Sindh Remark : अशी विधाने हिंदुत्वाची मानसिकता उघड करतात ! – पाकची प्रतिक्रिया

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या ‘सिंध भारताला पुन्हा मिळू शकतो’ या विधानावर पाकची प्रतिक्रिया !

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी देहली / इस्लामाबाद – आज मी त्यांचे (लालकृष्ण अडवाणी यांचे) एक विधान सांगत आहे. आज सिंधची भूमी भारताचा भाग भलेही नसेल; पण संस्कृतीच्या दृष्टीने सिंध नेहमीच भारताचा भाग रहील. आता राहिली गोष्ट भूमीची, तर ‘सीमा कधी पालटेल ?’, हे कुणीही सांगू शकत नाही; कारण उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतो. सिंधु नदीला पवित्र मानणारे आपले सिंधचे लोक नेहमीच आपले असतील; मग ते कुठेही असले तरी, असे विधान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २३ नोव्हेंबरला केले होते. त्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, अशी विधाने ही प्रस्थापित झालेल्या वास्तविकतेला आव्हान देऊ पहाणारी हिंदुत्वाची मानसिकता उघड करतात आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे, मान्यता मिळालेल्या सीमा आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे स्पष्टपणे उल्लंघन करणारी आहेत.

संपूर्ण भारतातील हिंदू सिंधु नदीला पवित्र मानतात !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सिंधी समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पुस्तकाचा उल्लेख करत म्हटले की, अडवाणी यांच्या पिढीतील अनेक सिंधी हिंदूंना ‘सिंध भारतापासून वेगळा झाला’ हे स्वीकारणे आजही कठीण जाते. पाकिस्तानची निर्मिती वर्ष १९४७ च्या फाळणीमुळे झाली आणि सिंधु नदीच्या बाजूचा सिंध प्रदेश तेव्हापासून पाकिस्तानचा भाग आहे. मी आज या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी यांचाही उल्लेख करू इच्छितो. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की, सिंधी हिंदूंनी विशेषतः त्यांच्या पिढीतील लोकांनी आजही सिंध प्रांत भारतापासून वेगळा होणे स्वीकारलेले नाही. केवळ सिंधमध्येच नाही, तर संपूर्ण भारतात हिंदू सिंधु नदीला पवित्र मानतात आणि सिंधमधील काही मुसलमानही सिंधु नदीला पवित्र मानत होते. असेही म्हटले जायचे की, सिंधूचे पाणी मक्केच्या ‘आब-ए-जमजम’पेक्षाही (मक्का येथील जमजम विहिरीचे पाणी) अल्प पवित्र नाही. हे अडवाणींचे वाक्य आहे’, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

  • पाकमधील ‘जय सिंध मुत्तहिदा महाज’ संघटनेचे आवाहन !

  • भारताने सिंधच्या स्वातंत्र्यासाठी गंभीर भूमिका घ्यावी !

इस्लामाबाद येथील ‘जय सिंध मुत्तहिदा महाज’ या संघटनेने राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. संघटनेचे प्रमुख शफी बुरफत यांनी म्हटले की, ‘सिंध प्रांत भविष्यात भारताशी जोडला जाऊ शकतो’, असे सांगणारे हे विधान आमच्यासाठी आनंददायी आहे. सिंध राष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीने या भूमिकेला मनापासून पाठिंबा दिला आहे. स्वतंत्र सिंधुदेश भारताशी संघराज्यासारखे नाते टिकवू शकतो. सिंध भारताचा भाग बनण्याची शक्यता हे ऐतिहासिक सूत्र आहे. आमचे मार्गदर्शक साईं जी.एम्. सैयद यांनी मांडलेली सिंधची राष्ट्रीय भूमिका आम्ही पुन्हा अधोरेखित करतो. परस्पर आदर, स्वायत्तता आणि सांस्कृतिक जोडणी या पायावर भारताशी एक संघात्मक करार करण्यास आम्ही सिद्ध आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याच दिशेने पाठिंबा मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे सिंधच्या मुक्तीच्या लढ्याला नवे बळ मिळेल. भारताने सिंधच्या स्वातंत्र्यासाठी गंभीर भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.

सिंधची सांस्कृतिक ओळख

शफी यांच्या मते सिंध ही केवळ सिंधी समाजाचीच नव्हे, तर प्राचीन संस्कृतींचीही भूमी आहे. इथूनच भारतीय उपखंडाच्या नावाचा उगम झाला. प्राचीन मानवी संस्कृतीच्या आरंभीच्या संस्कृती येथे फुलल्या. सिंधची सांस्कृतिक मुळे पूर्वीपासून भारताशी जोडलेली असून धर्मीय किंवा राजकीय प्रभावामुळे ती कधीच अरबी किंवा तुर्की परंपरांशी एकरूप झालेली नाहीत.

सिंध राष्ट्रवाद्यांना नव्या आशेचा किरण !

शफी बुरफत यांनी सांगितले की, वर्ष १९४७ मध्ये सिंध प्रांतातील लोकांना फसवून आणि दबावाखाली पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले. आज त्याची भाषा, सांस्कृतिक वारसा आणि ओळख धोक्यात आली आहे. पाकिस्तान शासन सतत सिंधच्या अस्तित्वाला तडे देत आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेने सिंध राष्ट्रवाद्यांना नव्या आशेचा किरण मिळाला आहे.

शफी यांच्या मते भविष्यात स्वतंत्र सिंधुदेश भारताशी संघात्मक नाते प्रस्थापित करील. हे पाऊल दोन्ही प्रदेशांमधील ऐतिहासिक नाते नव्याने दृढ करण्यास साहाय्य करील. यासाठी सिंधुदेश राष्ट्रीय विचारमंथन आयोग स्थापन करण्याची आवश्यकता आहे, ज्यात सिंधचे अभ्यासक, भारतातील राजकीय कार्यकर्ते आणि परदेशात रहाणार्‍या सिंधी व्यक्तींचा समावेश असावा.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वाची मानसिकताच सिंध आणि सिंधु नदी यांना पुन्हा भारतात आणू शकते, हे पाकलाही ठाऊक झाले आहे. ही घटना लवकरच घडो, अशीच हिंदुत्वनिष्ठांची इच्छा आहे; कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगून ठेवल्याप्रमाणे ‘सिंधुविना हिंदु अपूर्ण आहे !’