देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर या कालावधीत असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने…
द्वापरयुगातील इंद्रप्रस्थमध्ये सर्वांत सुंदर राजवाडे आणि सभागृह होते. पांडवांनी त्यांचे गुरु आणि मित्र असलेले वासुदेव कृष्ण यांच्या साहाय्याने यमुनेच्या किनार्यावर योग्य ठिकाणी इंद्रप्रस्थ शहर निर्माण केले होते. शहरात सुनियोजित वस्ती, करमणुकीची क्षेत्रे आणि बाजारपेठा होत्या. इंद्रप्रस्थ हे उद्यान, जलस्रोत, वनस्पती आणि प्राणी यांनी सुशोभित केलेले होते. त्यात राजेशाही घरे, धार्मिक पुरुष, व्यापारी आणि कामगार यांच्यासाठी निवासस्थाने होती. ते अत्यंत पुरोगामी आणि श्रीमंत अशा राज्यात आनंदाने रहात होते.
वास्तूतज्ञ मय याने नेत्रदीपक सभागृह सिद्ध केले होते आणि खांडवप्रस्थ येथील जंगलातील आगीतून त्याचा जीव वाचवणार्या पांडवांना त्याने भेट म्हणून दिले होते. पांडवांना त्यांचे काका, म्हणजेच कौरवांचे राजा धृतराष्ट्र यांनी दिलेल्या राज्याचा वाटा असलेल्या या ओसाड वनभूमीचे श्रीकृष्ण, पांडव आणि मय यांनी रूपांतर केले. द्रुपदाच्या शक्तीशाली पांचाल राज्याची राजकुमारी द्रौपदी हिच्याशी पांडवांचा विवाह झाल्याचे कळल्यावर धृतराष्ट्राने राज्य विभाजित करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मुलांनी विशेषतः दुर्योधन आणि पांडव यांनी स्वतंत्रपणे राज्य करावे, हे त्याला शहाणपणाचे वाटले. त्यामुळे त्याने कुरु राज्यावरील दाव्यावरून त्यांची सततची स्पर्धा थांबवली. पांडवांना साधारणपणे सध्याच्या बागपत, इंद्रपत, पानिपत, सोनीपत आणि तिलपत यांचा समावेश असलेली ५ क्षेत्रे देण्यात आली होती. कुरु राज्याच्या विभाजनाने युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांची शक्तीशाली राजधानी असलेल्या ‘इंद्रप्रस्थ’ या शहराला जन्म दिला. इंद्रप्रस्थची भव्यता आणि समृद्धी हेवा वाटण्याजोगी होती. सभागृहाच्या उद्घाटनाला दूरदूरच्या सर्वांत शक्तीशाली शासकांची उपस्थिती होती, ज्यात प्राचीन भारत देशाचा आर्यवर्त समाविष्ट होता. यातून पांडव राज्याचा प्रभाव आणि सामर्थ्य प्रतिबिंबित होते. पांडव हे प्राचीन काळातील सर्वांत शक्तीशाली शासकांपैकी एक होते आणि इंद्रप्रस्थ ही सर्वांत प्रतिष्ठित राजधानी होती. हे आकर्षक शहर कुठे आहे ? ते खरोखर अस्तित्वात आहे, हे मला कसे कळले ? याविषयीची माहिती येथे देत आहे.

१. देहलीच्या प्राचीनतेविषयी पर्यटकांना अप्रत्यक्ष चुकीचा समज करून देणे
नवी देहली येथील मथुरा रस्त्यावरून फिरतांना कोणतीही पर्यटक गाडी तुम्हाला सुंदर नगर आणि प्रगती मैदानावर घेऊन जाते. देहली प्राणीसंग्रहालय परिसरात ‘पुराना किल्ला’ या जुन्या संरचनांचे अवशेष आहेत. आता उंच तुटलेल्या तटबंदी आणि दरवाजे यांच्यापुरते मर्यादित असलेल्या या भव्य आवारातील प्राचीनता आणि इतिहास काय आहे ? आपल्यापैकी किती जणांना ठाऊक आहे की, येथील दृश्यमान अवशेष हुमायू आणि शेरशाह सुरी यांच्या काळापेक्षा जुने नाहीत, तर ते प्रत्यक्षात प्राचीन भारतीय शहर इंद्रप्रस्थवर अधिष्ठित आहे. देहली येथे जाणार्या पर्यटकाला सहसा लाल किल्ला, हुमायूचा मकबरा आणि कुतूबमिनार यांच्याभोवती फिरवले जाते. पर्यटक ‘देहली इ. स.१२ व्या शतकापेक्षा जुनी नाही’, असा समज घेऊन परत जातो. एका इतिहासकाराला या भागातील तुटलेल्या भिंती, दरवाजे आणि अवशेष हे ठिकाण क्वचितच काहीशे वर्षे जुने आहे, असे आभास देतात.
२. देहलीतील दृश्यमान अवशेषांखाली दडलेला प्राचीन संस्कृतीचा इतिहास

एक पुरातत्वशास्त्रज्ञ सांगेल की, येथील उभ्या संरचना मथुरा रस्त्याच्या सभोवतालच्या भूमीच्या पातळीपेक्षा कित्येक मीटर उंच असलेल्या एका प्राचीन टेकडीवर आहेत. ही टेकडी प्रथम बाबरचा मुलगा हुमायू आणि नंतर हुमायूकडून इंद्रप्रस्थ जिंकल्यानंतर शेरशाह सुरीने बांधलेल्या तटबंदीच्या भिंतीद्वारे लपवली गेली आहे. शेरशाह सुरीने हुमायूचे शहर उद्ध्वस्त केले आणि येथे स्वतःचे शेरगढ शहर बांधले. जरी आपण शेरगढचे काही भाग पाहिले असले, तरी याच्या पुष्कळ खाली पूर्वीच्या संस्कृतीचा दडलेला आणि अशांत असा खरा इतिहास आहे. इंद्रप्रस्थ हे कर्तव्यनिष्ठ शासकांचे शहर होते. अनेक विजयांमुळे उद्ध्वस्त झाले असले, तरी केवळ महाभारत आणि इंद्रपत यांच्यामध्येच नव्हे, तर शिलालेख आणि इतर प्रामाणिक ऐतिहासिक संदर्भ यांद्वारे त्याच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक पुरावा देत, तसेच कागदपत्रांमध्येही इंद्रप्रस्थचा दर्जा कायम आहे.
इंद्रप्रस्थ हे आपल्या सध्याच्या राजधानीचे पहिले शहर आहे. पांडवांनी केवळ या नेत्रदीपक शहराची स्थापना केली नाही, तर कुरुक्षेत्रातील दुःखद युद्धानंतर बराच काळ त्यावर राज्यही केले. इ.स.च्या दुसर्या शतकात भारताला भेट देणारे प्रसिद्ध अलेक्झेंड्रीया येथील भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी भारताच्या नकाशात इंद्रबारा (इंद्रपथ) जवळ आणि मदुराई किंवा मथुरा अन् बटान कैसरा किंवा स्थानेश्वर (थानेश्वर) यांच्या मध्यभागी ‘दैदला’ असे लिहिले आहे.
३. उत्खननात सापडलेली राखाडी रंगाची भांडी हा इंद्रप्रस्थ महाभारतकालीन असल्याचा पुरावा
दक्षिणेकडे, तसेच पुराना किल्ला आणि हुमायूचे थडगे यांच्या मध्ये एक खुले क्षेत्र आहे, जिथून बरीच रंगीत राखाडी भांडी उचलली गेली होती. येथेच सर्वांत जुनी वसाहत चालू झाली, जी इसवी सन पूर्वीची आहे. इसवी सन पूर्व १ सहस्र वर्षे ही वसाहत थोडी उत्तरेकडे, आता पुराना किल्ल्याने वेढलेल्या भागात स्थलांतरित करण्यात आली. प्रा. बी.बी. लाल यांच्या मते हस्तिनापूर, मथुरा, कुरुक्षेत्र, कांपिल्य आणि इंद्रप्रस्थ या सर्व महाभारताच्या स्थळांना दर्शवणारी रंगीत राखाडी भांडी ही सर्वांत जुनी सामान्य मातीची भांडी आहेत. वरील पुरावे हे स्पष्टपणे सिद्ध करतात की, पुराना किल्ला आणि त्याचा परिसर हे महाभारत काळातील इंद्रप्रस्थचे प्रतिनिधित्व करतात.
खरेतर वर्ष १९४७ पर्यंत पुराना किल्ल्याच्या आत ‘इंद्रपत’ म्हणून ओळखले जाणारे एक छोटेसे गाव असायचे. हे नाव प्राचीन इंद्रप्रस्थावरून घेतले गेले आहे. तेथे लक्ष न दिल्याने वर्ष १९५४-१९५५ च्या उत्खननात उघड झालेल्या प्राचीन संरचना आता पूर्णपणे भग्नावस्थेत आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने नुकत्याच केलेल्या उत्खननात कोणतीही खूण दिसून येत नाही, केवळ ‘उत्खनन केलेले ठिकाण’ असे लिहिलेले एक चिन्ह आहे.
पुराना किल्ल्यात पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेले ‘पेंटेड ग्रे वेअर’ संस्कृतीचे अवशेष

काळाच्या ओघात भूमीखाली दडलेल्या अमूल्य हिंदु वारसाकडे लक्ष देऊन त्याविषयी जागृती करण्याची आवश्यकता आहे !
– नीरा मिश्रा
४. बौद्ध ग्रंथांनुसार पुराना किल्ला परिसरात सर्वांत महत्त्वाच्या शहराचे नाव इंदापट्टा असणे !
सध्याच्या देहलीच्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या या सुनियोजित शहराचे मुख्य केंद्र पुराना किल्ला प्रदेशात होते. बौद्ध ग्रंथांनुसार या राज्यात अनेक शहरे आणि गावे होती. त्यात सर्वांत महत्त्वाचे होते ते इंदापट्टा. येथूनच युद्धथिल गोट्टाचा (वंशज) राजा धनंजय कोरब्या याने त्याच्या राज्यावर राज्य केले. इंदापट्टा शहराची व्याप्ती ७ संघांची (राज्यांची) होती. समकालीन जंबूदीपच्या ३ प्रमुख शहरांपैकी एक म्हणून त्याची नोंद होती (आर्. ई. फ्रायकेनबर्ग यांचे ‘दिल्ली थ्रू द एजेस’ पुस्तक, १९८६)
५. विविध कागदपत्रांमध्ये पुराना किल्ला आणि आसपासच्या भागांची ‘इंद्रपथ’ म्हणून नोंद
पुराना किल्ला हे सत्तेचे प्रतीक होते, हे भारतीय इतिहास विश्लेषकांना ठाऊक आहे. त्यानंतरच्या शासकांना किंवा आक्रमणकर्त्यांना ते त्यांचे नियंत्रणस्थान बनवायचे होते. या महत्त्वाच्या प्रदेशावरील त्यांचा अधिकार सिद्ध करण्यासाठी ते एक स्थान होते; परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे प्राचीन भारताच्या गौरवशाली वारसावर त्यांचा अधिकार सिद्ध करण्यासाठी होते. इंद्रप्रस्थची सत्यता प्राचीन ग्रंथांमध्ये, तसेच मोगल आणि ब्रिटीश काळातील लिखाणांमध्ये चांगल्या प्रकारे नोंदवली गेली आहे. इंद्रप्रस्थकडे दुर्लक्ष झाले; परंतु १३ व्या शतकातील एका शिलालेखात ‘परगण’ म्हणून त्याचे अस्तित्व उघड झाले आहे. अबुल फजलच्या ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये उल्लेख आहे की, हुमायूने त्याला (अबुल फजलला) इंद्रप्रस्थला त्याचा किल्ला बांधण्यासाठी नेले होते. १८५७ च्या उठावाच्या कालावधीतील नकाशा, वर्ष १८८३-८४ चे ‘देहली गॅझेटियर’, ‘भारतीय महसूल सर्वेक्षण १८७७ चा नकाशा’, ‘इम्पीरियल सिटी’च्या नोंदी आणि वर्ष १९११-१२ ची अधिसूचना, हे येथे नाव दिलेले काही नकाशे आहेत, ज्यांमध्ये पुराना किल्ला आणि त्याच्या आसपासच्या भागांची ‘इंद्रपथ’ म्हणून नोंद आहे.

६. ‘देहली थ्रू द एजेस’ या पुस्तकात ‘इंद्रप्रस्थ हे यमुना नदीच्या तीरावरील प्रमुख शहर’ असल्याचा उल्लेख
आर.ई. फ्रायकेनबर्गने त्याच्या ‘देहली थ्रू द एजेस’ या पुस्तकात म्हटले आहे, ‘या पूर्वीचा काळ आणि अवकाश यांच्या संदर्भातील आठवणी केवळ महाकाव्यांमध्ये आणि पुराणांमध्ये अन् बौद्ध जाटकांच्या कथांमध्ये जतन केल्या जात नाहीत, तर आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या ठिकाणांच्या नावांविषयीच्या मौखिक परंपरांमध्येही जतन केल्या जातात. तपशीलवार तथ्ये अजूनही भूमीगत दडलेली असू शकतात.’ ते पुढे सांगतात, ‘हे शहर यमुना नावाच्या नदीच्या काठावर वसलेले होते. त्याच्या भोवती तटबंदी, मनोरे आणि त्याच्या बाहेर खंदक होते. हे शहर समकालीन वाराणसी या शहराशी रस्त्याद्वारे जोडले गेलेले होते. शहरात उद्याने, तलाव, सार्वजनिक स्मारके आणि मनोरंजन केंद्रे होती. येथे विद्वान ब्राह्मण, व्यापारी आणि कुशल कारागीर असे तज्ञ लोक रहात होते. इंद्रप्रस्थ या मुख्य शहरापासून फार दूर नसलेली बाजारपेठ, शहरे आणि इतर उपवसाहती होत्या.’
प्रा. बी.बी. लाल यांच्या प्रायोगिक उत्खननात ६ व्या-७ व्या शतकातील रचना सापडणे

वर्ष १९५४-५५ मध्ये भारतीय पुरातत्वशास्त्राचे प्रमुख प्राध्यापक बी.बी. लाल यांनी पूर्वेकडील तटबंदीच्या भिंतीतील वॉटर गेटकडे जाणार्या मार्गाच्या बाजूने प्रायोगिक उत्खनन केले. तेथे त्यांना वरपासून खालच्या दिशेने अनुक्रमे राजपूत, गुप्त, कुशाण, शुंग आणि ‘नॉर्दन ब्लॅक पॉलिश वेअर (उत्तर भारतातील लोहयुगातील एक महत्त्वपूर्ण कालखंड)’ कालखंडातील इसवी सन पूर्व ६ व्या-७ व्या शतकातील शेवटची रचना सापडली. चाचणीत पुढे असे दिसून आले की, ‘नॉर्दन ब्लॅक पॉलिश वेअर’च्या पातळीच्या खाली, रंग लावलेल्या ‘ग्रे वेअर’ (राखाडी रंगाची भांडी) संस्कृतीचे अवशेष आहेत, ज्यापैकी काही त्यांच्यावर काढलेल्या संरचनांमुळे फारसे उघड होऊ शकले नाही.
– नीरा मिश्रा
७. इंद्रप्रस्थ हे महाभारत काळातील प्राचीन शहर
आपल्यापैकी किती जणांना ही तथ्ये ठाऊक आहेत किंवा इंद्रप्रस्थमध्ये हेवा वाटावी, अशी सुरक्षा व्यवस्था आणि रुंद रस्ते होते, ज्यामुळे माणसांची अन् व्यापाराची सहज हालचाल शक्य झाली. महर्षि व्यास यांच्या महाभारतासह या प्रतिष्ठेच्या सत्तेच्या केंद्राचे मनोरंजक तपशील देहली अभिलेखागार देते. वर्ष २०१० मध्ये नवी देहली येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळांच्या वेळी हिंदु संस्कृती ५ सहस्र वर्षांहून अधिक जुनी आहे, असे सूचित करणारी विज्ञापने आम्हाला दिसली. इंद्रप्रस्थ हे त्या काळातील स्थळ आहे. आपण या अमूल्य वारसाविषयी जागरूक राहूया आणि त्याचा आदर करूया. प्राध्यापक बी.बी.लाल म्हणतात त्याप्रमाणे ‘कृपया माझ्याकडे दुर्लक्ष करू नका’, असा आक्रोश सर्वांत प्राचीन देहली करत आहे.
लेखिका : नीरा मिश्रा, अध्यक्षा, द्रौपदी ड्रीम ट्रस्ट, देहली.
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !