्याय १, श्लोक १५

अर्थ : श्रीकृष्णाने ‘पांचजन्य’ नावाचा, अर्जुनाने ‘देवदत्त’ नावाचा आणि भयानक कृत्ये करणार्‍या भीमाने ‘पौण्ड्र’ नावाचा मोठा शंख फुंकला.

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ।। – भगवद्गीता, अध्याय १, श्लोक १६

अर्थ : कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने ‘अनंतविजय’ नावाचा आणि नकुल अन् सहदेव यांनी ‘सुघोष’, तसेच मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले.

काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ।। 

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक् ।। – भगवद्गीता, अध्याय १, श्लोक १७ आणि १८

अर्थ : श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी, हे राजा, सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले.

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ।। – भगवद्गीता, अध्याय १, श्लोक १९

अर्थ : त्या भयानक आवाजाने आकाश आणि पृथ्वीला दुमदुमूनत कौरवांची अर्थात् आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली.

‘भगवद्गीते’च्या वरील श्लोकात भगवान श्रीकृष्णाने आणि पांडवांनी केलेल्या शंखनादाचा परिणाम विषद केला आहे. यावरून त्याच्या भीषणतेची कल्पना येईल. जेव्हा पांडवांच्या बाजूने शंखनाद झाला, तेव्हा धृतराष्ट्राच्या पुत्रांची (कौरवांची) मने विदीर्ण झाली, ज्यामुळे त्यांचे मनोबल प्रारंभीलाच तुटले. ही धर्माची शक्ती आहे.

५. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची निष्पत्तीही हीच आहे !

इंद्रप्रस्थ येथे होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा अनेक धार्मिक अन् राष्ट्रप्रेमी लोकांचा संघटित शंखनादच आहे. या शंखनादाला अनेक संतांनी श्रीकृष्णाचे प्रतिरूप म्हणून संबोधलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाचे दैवी अधिष्ठान आहे. या महोत्सवात प्रखर राष्ट्रप्रेमी वक्ते त्यांच्या जाज्वल्य भाषणांतून सर्वांना चेतना प्रदान करत आहेत. त्यामुळे हा महोत्सवही धर्म आणि राष्ट्र प्रेमी यांना नवोन्मेष प्रदान करणारा अन् धर्मविघातक, तसेच राष्ट्रद्रोही लोकांच्या मनात धडकी भरवणारा ठरेल, याची निश्चिती आहे !’

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम. (२९.११.२०२५)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.