हिंदु अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणार्‍या धर्मांध बाबासाहेब बाणदार याला अटक !

पोलीस निरीक्षकांकडून तक्रार घेण्यास विलंब !

पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना १. भाजपचे आमदार श्री. राहुल आवाडे

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २५ नोव्हेंबर – दुकानात आलेल्या ६ वर्षीय हिंदु बालिकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी धर्मांध बाबासाहेब बाणदार (वय ५८ वर्षे) यांना पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर शहापूर पोलिसांनी अटक केली. ही अटक होण्याच्या पूर्वी प्रारंभी पोलीस प्रशासनाने पीडित बालिकेच्या आईची तक्रार न घेता तिला रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तिष्ठत ठेवले होते. ही गोष्ट कळताच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्र्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या प्रसंगी भाजपचे आमदार श्री. राहुल आवाडे, स्थानिक नागरिक, पीडित बालिकेची आई यांनी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी विलंब केल्याचा आरोप करत सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.

१. संशयित बाबासाहेब बाणदार यांच्या घरीच किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात आलेल्या ६ वर्षांच्या बालिकेला स्पर्श करत त्यांनी तिच्याशी अयोग्य वर्तन केले. या संदर्भात बालिकेच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सगळा प्रकार सांगितला.

२. प्रारंभी या संदर्भात बालिकेची आई शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता तिची कोणतीच नोंद घेण्यात आली नाही. तक्रार प्रविष्ट करून घेण्यासाठी बालिकेच्या आईला वारंवार पोलिसांच्या विनवण्या कराव्या लागल्या. हा प्रकार समजल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री शिवजी व्यास, बाळासाहेब ओझा, सुजित कांबळे, प्रवीण सावंत, अमित कुंभार, किसन शिंदे, दादा भाटले, रणजित अनुसे यांसह अन्य उपस्थित होते.

३. ‘पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना २ दिवसांत निलंबित न केल्यास पीडितेचे नातेवाईक, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, शहापूर ग्रामस्थ यांच्यासह सामाजिक संघटना शहापूर पोलीस ठाण्याच्या द्वारात ठिय्या आंदोलन करतील’, अशी चेतावणी भाजपचे आमदार श्री. राहुल आवाडे यांनी दिली. (गुन्हा नोंद करण्यात दिरंगाई करणार्‍या पोलीस निरीक्षकांच्या विरोधात जर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर ते प्रशासनासाठी निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठांनी तात्काळ नोंद घेऊन योग्य ती कृती करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

भाजपचे आमदार श्री. राहुल आवाडे यांनी पोलीस उपअधीक्षक विक्रम गायकवाड यांना शहापूर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि सामाजिक संघटना, तसेच भागातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे कशा प्रकारे सातत्याने सहकार्य करत नाहीत हे सांगितले. या प्रसंगी आमदार श्री. राहुल आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. त्यावर पोलीस उपअधीक्षक गायकवाड यांनी या प्रकरणी वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली.

संपादकीय भूमिका

राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना निश्चितच असे प्रकार होणे अपेक्षित नाही, तर संबंधित दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे !