शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश करा ! – HD Kumaraswamy

केंद्रीय मंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली मागणी

केंद्रीय मंत्री एच्.डी. कुमारस्वामी

बेंगळुरू (कर्नाटक) – केंद्रीय धातू आणि अवजड उद्योग मंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून शाळांच्या अभ्यासक्रमात श्रीमद्भगवद्गीतेता समावेश करण्याची विनंती केली आहे. ‘गीतेतील निवडक श्लोकांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नीतीमत्ता, वैचारिक सुस्पष्टता आणि चारित्र्य निर्माण होईल’, असे कुमारस्वामी यांनी या पत्रात म्हटले आहे.

कुमारस्वामी यांनी पुढे म्हटले की,

भारत प्राचीन काळापासून संत, ज्ञान आणि टिकून आलेली संस्कृतीमूल्ये यांची भूमी आहे. सनातन धर्म ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या सार्वत्रिक आदर्शनुसार चालतो. भगवान विष्णूचा आठवा अवतार असणार्‍या श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेचे शाश्वत ज्ञान जगाला दिले आहे, ज्यामध्ये निष्काम कर्म आणि कर्तव्याचे प्रामाणिक अन् समर्पितपणे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले आहे. या मूल्यांचा सध्याच्या जागतिक वातावरणात मोठा अर्थ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच श्रीकृष्ण मठात श्रीमद्भगवद्गीता पठणाच्या कार्यक्रमात भाग घेतला, ज्यामुळे सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचा प्रसार झाला आहे. या कार्यक्रमाने गीतेचे पठण आणि त्यातून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली. स्थानिक नेते आणि पालक यांनीही शाळांमध्ये गीतेतील शिकवणीचा समावेश व्हावा, अशी मागणी केली आहे. मुलांना केवळ गाणीच नव्हे, तर रामायण आणि महाभारत यांचाही परिचय होणे तितकेच महत्त्वाचे आहे, असेही कुमारस्वामी यांनी शेवटी म्हटले.