वास्तूपुरुषाची जन्मकथा !

‘वास्तूशास्त्रा’ची माहिती देणारी लेखमाला : भाग ३

‘मत्स्यपुराणा’मध्ये २५२ व्या अध्यायात वास्तूपुरुषाच्या जन्माची कथा दिलेली आहे. या कथेतून वास्तूमध्ये निर्माण झालेली विविध पदे, वास्तूमधील वास्तूपुरुषाचे स्थान आणि त्याचे अवयव यांविषयी असलेले वास्तूशास्त्राचे नियम स्पष्ट होतात. यासाठी आपण ही कथा जाणून घेऊया.

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/976969.html

१. असा झाला ‘वास्तूशांती यज्ञा’स प्रारंभ !

१ अ. करालमुख पुरुषाची भूक शमत नसल्याने त्याने तपस्या करून भगवंताकडे वर मागणे : अंधकासुर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाशी घनघोर युद्ध करून भगवान शिवाने त्याचा वध केला. या युद्धामध्ये झालेल्या श्रमामुळे शिवाच्या कपाळावरून एक घर्मबिंदू (घामाचा थेंब) पृथ्वीवर पडला. त्या घर्मबिंदूपासून करालमुख अशा एका अद्भुत पुरुषाचा जन्म झाला. जन्मत: तो अतिशय क्षुधाक्रांत (भुकेने व्याकूळ) असल्याने त्याने मृत अंधकासुराला खाल्ले, तरी त्याची भूक शमेना. शेवटी त्याने शिवशंकराला प्रार्थना केली. कठोर तपस्या करून तो भगवंताकडे वर मागू लागला, ‘क्षुधा शमन करण्यासाठी सप्तलोक, सप्तपाताळ, तसेच संपूर्ण ब्रह्मांडाला भक्षण करून माझी भूक शमवावी.’

श्री. श्रेयस पिसोळकर

१ आ. देव-दानव यांनी दाबून धरल्याने वास्तूपुरुषाने देवादिकांना प्रार्थना करणे आणि त्यानंतर ब्रह्मादी देवतांनी त्याला मार्गदर्शन करणे : महादेव त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन ‘तथास्तु’ म्हणाले आणि सर्व विश्वात हाहा:कार उडाला. देव-दानव यांना त्यांच्या पुढील भविष्याचा अंदाज आला. सर्व जण भयभीत झाले. सर्वांनी एकत्र येऊन निश्चय केला आणि महादेवाचा वर प्राप्त झालेल्या पुरुषाला सर्व शक्तीनिशी पालथे पाडले. त्याचे डोके ईशान्येला आणि पाय नैऋत्येला असे त्यास दाबून धरले. काही देव-दानव त्याच्या विविध अवयवांवर बसले. देवदानवादिकांनी जेथे वास्तूपुरुषाला दाबून धरले होते, त्या ठिकाणीच ते वास्तव्य करू लागले आणि तो ‘वास्तूपुरुष’ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्या स्थितीमध्ये त्याने देवादिकांना प्रार्थना केली,

अवष्टब्धेन तेनापि विज्ञप्ता: सर्वदेवता: ।
प्रसीदध्वं सुरा: सर्वे युष्माभिर्निश्चलीकृत: ।।

स्थास्यामहं किमाकारो ह्यवष्टब्धो ह्यधोमुख: ।
ततो ब्रह्मादिभि: प्रोक्तं वास्तुमध्ये तु यो बलि: ।।

आहारो वैश्वदेवान्ते नूनमस्य भविष्यति ।
वास्तूपशमनो यज्ञस्तवाहारो भविष्यति ।।

यज्ञोत्सवादौ च बलिस्तवाहारो भविष्यति ।
वास्तुपूजामकुर्वाणस्तवाहारो भविष्यति ।।

अज्ञानात् तु कृतो यज्ञस्तवाहारो भविष्यति एवमुक्तस्ततो ह्यष्ट: स वास्तुरभवत् तदा ।
वास्तुयज्ञ: स्मृतस्तस्मात् तत: प्रभृति शान्तये ।। – मत्स्यपुराण, अध्याय २५२, श्लोक १५ ते १९

अर्थ : ‘हे देवतांनो, प्रसन्न व्हा ! तुम्ही मला दाबून धरल्यामुळे मी निश्चल झालो आहे. पालथ्या स्थितीमध्ये मी किती काळ राहू शकेन ? कृपा करावी.’ त्याच्या या निवेदनानंतर ब्रह्मादी देवतांनी त्याला सांगितले, ‘वास्तूच्या प्रसंगी, तसेच वैश्वदेवाच्या अंती जो बळी दिला जातो, तो निश्चितच तुझा आहार होईल. वास्तूशांतीसाठी जो यज्ञ होईल, तोही तुला आहार रूपामध्ये प्राप्त होईल. यज्ञोत्सवामध्ये जो बळी दिला जातो, तोही तुला प्राप्त होईल. जे वास्तूपूजा करत नाहीत, तेही तुला आहाररूपात प्राप्त होतील. अज्ञानाने केलेला यज्ञही तुला प्राप्त होईल.’

हे ऐकल्यावर वास्तूपुरुष प्रसन्न झाला, तेव्हापासून ‘वास्तूशांती यज्ञा’स प्रारंभ झाला.

२. वास्तूशांती करण्याचे महत्त्व !

वरील श्लोकामध्ये ‘जे वास्तूपूजा करणार नाहीत, तेसुद्धा तुझा आहार होतील’, असे ब्रह्मादी देवांनी वास्तूपुरुषाला म्हटले आहे. यावरून वास्तूशांती करण्याचे महत्त्व लक्षात येते. वास्तूशांती न करता मनुष्य वास्तूत राहिल्यास निश्चितच तो वास्तूपुरुषाच्या भक्षस्थानी पडेल, म्हणजेच कोणत्याही शुभकर्माचे फल त्यास प्राप्त होत नाही, तसेच वास्तूपुरुषाच्या अवकृपेने कष्ट भोगावे लागतात.

३. वास्तूनिर्मिती आणि वास्तूपुरुष !

या कथेचा मतितार्थ असा की, कष्ट करून घाम गाळल्याविना वास्तू निर्माण होणे सहजासहजी शक्य नाही. वास्तूनिर्मितीसाठी देवशक्ती (बुद्धीजीवी काम करणारे, उदाहरणार्थ अभियंते, विशारद इत्यादी) आणि दैत्य प्रवृत्ती (शारीरिक श्रमाची कामे करणारे) अशा दोन्ही शक्तींची आवश्यकता असते. दोन्हींच्या साहाय्याविना वास्तूनिर्मिती शक्य नाही. दोन्ही प्रकारच्या शक्तींच्या एकत्रिकरणाचे द्योतक, म्हणजे वास्तूपुरुष होय !

४. वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र

वास्तूशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचेच एक अंग आहे. वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा परस्परांशी असलेला संबंध पुढील उदाहरणातून समजून घेऊया. भ्रमणभाषमधून आपल्याला समोरच्या व्यक्तीचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नसेल, तर त्यामागे २ कारणे असू शकतात, एक म्हणजे ‘रेंज’ची अडचण (ध्वनीलहरी पोचण्यात मर्यादा) असते किंवा भ्रमणभाषचा ध्वनीवर्धक बिघडलेला असतो. त्यामुळे आपण तो तज्ञांकडे नेऊन दुरुस्त करून घेतो; परंतु ‘रेंज’चीच अडचण असेल, तर आपण काहीच करू शकत नाही. आपली मूळ जन्मकुंडली ही मनोर्‍याच्या (टॉवरच्या) ‘रेंज’प्रमाणे असते. त्यामध्ये आपण पालट करू शकत नाही; परंतु वास्तू ही भ्रमणभाष संचाप्रमाणे असते, आपण त्यामध्ये दुरुस्ती करून किंवा वेळप्रसंगी आपण ती पालटू शकतो.

५. वास्तू लाभदायी होण्यासाठी लक्षात घेण्याची सूत्रे !

कुंडली म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहस्थितीचा नकाशा होय. त्यामध्ये आपल्याला पालट करता येत नाहीत. ती आयुष्याच्या शेवटपर्यंत तशीच रहाते; पण वास्तूमध्ये आपण अनुकूल पालट करून ती लाभदायी करून घेऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की, एखादी वास्तू शुभ करून घेतली, तर त्यामध्ये रहाणार्‍या सर्वांनाच १०० टक्के चांगले परिणाम मिळतील; पण त्याचा लाभ आपल्याला पुढील पद्धतीने होऊ शकतो.

अ. कुंडलीमधील काळ आणि वास्तूही अनुकूल असेल, तर त्यांचा एकत्रित परिणाम निश्चितच शुभ फलदायी असतो.

आ. जर कुंडलीचा चालू काळ खराब असेल आणि वास्तूही दोषपूर्ण असेल, तर मिळणार्‍या वाईट परिणामांची तीव्रता अधिक वाढलेली दिसून येते.

इ. जर कुंडलीतील काळ चांगला आहे; पण वास्तू सदोष आहे, तर कुंडलीमुळे मिळणारे चांगले परिणाम आपण वास्तूमध्ये असेपर्यंत आपल्याला अपेक्षित असे मिळणार नाहीत.

ई. याउलट जर काळ खराब आहे; पण वास्तू निर्दाेष आहे, तर आपल्याला निदान त्या काळातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी बळ प्राप्त होते. संघर्ष करण्यास बळ मिळते. यामुळे वास्तू निर्दाेष करणे आणि काही दोष असतील, तर त्यांचे निवारण करणे, हे नक्कीच स्वतःच्या हातात असते.

(लेखासाठी वापरण्यात आलेले संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश, मत्स्यपुराण)

– श्री. श्रेयस पिसोळकर, वास्तू विशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न; फोंडा, गोवा.

भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/981617.html