आज ‘गीता जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
कौरव-पांडव यांच्यात कुरुक्षेत्रावर जे महायुद्ध झाले, त्याच्या आरंभी अर्जुनाने त्याच्या विरुद्ध लढणार्या सैन्यात आप्तस्वकीय पाहिले आणि त्याला विलक्षण दुःख झाले. त्याच्यातील लढण्याचा उत्साह मावळला. त्याचा हा विषाद बघता बघता पराकोटीला पोचला. त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने त्याच्या विषादाचे वर्णन करतांना त्याच्या मानसिक स्थितीचे ही वर्णन केले आहे. या विषादामुळे त्याचे मानसिक संतुलन कसे बिघडले आणि त्याचा त्याच्या शरिरावर कसा परिणाम झाला, तेही त्याने भगवान श्रीकृष्णांना सांगितले.

१. युद्ध न करण्याविषयी अर्जुनाला सांगितलेली कारणे आणि त्यावर श्रीकृष्णाने केलेला उपदेश

अर्जुन सांगतो,
अ. ‘सीदन्ति मम गात्राणि’, म्हणजे त्याचे अवयव गळून जात आहेत. असे एखाद्याचे अवयव गळून जाणे, हे भयाचे लक्षण आहे.
आ. ‘मुखं च परिशुष्यति’, म्हणजे तोंडाला कोरड पडली आहे. अशा प्रकारे तोंडाला कोरड पडणे, हे मानसिक ताणाचे लक्षण आहे.
इ. ‘वेपथुश्च शरीरे मे’, म्हणजे शरिराला कंपास सुटला आहे. शरिराला कंपा सुटणे, हे असाहाय्यतेचे लक्षण आहे.
ई. ‘रोमहर्षश्च जायते’, म्हणजे अंगावर रोमांच उभे रहात आहेत. अंगावर रोमांच उभे रहाणे, हे मानसिक आघाताचे लक्षण आहे.
उ. ‘गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते’, म्हणजे हातातून गांडीव धनुष्य गळून पडते आहे. अशा प्रकारे हातातील वस्तू सहजतेने गळून पडणे, हे निराशेचे लक्षण आहे. अंगाचा दाह होत आहे. असा अंगाचा दाह होणे, हे चिंताग्रस्त असल्याचे लक्षण आहे.
ऊ. ‘न च शक्नोम्यवस्थातुं’ अर्जुन सांगतो की, तो उभाही राहू शकत नाही. याचा अर्थ अर्जुनाने त्याचा आत्मविश्वास गमावला आहे.
ए. ‘भ्रमतीव च मे मन:’ त्याचे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. मन भ्रमिष्टासारखे होणे, ही संभ्रमावस्था आहे.
अशा प्रकारे अर्जुनाने स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेचे वर्णन करून सांगितल्यावर त्याने युद्ध न करण्याची १८ कारणे पहिल्या अध्यायातील श्लोक ३१ ते ४६ या १६ लोकांमधून सांगितली आहेत.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला क्षत्रियाच्या कर्तव्याविषयी करून दिलेली जाणीव
भगवद्गीतेच्या दुसर्या अध्यायातील श्लोक ३१ ते ५३ या २३ श्लोकात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला क्षात्रधर्माचे महत्त्व समजावून सांगतांना ‘क्षत्रियाने त्याचा धर्म सोडू नये’, असे मार्गदर्शन केले आहे. क्षत्रियाने धर्मयुद्ध केले नाही, तर क्षत्रियाला त्याच्या कीर्तीला मुकावे लागते आणि त्यामुळे तो पापी ठरतो. एवढेच नाही, तर जगात त्याची अपकीर्ती होते आणि ती सन्माननीय पुरुषाला मरणापेक्षाही अधिक दुःख देणारी असते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निक्षून सांगतात,
‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ।। – भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ३७
अर्थ : युद्धात तू मारला गेलास, तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास, तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा रहा.’
याचाच अर्थ प्रत्येक माणसाने स्वतःचे कर्तव्य कर्म, म्हणजेच स्वधर्म कोणत्याही परिस्थितीत आचाराला पाहिजे. कर्तव्याकडे पाठ फिरवून जीवन जगणे, हे महान पातक असून ते अपकीर्तीला कारणीभूत ठरते.
भगवान श्रीकृष्णाने स्वर्ग परायण मनुष्याच्या स्वभावाचे वर्णन करून अशा प्रकारच्या माणसांवर जोरदार टीका केली आहे. भोग आणि ऐश्वर्य यांविषयी आसक्ती बाळगणे, हे पाप आहे; कारण अशा प्रकारची आसक्ती असलेल्या माणसाची परमात्म्याविषयी निश्चय बुद्धी असत नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
अर्जुनाच्या या मानसिक अवस्थतेकडे भगवान श्रीकृष्णाने दयार्द बुद्धीने पाहिले नाही. उलट त्यांनी अर्जुनाला कठोर शब्दांत खडसावले, ‘हे अर्जुना ! या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला ? कारण हा थोरांनी न आचारलेला, स्वर्ग मिळून न देणारा आणि कीर्तीकारकही नाही; म्हणून हे पार्था, षंढपणा करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा ! अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून दे आणि युद्धाला उभा रहा.’
२. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्म्याच्या अमरत्वाविषयी केलेले विवरण
अर्जुन हा स्वतःची निर्माण झालेली समस्या कोणत्या कारणामुळे निर्माण झाली, हे नेमकेपणाने जाणणारा होता. म्हणून त्याने भगवान श्रीकृष्णाला सांगितले, ‘माझ्या मनात करुणा निर्माण झाल्यामुळे माझी वीरवृत्ती हा जो माझा मूळ स्वभाव आहे, तो नाहीसा झाला आहे. धर्म-अधर्म याचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा; कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. (भगवद्गीता, अध्याय, २ रा श्लोक ७ वा)
अर्जुनाने अशा प्रकारे पूर्ण शरणागती पत्करल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेच्या दुसर्या अध्यायात श्लोक ११ ते ३० या २० श्लोकांमधून मृत्यू संकल्पना स्पष्ट करून सांगितली आहे. (या ११ व्या श्लोकांपासूनच गीता उपदेशाला प्रारंभ झाला आहे.) ही संकल्पना स्पष्ट करून सांगतांना आत्म्याचे अमरत्व अधोरेखित केले आहे. गीता अध्याय, दुसरा श्लोक १८ ते २७ या १० श्लोकांत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
‘आत्मा अविनाशी असल्यामुळे मोजता न येणार्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरिरे नाशवंत आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो हा आत्मा मेला, असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत; कारण हा आत्मा वास्तविक पहाता कुणाला मारत नाही आणि कुणाकडून मारला जात नाही. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही, तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही; कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले, तरी हा मारला जात नाही.
सध्याच्या स्थितीला भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सर्व विश्वाला मार्गदर्शक !
हतबल अवस्थेतून बाहेर पडून धर्माच्या बाजूने कसे उभे रहावे, याविषयी आजही ते तत्त्वज्ञान सर्व विश्वाला मार्गदर्शक आहे. आजची प्रत्येकाची स्थिती ही हतबल होण्यासारखीच झाली आहे. समाजाने आणि शासनकर्त्यांनी गीतेचा आधार घेऊन त्याप्रमाणे कृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ‘आत्मोद्धारासाठी, म्हणजेच भगवंताच्या प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. असा मनुष्य अत्यंत दुर्मिळ आहे’, हे ‘भगवद्गीता’ सांगते.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
हे पार्थ ! जो पुरुष हा आत्मा नाशरहित नित्य न जन्मणारा आणि न पालटणारा आहे, हे जाणतो, तो कुणाला कसा ठार करवील किंवा कुणाला कसा ठार करील ? ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुनी शरिरे टाकून दुसर्या नव्या शरिरात जातो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही; कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि नि:संशय वाळवता न येणारा आहे, तसेच हा आत्मा नित्य सर्वव्यापी अचल स्थिर रहाणारा आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त आहे, अजिंक्य आहे आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते; म्हणून हे अर्जुना, हा आत्मा या विवरणात सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाहीस; पण जर तू आत्मा नेहमी जन्मणारा आणि मरणारा, असे मानत असशील, तरीसुद्धा हे महाबाहो ! तू अशा प्रकारे शोक करणे योग्य नाही; कारण असे मानल्यास त्यानुसार जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू निश्चित आहे. मेलेल्याला जन्म निश्चित आहे; म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी तू शोक करणे योग्य नाही.’
३. स्वतःतील सद्गुणांची वाढ करण्यासाठी गीतेचा अभ्यास महत्त्वाचा !
गीतेच्या या दुसर्या अध्यायातील श्लोक ५५ ते ७२ या १८ श्लोकांत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत. गीता जाणून घेतांना स्वतःला या आणि अशा सर्व बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देत गीतेचा अभ्यास करावयाचा आहे. स्वतःतील सद्गुणांची वाढ करून दुर्गण आणि दोष दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठी गीतेचा अशा प्रकारे अभ्यास स्वतःला उपयुक्त ठरणार आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (२९.११.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?