Khalistan Referendum : कॅनडात खालिस्तान जनमतसंग्रहाचा फज्जा : केवळ ६ टक्के शिखांचा सहभाग !

पंतप्रधान मोदी यांना ‘मारून टाका’ अशी दिली घोषणा !

ओटावा (कॅनडा) – दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जी-२० देशांच्या शिखर परिषदेत भारत आणि कॅनडा यांच्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी झाल्या. उभय देशांमध्ये व्यापारावर ऐतिहासिक करार झाले. तथापि कॅनडातील खालिस्तानवादी हे जनमतसंग्रहाच्या माध्यमातून पंजाबला भारतापासून वेगळे करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. २३ नोव्हेंबरला ओटावा येथे यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला. तसेच पंतप्रधान मोदी आणि प्रशासकीय अधिकारी यांना ‘मारून टाका’ अशी घोषणा देण्यात आली. अशात केवळ ६ टक्के शीख नागरिक सहभागी झाल्याचे स्वत: या खलिस्तानवादी आतंकवाद्यांनी मान्य केले आहे.

१. ‘खालिस्तान रेफरेंडम (जनमत चाचणी)’ या नावाने आयोजित मतदानात ‘पंजाब राज्याला भारतातून वेगळे करून एक नवीन स्वतंत्र देश खालिस्तान बनवला जावा का ?’, असा प्रश्न विचारला जात होता.

२. लोक सकाळपासून सायंकाळपर्यंत पिवळ्या रंगाचे खालिस्तानचे ध्वज हातात घेऊन अनुमाने २ किलोमीटर लांब रांगेत उभे होते.

३. खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने या भारतद्वेष्ट्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

४. आयोजकांचा दावा आहे की, ओंटारियो, अल्बर्टा, ब्रिटीश कोलंबिया आणि क्यूबेक प्रांतांमधून ५३ सहस्रांहून अधिक शीख मतदान करण्यासाठी आले होते. गंमत अशी की, हा आकडा कॅनडाच्या एकूण शीख नागरिकांच्या केवळ ६ टक्के आहे.

५. या वेळी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने अमेरिकेतून उपस्थित खलिस्तानवाद्यांना संबोधित केले.

६. भारत सरकारने या आयोजनाला अवैध ठरवले आणि म्हटले की, हे भारताच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तानवादाद्वारे पंजाबला भारतापासून वेगळे करण्याचा पाकसमर्थित प्रयत्न कॅनडात होत आहे. तथापि तेथे पैसे देऊनही केवळ ६ टक्केच शीख त्यात सहभागी होतात, हेच या भारतद्वेष्ट्या मोहिमेचे फलित !