Indigo Flight Crisis : ४ सहस्र रुपयांचे तिकीट ३० सहस्र रुपये होईपर्यंत तुम्ही काय करत होता ?

इंडिगोच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

नवी देहली – जेव्हा इंडिगो एअरलाइनच्या विमानांची उड्डाणे रहित झाली, तेव्हा सरकारने काय केले ? विमानांच्या तिकिटांच्या किमती ४-५ सहस्र रुपयांवरून ३० सहस्र रुपयांपर्यंत कशा पोचल्या? इतर एअरलाइन्सनी याचा लाभ कसा घेतला ? तुम्ही काय कारवाई केली ? तुमच्यामुळेच परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडली, अशा शब्दांत देहली उच्च न्यायालयाने इंडिगोच्या प्रकरणी केंद्र सरकारला फटकारले. इंडिगो संकटाची स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी आणि ज्या लोकांची विमान उड्डाणे रहित झाली किंवा जे विमानतळावर अडकले त्यांना हानीभरपाई द्यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने फटकारले.

पुन्हा असे होणार नाही, हे सरकारने सुनिश्चित करावे !

न्यायालयाने पुढे म्हटले की, हा केवळ वैयक्तिक प्रवाशांचा प्रश्न नाही, तर यामुळे आर्थिक हानीही झाली आहे. सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे की, भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही.

संपादकीय भूमिका

न्यायालयाने या प्रकरणी आता विमान वाहतूक आस्थापनांच्या तिकिटांच्या किमतीसाठी नियमावली लागू करण्याचा आदेश द्यावा, असेच जनतेला वाटते !