काय लाभ ?

‘१९ वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत रेखे याचा देशाला काय लाभ ?’,असा प्रश्न विचारणार्‍यांनी फक्त पाठांतर पद्धतीचा अभ्यास केला, तरी अचंबित व्हायला होईल. ‘पाठांतर, घोकंपट्टी रेटून काही लाभ नाही; आधी अर्थ समजून घ्यायला हवा’, हा विचार फार घातक आहे. ज्या वयात पाठांतर करण्याची शक्ती असते, त्याच वयात ते करावे लागते. अर्थ समजून घेण्यासाठी आयुष्यही पुरत नाही. ख्रिस्ती मिशनरी आणि ब्रिटीश लेखक यांनी लिहिलेल्या द्वेषपूर्ण अन् चुकीच्या लिखाणास प्रमाण मानून हिंदु संस्कृतीला हीन समजणारे स्वाभिमानशून्य विचारवंत हाच प्रश्न विचारतात, ‘काय लाभ ?’

वेदमूर्ती देवव्रत रेखे

१. वेदपठणाच्या ११ पद्धती 

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

वेदपठणाच्या एकूण ११ पद्धती आहेत, ज्या प्रकृती आणि विकृती या २ भागांत विभागलेल्या आहेत. मूलभूत, नैसर्गिक असलेल्या प्रकृती पाठांतर्गत संहिता (सर्वांत मूळ आणि सामान्य क्रम पाठ करणे), पद पाठ (संहितेतील प्रत्येक शब्द किंवा पद वेगळे करून अन् विराम देऊन पाठ करणे) आणि क्रम पाठ (शब्द जोड्यांमध्ये पाठ करणे). याखेरीज ८ विकृती पाठ आहेत. या ८ विकृती, म्हणजे पालट (चुकीचे किंवा नकारात्मक नव्हे) करून पाठ करणे. विकृती पाठांतर्गत जटा (शब्दांची उलट-सुलट मांडणी करून पाठ करणे), माला (शब्दांना एका विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा माळेसारखे जोडून पाठ करणे), शिखा (शिखेसारखी रचना असलेली आणि शब्दांचा क्रम वर-खाली करत पाठ करणे), रेखा (शब्दांची विशिष्ट पद्धतीने रेषेसारखी मांडणी करून पाठ करणे), ध्वज (ध्वजाच्या आकाराप्रमाणे शब्दांची मांडणी करत पाठ करणे), दंड (दंड किंवा काठीच्या सरळ रेषेप्रमाणे एक विशिष्ट क्रमात पाठ करणे), रथ (रथाच्या चाकाप्रमाणे शब्दांचा क्रम चक्राकार ठेवत पाठ करणे) आणि घन (शब्दांची अत्यंत गुंतागुंतीची रचना आणि अनेक दिशांनी ती पाठ करणे) या आहेत. या सर्व ११ पद्धतींनी सहस्रो वर्षांपासून वेदांचे मूळ स्वरूप आणि अचूक उच्चारण जतन केले आहे. या पद्धती केवळ पाठांतरासाठीच नव्हे, तर मंत्रांचे व्याकरण, स्वर आणि अर्थ न पालटता ते जसेच्या तसे पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी सिद्ध केल्या गेल्या होत्या.

२. सती प्रथा असल्याचे खोटे भासवण्यासाठी ब्रिटिशांनी श्लोकात केलेले चुकीचे पालट

याचा लाभच हवा असेल तर सांगतो,

सती अपवादात्मक असतांना तिला प्रथा म्हणून सिद्ध करण्याचा आणि वेदकाळापासून ती प्रचलित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न हेन्री थॉमस कोलब्रूक यांनी वर्ष १७९५ मध्ये केला. त्यांनी

इ॒मा नारी॑रविध॒वाः सु॒पत्नी॒राञ्ज॑नेन स॒र्पिषा॒ सं वि॑शन्तु । 
अ॒न॒श्रवो॑ऽनमी॒वाः सु॒रत्ना॒ आ रो॑हन्त॒ं जन॑यो॒ योनि॒मग्रे॑ ।। – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १८, ऋचा ७

अर्थ : प्रेतासह जाणार्‍या स्त्रिया, ज्यांचे पती जिवंत किंवा युवा आहेत, त्यांनी आणि विधवा झालेल्या स्त्रीने जलाशयासमीप जाऊन डोळे, तोंड धुवावे आणि पुन्हा स्वस्थ होऊन घरी जावे.

ही ऋचा अंत्येष्टी (अंत्यसंस्कार) विधीत वापरली जाते, तो चक्क पालटला. ‘अग्रे’ (पुढे जा) हा शब्द पाटलून तिथे ‘अग्ने (अग्नीत जा)’ हा शब्द घातला. ‘हे विधवे, तू अग्नीप्रवेश कर’, असा अर्थ करून ‘सती जाण्याची आज्ञा वेदात आहे’, असे भासवले. या सर्व पाठांतर पद्धतीतून वेदाध्ययन केलेल्या विद्वानांनी ही अपकीर्ती उघड केली. त्यामुळे विलियम जोन्स यांनी मंत्राचे भाषांतर चुकल्याचे सांगितले. संस्कृतचे विद्वान एच्.एच्. विल्सन यांनी सायणाचार्यांप्रमाणे त्याचा खोटारडेपणा जगासमोर आणला. हे केवळ त्या पाठपद्धतीमुळे शक्य झाले. अन्यथा लिहिलेले असते, तर त्यात पालट करून तेच आमच्या माथी मारले गेले असते.

याच्याच पुढील मंत्रात –

उदी॑र्ष्व नार्य॒भि जी॑वलो॒कं ग॒तासु॑मे॒तमुप॑ शेष॒ एहि॑ ।
ह॒स्त॒ग्रा॒भस्य॑ दिधि॒षोस्तवे॒दं पत्यु॑र्जनि॒त्वम॒भि सं ब॑भूथ ।। – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १८, ऋचा ८

अर्थ : हे स्त्रिये, तू उठ, जिवंत लोकांच्या जगात परत ये. ज्याच्याजवळ पडून तू शोक करत आहेस, तो मृत झाला आहे. (तुझे) पत्नीपण आता संपले आहे, तरी तू घरी राहून संसार कर.

असा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतांनाही ‘सती ही प्रथा होती’, असे सांगत जो भंपकपणा केला जातो, तो किळस आणणारा आहे.

३. स्वाभिमानशून्यांना काय म्हणावे ?

आता तर ‘विधवा प्रथा’ नामक बिनडोक प्रकार चालू झाला आहे. ‘विधवा होणे, ही अवस्था आहे. ती प्रथा कशी होऊ शकते’, हा साधा विचारही या विचारवंतांना सुचत नाही. ‘प्रथा म्हणून संस्कृतीस एकदा हीन ठरवायचेच’, असे ठरवले की, मग अपवादासही नियम करणे ओघाने आलेच. याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. ही आपली संस्कृती आहे. ना ती ब्राह्मणी आहे, ना बाहेरून आलेल्या युरेशियन आर्यांची आहे, ना ती बहुजनविरोधी आहे. उलट यातील अनेक सूक्ते आज ज्यांना बहुजन म्हटले जाते, अशा ऋषींनीच रचलेली आहेत. ‘ती परंपरा, ती संस्कृती जशास तशी जतन करण्याचा लाभ काय ?’, असे विचारणार्‍या स्वाभिमानशून्यांना काय म्हणावे, तेच कळत नाही.

– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा. (९.१२.२०२५)