शबरीमला मंदिरातील सोयीसुविधांविषयी केरळ उच्च न्यायालयाकडून स्वत:हून नोंद !

१. शबरीमला मंदिरातील उत्सवांच्या वेळी सरकारने भाविकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्याविषयी केरळ उच्च न्यायालयाचा आदेश

केरळ येथील शबरीमला मंदिर हे ८०० वर्षे जुने असून तेथे सहस्रो भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराला आणि देवतेला अगदी रामायणकालीन संदर्भ मिळतात. हिंदु देवतेचे मंदिर, म्हणजे प्रचंड अशी गर्दी हे समीकरण बनलेले आहे. या वेळी भाविक भक्त कोट्यवधी रुपयांचे दान मंदिराला देतात. अशी भारतभरातील सर्व मोठी मंदिरे त्या त्या राज्य सरकारांनी अधिग्रहीत केलेली आहेत. मंदिराचे व्यवस्थापन पहाणारे सरकारी कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांच्याकडून सरकारी शिरस्त्याप्रमाणे भक्तांच्या सोयीसुविधांकडे हमखास दुर्लक्ष होते. केरळतील शबरीमला मंदिराचा कारभार ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ पहाते. शबरीमला मंदिरात नोव्हेंबरमध्ये (मल्याळम् पंचागाप्रमाणे) ‘मंडलम्’ नावाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जानेवारीतही ‘मकर विलक्कू’ हा उत्सव तितकाच भव्य प्रमाणात साजरा जातो. या उत्सवांचा विषय केरळ उच्च न्यायालयाने स्वतःहून हाताळला. ‘या उत्सवांमध्ये रसायनमिश्रित कुंकू वापरू नये, तसेच उत्सवांच्या वेळी भाविकांच्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधांकडे सरकार, प्रशासन आणि त्रावणकोर देवस्वम् बोर्ड यांनी लक्ष द्यावे’, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला. यासमवेतच ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ आणि रेल्वे खाते यांनाही अनेक सूचना केल्या.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

२. केरळ उच्च न्यायालयाकडून रसायनमिश्रित कुंकवावर बंदी घालण्याचा आदेश

‘पेटॉपथूलाल’ उत्सवाच्या वेळी एक पारंपरिक नृत्य होते. त्या वेळी भक्त त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात विविध रंग लावतात. त्यात कुंकवाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. भाविकांची श्रद्धा अशी आहे की, भगवान अय्यपाने महेशी या राक्षसिणीशी युद्ध करून तिचा नाश केला, त्या विजयाच्या प्रित्यर्थ अशा प्रकारचे नृत्य केले जाते. भाविक भगवान अय्यप्पाच्या आभूषणाची भव्य शोभायात्रा काढतात. त्यात भक्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. हा प्रवास ९० किलोमीटरचा असतो. ते डोक्यावर पोटली ठेवून देवाला नैवेद्य अर्पण करतात.

जानेवारीत मकरसंक्रांतीच्या काळात आकाशात दिव्य असा एक तारा चमकतो. त्याला ‘मकरज्योती’ असे म्हणतात. या उत्सवाच्या काळात न्यायालयाने ‘रसायनमिश्रित कुंकू वापरण्यास बंदी घाला’, असा स्पष्ट आदेश प्रशासनाला दिला. ‘एक तर अशा प्रकारचे रसायनमिश्रित कुंकू हे मानवी जीवनाला अपायकारक आहे, तसेच त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो’, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. उच्च न्यायालय म्हणते, ‘ज्या पद्धतीने असे रसायनमिश्रित कुंकू सिद्ध होते, ते मानवी जीवासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कुंकू करणार्‍या आस्थापनावर बंदी घाला, विकणार्‍यांवर बंदी घाला आणि पुजारी, भक्त भाविक यांना रसायनमिश्रित कुंकू देऊ नका.’

३. केरळ सरकार आणि ‘त्रावणकोर देवस्वम बोर्ड’ यांनी भाविकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देणे आवश्यक !

यासमवेतच या यात्रेच्या वेळी दोन्ही उत्सवांमध्ये रेल्वे खात्याने पुरेशा गाड्या उपलब्ध करून भाविकांची उत्तम अशी सोय बघावी. भक्तांना प्यायला पाणी, रहाण्यासाठी भक्तनिवास, भुकेसाठी अन्न उपलब्ध करून द्यावे, तसेच त्यांच्या आरोग्याची पडताळणी करण्यासाठी पुरेशी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. सहस्रो भाविक एखाद्या मंदिरात एकत्र येतात, त्या वेळी फार मोठ्या प्रमाणावर कचरा केला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्वरेने व्यवस्था करावी. हा कचरा गाडण्याचा प्रयत्न करतात, हा प्रकार यावर्षी होता कामा नये’, असेही उच्च न्यायालयाने सांगितले.

शबरीमला मंदिरातील उत्सवाच्या वेळी संपूर्ण भारतातील अय्यप्पा देवतेचे भक्त ४१ दिवस कडक व्रत करून त्यांचा सहभाग नोंदवतात. त्या वेळी साम्यवादी केरळ सरकार, प्रशासन, पोलीस आणि ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ यांनी स्वतःहून भाविकांची सोय बघितली पाहिजे. यासाठी प्रत्येक वेळी न्यायालयाचा आदेश कशासाठी लागतो ?, हे कळत नाही. या गोष्टी हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, याची अनिवार्यता लक्षात आणून देतात.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२.१२.२०२५)