Dr. Mohanji Bhagwat : हिंदूंचे अस्तित्व नष्ट झाले, तर जगही नष्ट होईल !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे मणीपूरमध्ये दिशादर्शन

इंफाळ (मणीपूर) – भारत एक अमर समाज आणि संस्कृती यांचे नाव आहे. अन्य संस्कृती आल्या, चमकल्या आणि निघून गेल्या (अस्त झाला). या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिला. तथापि आपण आजही आहोत, भविष्यातही राहू. याचे कारण आपण समाजाचे एक मूळ जाळे बनवले आहे. त्यामुळे हिंदु समाज अस्तित्वात राहील. हिंदू राहिला नाही, तर जग रहाणार नाही. याचे कारण हिंदु समाजच जगाला वेळोवेळी धर्माचा योग्य अर्थ सांगतो आणि मार्गदर्शन करत असतो. हे आपल्याला ईश्वराने दिलेले कर्तव्य आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. प.पू. भागवत मणीपूर दौर्‍यावर आहेत.

 प.पू. सरसंघचालक यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !


१. जगातील सर्वच देशांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती ओढवली. काही देश त्यात नष्ट झाले. यूनान, इजिप्त आणि रोम हे सगळे नष्ट झाले.

२. प्रत्येक समस्येचा अंत शक्य आहे. जेव्हा समाजाने ठरवले की, नक्षलवाद सहन करायचा नाही, तसा त्याचा अंत होत आला आहे.

३. ब्रिटीश साम्राज्यात सूर्यास्त होत नसे; पण भारतात त्यांच्या सूर्यास्तास आरंभ झाला. त्यासाठी आपण वर्ष १८५७ ते १९४७ अशी ९० वर्षे प्रयत्न केले. दीर्घकाळ स्वातंत्र्यासाठी आपण लढत होतो.

४. देशाने कधी कुणावर अवलंबून राहू नये. आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे ‘आत्मनिर्भर’ असली पाहिजे. आपल्याकडे आर्थिक, सैनिकी, तसेच ज्ञान क्षमता असली पाहिजे. ती वाढायला हवी. देश सुरक्षित आणि समृद्ध राहिला पाहिजे.