Shankhnad Mahotsav Delhi : देहलीमध्ये होणार ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद !

कधीकाळी सोन्याची खाण म्हणून ओळखला जाणारा भारत केवळ संपत्तीमुळे महान नव्हता, तर सनातन संस्कृती, धर्मनिष्ठ जीवनमूल्ये, शौर्य आणि न्यायाधिष्ठित राज्यकारभार यांमुळे तो विश्वगुरु बनला होता. आज भारत तांत्रिक आणि सामरिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतीय सैन्याने त्यांची शक्ती जगासमोर दाखवली आहे, तरीही देशासमोरची आव्हाने न्यून झालेली नाहीत. देश जितक्या वेगाने पुढे जात आहे, तितक्याच वेगाने बाह्य आणि आंतरिक शत्रूंची कारस्थानेही वाढत आहेत. अलीकडील देहलीतील बाँबस्फोटाने राष्ट्राच्या सुरक्षेला आणि एकतेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी केवळ दिखाऊ धर्मनिरपेक्षता आणि मतांसाठी होणारे लांगूलचालन देशाला अधिक कमकुवत करतील. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा विश्वकल्याणासाठी ‘सनातन राष्ट्र’ म्हणून उभे रहाणे, हीच आजच्या काळाची खरी आवश्यकता आहे !

१. ‘सनातन संस्थे’च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील एक विशेष पर्व

याच उद्देशाने ‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाऊंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि ‘सनातन संस्थे’च्या आयोजनात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा भव्य सोहळा १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या २ दिवसांमध्ये नवी देहलीतील ‘भारत मंडपम्’ (इंद्रप्रस्थ) येथे आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम ‘सनातन संस्थे’च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील एक विशेष पर्व असणार आहे.

श्री. अभय वर्तक

ही संधी अधिक महत्त्वाची ठरण्याचे आणखी एक कारण, म्हणजे देहली ही फक्त भारताची राजधानी नसून येथेच राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक निर्णयांची दिशा ठरते. येथून प्रसारित होणारा सनातन संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश संपूर्ण देशात प्रभावी प्रतिसाद निर्माण करील. यामुळे राष्ट्रीय एकता, शौर्य आणि नागरिक चेतना अधिक बळकट होईल. हा महोत्सव धर्मनिष्ठ जीवनमूल्यांचे महत्त्व अधोरेखित करील आणि अलीकडील आतंकवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजाला जागरूकता अन् सामूहिक सुरक्षा यांचा संदेश देईल.

२. राष्ट्रप्रेरणेचे स्वर

महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्र’ या विषयावर विशेष सत्र होईल. यामध्ये ‘नक्षलवाद, आतंकवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा’, या विषयांवर तज्ञांचे विचारमंथन होईल. भारताची संरक्षणनीती, संस्कृतीचे संवर्धन आणि राष्ट्रबळ सुदृढ करण्याचे उपाय यांवर सखोल चर्चा होईल.

३. ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेचे आवाहन

महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णाने धर्मयुद्धाची घोषणा शंखनादाने केली होती. त्याच दैवी प्रेरणेने सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ईश्वरी अधिष्ठानावर आधारित ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेचे ध्येय निश्चित केले आहे. देहलीतील हा ‘शंखनाद महोत्सव’ धर्मनिष्ठ समाजात आत्मशक्ती जागृत करून नवचैतन्य निर्माण करील आणि राष्ट्रसेवेसाठी एकत्र येण्याची प्रेरणा देईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३५ सहस्र संख्येने असलेल्या मूठभर मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य उभे केले. जेव्हा प्रत्येक सनातन धर्मीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘हिंदवी स्वराज्या’च्या आदर्शाने आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘सनातन राष्ट्रा’च्या पवित्र संकल्पाने प्रेरित होईल, तेव्हा हा ‘शंखनाद महोत्सव’ केवळ एक कार्यक्रम न रहाता राष्ट्ररक्षण, सामाजिक ऐक्य आणि संस्कृती यांना नवचैतन्य देणार्‍या नवयुगाचा प्रारंभ ठरेल.

– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था. (२०.११.२०२५)