वास्तूशास्त्राचा इतिहास !

‘वास्तूशास्त्रा’ची माहिती देणारी लेखमाला !

सध्या बरेच बांधकाम व्यावसायिक ‘आमच्या सदनिका वास्तूशास्त्राप्रमाणे निर्माण केलेल्या आहेत’, असा सर्रास प्रसार करतांना दिसतात; पण खरोखरच ती वास्तू वास्तूशास्त्राच्या कसोटीवर उतरते का ?, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणून वास्तूशास्त्राविषयी सर्वांना प्राथमिक माहिती मिळावी, या उद्देशाने या लेखांच्या माध्यमातून माहिती मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ८ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वास्तूशास्त्राची उपयुक्तता’ वाचली. आज या लेखमालेचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(लेखांक २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/974771.html

१. विविध वेद-पुराणांमध्ये वास्तूशास्त्राचा उल्लेख असणे 

वास्तूशास्त्र हे अत्यंत प्राचीन शास्त्र आहे. विश्वातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तही वास्तूशास्त्राचा उल्लेख आलेला आहे. ऋग्वेदामध्ये गृहाला ‘वेश्म’ असे म्हटले आहे. अथर्ववेदामध्येसुद्धा गाव वसवण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. सर्व पुराणांमध्येही वास्तूशास्त्राचा उल्लेख आहे. ‘अग्निपुराण’, ‘मत्स्यपुराण’, ‘नारदपुराण’ आदींमध्ये भवन निर्माणाविषयी अतिशय सूक्ष्मतेने अभ्यास केला आहे. ‘अग्निपुराणा’त प्रासाद निर्मितीसाठी आधी भूमी परीक्षा करण्यास सांगितले आहे. वर्णानुसार कोणती भूमी लाभदायक आहे, याचेही मार्गदर्शन ‘अग्निपुराणा’त केले आहे. ‘भागवत महापुराणा’मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने विश्वकर्मांनी समुद्रामध्ये निर्माण केलेल्या द्वारकानगरीचेही वर्णन आलेले आहे. भारतामध्ये वास्तूशास्त्राचा अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे. भारताला वास्तूशास्त्रकारांची मोठी परंपरा लाभलेली आहे. ‘मत्स्यपुराणा’मध्ये १८ वास्तूशास्त्राच्या आचार्यांचा उल्लेख आलेला आहे.

२. वास्तूशास्त्रांचे १८ मार्गदर्शक !

भृगुरत्रिर्वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा ।
नारदो नग्नजिच्चैव विशालाक्ष: पुरंदर: ।।

ब्रह्मा कुमारो नन्दीश: शौनको गर्ग एव च ।
वासुदेवोऽनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति: ।।

अष्टादशैते विख्याता वास्तुशास्त्रोपदेशका: ।
संक्षेपेण उपदिष्टं यन्मनवे मत्स्यरूपिणा ।। – मत्स्यपुराण, अध्याय २५२, श्लोक २ ते ४

अर्थ : भृगू, अत्रि, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित्, विशालाक्ष, इंद्र, ब्रह्मा, कार्तिकेय, नंदीश्वर, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्राचार्य, बृहस्पति हे वास्तूशास्त्रांचे १८ मार्गदर्शक प्रसिद्ध आहेत. त्यातील वैवस्वत मनु यांना प्रलयकालात संक्षेपाने मत्स्यरूपात भगवंताने वास्तूशास्त्राचा उपदेश दिला होता.

श्री. श्रेयस पिसोळकर

३. कश्यप ऋषींच्या ‘शिल्प संहिता’ ग्रंथामधील लिखाण !

कश्यप ऋषींनी लिहिलेल्या ‘शिल्प संहिता’ या ग्रंथामध्ये ‘संपूर्ण निसर्गसृष्टी, म्हणजे वास्तू आणि त्यातील साधनांचा उपयोग करून सिद्ध केलेली प्रत्येक वस्तू म्हणजे वास्तू’, असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये केवळ मनुष्याच्या निवासस्थानाविषयी उल्लेख नसून मोठे दुर्ग, मोठी देवमंदिरे, विजयस्तंभ, नाट्यमंडप, स्पर्धा केंद्र, जनावरांची रहायची जागा, शस्त्रास्त्रनिर्मिती केंद्र, मूर्ती निर्मिती केंद्र, विहिरी या निर्माण होणार्‍या विविध रचना, म्हणजेच वस्तूंविषयीचे वर्णन करण्यात आले आहे. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांसारख्या ग्रंथांमध्येही वास्तूनिर्मितीविषयी उल्लेख आढळतात. कौटिल्यांचे ‘अर्थशास्त्र’, भरताचे ‘नाट्यशास्त्र’ यांमध्येही वास्तूनिर्मितीविषयी माहिती आढळते.

४. विविध प्राचीन ग्रंथांमध्ये आलेला वास्तूशास्त्राचा उल्लेख !

४ अ. ऋग्वेद : विश्वातील प्राचीन ग्रंथ असलेल्या ऋग्वेदामध्ये गृहाला ‘वेश्म’ म्हटले गेले आहे.

भोजस्येदं पुष्करिणीव वेश्म परिष्कृतं देवमानेव चित्रम् । – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १०७, ऋचा १०

अर्थ : उदार गृहस्थाचे कमळांनी भरलेल्या सरोवराप्रमाणे सुशोभित गृह हे देवतांना साजेसे असे आहे. या वाक्यामध्ये वास्तूच्या सुशोभिकरणाविषयी उल्लेख आहे.

वास्तोष्पते प्रति जानीह्यस्मान् त्स्वावेशो अनमीवो भवा न: ।
यत्त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शं नो भव द्विपदे चतुष्पदे ।। – ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५४, ऋचा १

अर्थ : हे वास्तूचे स्वामी, तुम्ही आम्हाला परिपूर्ण जाणता. या वास्तूमध्ये येऊन सदैव आपला वास असू द्या. आम्हाला आशीर्वाद देऊन सुख-समृद्धी प्रदान करा. आम्ही रोगमुक्त होवो, तसेच द्विपद (मनुष्य) आणि चतुष्पदांना (गायी, गुरे, पाळीव प्राणी) शांती प्रदान करा.

वरील ऋचेमध्ये वास्तोष्पतीला स्वास्थ्यप्रद आणि उन्नतीशील गृहासाठी प्रार्थना केली आहे, तसेच ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलामध्ये ‘क्षेत्रपती’ या देवतेला घराला धनधान्याने युक्त करण्याविषयी प्रार्थना केलेली आहे.

क्षेत्रस्य पतिना वयं हितेनेव जयामसि ।
गामश्वं पोषयित्न्वा स नो मृळातीदृशे ।। – ऋग्वेद, मण्डल ४, सूक्त ५७, ऋचा १

अर्थ : आम्ही क्षेत्रपतीच्या कृपेने कल्याणकारी मार्गाने विजय मिळवतो. ते क्षेत्र (भूमी) आमच्या गायी-घोड्यांना (संपत्तीला) पोषण देत राहो.

४ आ. अथर्ववेद : यात वास्तूमध्ये वास करणार्‍या अग्नि आणि विष्णु यांना घराला रत्न अन् धनाने युक्त करण्याविषयी प्रार्थना केलेली आहे.

अग्नाविष्णु महि तद्वां महित्वं पाथो घृतस्य गुह्यस्य नाम ।
दमेदमे सप्त रत्ना दधानौ प्रति वां जिव्हा घृतमा चरण्यात् ।। – अथर्ववेद, काण्ड ७, सूक्त २९, ऋचा १

अर्थ : हे अग्नि आणि विष्णु आपल्या दोघांचे मोठे महत्त्व आहे. आपण गुह्य अशा घृताचे पान करून घराघरांमध्ये सप्त रत्न प्रदान करा. त्यायोगे प्रत्येक यज्ञामध्ये आपली जिव्हा त्या ‘घृत’ (तूप) रसाची प्राप्ती करते.

या मंत्रामध्ये गृहाला ‘दम’ हा शब्द वापरण्यात आला आहे. मंत्रातील ‘दमे-दमे’, म्हणजे घराघरांत असा होतो. इंग्रजीच्या ‘Domestic’ या शब्दाचा मूळ संस्कृत शब्द ‘दम’ हा आहे.

४ इ. रामायण : राजा दशरथाच्या वेळी आपल्या राष्ट्र्रात वास्तूशास्त्र हे उंच शिखरावर होते. अयोध्यानगरीची रचना संपूर्ण वास्तूशास्त्रानुसार करण्यात आली होती. त्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

आयता दश द्वे च योजनानि महापुरी ।
श्रीमती त्रीणि विस्तीर्णा सुविभक्त महापथा ।।

राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता ।
मुक्तपुष्पावकीर्णेण जलसिक्तेन नित्यश: ।।

तां तु राजा दशरथो महाराष्ट्र्र विवर्धन: ।
पुरीमावासयामास दिवि देवपतिर्यथा ।।

कपाटतोरणवतीं सुविभक्तान्तरापणाम् ।
सर्वयन्त्रायुधवतीमुषितां सर्वशिल्पिभि: ।। – रामायण, बालकाण्ड, अध्याय ५, श्लोक ७ ते १०

अर्थ : ही महापुरी (अयोध्या) १२ योजन (६४ मैल, म्हणजे जवळपास ९६ कि.मी.) लांब आणि ३ योजन (१६ मैल, म्हणजे जवळपास २४ कि.मी.) रुंद होती. ज्यामध्ये योग्य पद्धतीने विभक्त केलेले महापथ असणारे राजमार्ग होते. त्यावर प्रतिदिन पाण्याचे प्रोक्षण आणि पुष्पवृष्टी व्हायची. त्या पुरीमध्ये राजा दशरथ इंद्राप्रमाणे रहायचे. त्या पुरीत कपाट, तोरण, सुविभक्त बाजार (वेगवेगळ्या वस्तूंनुसार विभाजन केलेला उदा. कपडे, मसाले, धान्य यांचा वर्गीकृत बाजार) होते, तसेच तेथे सर्व प्रकारचे यंत्र आणि आयुध होते.

राजा दशरथाकडून केल्या जाणार्‍या यज्ञांमध्ये यज्ञीय वास्तूशास्त्र (शुल्बशास्त्र) अनुसार यज्ञशाळा निर्माण केल्याची चर्चा दिसून येते. त्यात २१ खांब, विटा आणि २१ रत्नांचा वापर करण्यात आला होता. यज्ञमंडपाची शोभा वाढवण्यासाठी सुवर्णाने अलंकृत केले होते.

कारिता सर्व एवैते शास्त्रज्ञैर्यज्ञकोविदै: ।
शोभार्थं तस्य यज्ञस्य कांचनालङ्कृता भवन् ।।

एकविंशति यूपास्त एकविंशत्यरत्नय: ।
वासोभिरेकविंशद्भिरेकैकं समलङकृता: ।। – रामायण, बालकाण्ड, अध्याय १४, श्लोक २४, २५

अर्थ : राजा दशरथाने जे यज्ञमंडप उभारले, ते सर्व यज्ञशास्त्र जाणणार्‍या पंडितांनी (शास्त्रज्ञांनी) नियमानुसार बांधले. त्या यज्ञाच्या शोभेसाठी सर्व भवन (मंदिरे, मंडप इत्यादी) सोन्याच्या अलंकारांनी सजवली गेली. तेथे २१ यूप (यज्ञस्तंभ) उभारले गेले होते, जे २१ प्रकारच्या मौल्यवान रत्नांनी अलंकृत होते, आणि सुंदर वस्त्रांनी ते सुशोभित करण्यात आले होते.

४ ई. महाभारत : महाभारतामध्ये बर्‍याच ठिकाणी वास्तूशास्त्राचा वापर करत असल्याचा उल्लेख मिळतो. आपल्या शिष्यांना शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करण्यासाठी द्रोणाचार्यांनी रंगमंडप सिद्ध करून घेतला होता. तो सिद्ध करतांना त्यांनी वास्तूशास्त्राचा संपूर्ण वापर केला होता.

भारद्वाजो महाप्राज्ञो मापयामास मेदिनीम् ।
समामवृक्षां निर्गुल्मामुदक्प्रस्रवणान्वितम् ।।

तस्यां भूमौ बलिं चक्रे तिथौ नक्षत्रपूजिते ।
अवघृष्टे समाजे च तदर्थं वदतां वर: ।।

रङ्गभूमौ सुविपुलं शास्त्रदृष्टं यथाविधी ।
प्रेक्षागारं सुविहीतं चक्रुस्ते तस्य शिल्पिन: ।। – महाभारत, आदिपर्व, अध्याय १३३, श्लोक ८ ते ११

अर्थ : भारद्वाज ऋषींनी भूमी परीक्षा करून त्याचे मापन केले. त्या भूमीमध्ये वृक्ष, झाडे-झुडपे नव्हती. त्याचा उतार उत्तर दिशेकडे होता. द्रोणाचार्यांनी वास्तूपूजन पहाण्यासाठी दवंडी पिटवून अनेक विरांना आमंत्रित केले आणि उत्तम नक्षत्र असलेल्या तिथीला वास्तूपूजन केले. त्यानंतर त्यांच्या शिल्पकारांनी त्या रंगभूमीमध्ये (ज्या ठिकाणी प्रात्यक्षिके सादर केली जातात) वास्तूशास्त्रानुसार एका विशाल प्रेक्षकगृहाचा पाया रचला.

महाभारत काळामध्ये वास्तूशास्त्र भरपूर समृद्ध होते. लाक्षागृह प्रकरणावरून आपल्याला हे लक्षात येते. दुर्याेधनाने पुरोचनला चतु:शाला भवन निर्माण करण्याची आज्ञा दिली होती. त्यामध्ये तूप, तेल, तसेच लाख यांचा प्रयोग करण्यासाठी सांगितले गेले होते.

तत्र गत्वा चतु:शालं गृहं परमसंवृतम् ।
नगरोपान्तमाश्रित्य कारयेथा महाधनम् ।।

शणसर्जरसादीनि यानि द्रव्याणि कानिचित् ।
आग्नेयान्युत सन्तीह तानि तत्र प्रदापय ।।

सर्पिस्तैलवसाभिश्च लाक्षया चाप्यनल्पया ।
मृत्तिकां मिश्रयित्वा त्वं लेपं कुड्येषु दापय ।। – महाभारत, आदिपर्व, अध्याय १३२, श्लोक ८ ते १०

अर्थ : तेथे नगराच्या सीमेवर एक भव्य असे चतु:शाला भवन (४ दिशांनी असलेले मोठे भवन) भरपूर धनाचा उपयोग करून सिद्ध कर. तिथे साल, धूप इत्यादी जे ज्वलनशील द्रव्य आहेत ती तिथे आणून वापर. तूप, तेल आणि लाख यांचा भरपूर वापर करून माती मिसळून लेप सिद्ध कर आणि तो भिंतींवर लाव.

४ उ. अनेक पुराणे आणि स्मृतीग्रंथ यांच्यात वास्तूशास्त्राचा उल्लेख आहे. हिंदु धर्माच्या अन्य पंथांमध्येही वास्तूशास्त्राचा उल्लेख आहे. जैन संप्रदायामध्ये मंदिराच्या निर्माण कार्यासाठी प्राकृत भाषांमध्ये वास्तू ग्रंथांची निर्मिती करण्यात आली. प्राकृत भाषेत वास्तूतज्ञाला ‘थवई’ असे म्हटले गेले.

इजिप्तच्या पिरॅमिड्समध्ये काही ठिकाणी वैष्णव तिलक लावलेले कारागिरांचे चित्र आढळून आले आहे, म्हणजे ‘त्या पिरॅमिड्सची रचना करणारे भारतीय होते’, असे यातून लक्षात येते. त्याचप्रमाणे इटलीच्या व्हॅटिकन सिटीमध्ये उभे असलेली मोठमोठी शिवलिंगे आजही आपण पाहू शकतो. अमेरिकेच्या पुरातत्व उत्खननामध्ये श्री गणेशाची मूर्ती सापडलेली आहे.

वास्तूशास्त्राविषयीची अनेक ग्रंथसंपदा, संस्कृत, तसेच प्राकृत भाषेतील ग्रंथ मुसलमान आक्रमकांनी जाळून नष्ट केल्याने संपूर्ण विश्वाला उपयोगी असणारे ज्ञान नष्ट झाले, तसेच अनेक मंदिरांची तोडफोड केल्याने वास्तूकलेचे उत्तम उदाहरण असणारी अनेक मंदिरे नष्ट झाली.

५. वास्तूशास्त्राच्या शाखा 

वास्तूशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे; परंतु तो विशाल विषय आहे. त्यामुळे त्याच्याही अनेक शाखा आहेत. यज्ञीय वास्तूशास्त्र (शुल्बशास्त्र), गृहवास्तूशास्त्र, नगर (ग्राम) वास्तूशास्त्र, प्रासाद (देवालय) वास्तूशास्त्र, उद्यान वास्तूशास्त्र, जलाशय वास्तूशास्त्र, तसेच या व्यतिरिक्त विमानशास्त्र, यंत्र वास्तूशास्त्र या दोन्ही वास्तूशास्त्राच्याच शाखा आहेत.

(संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश, मयमतम्, समराङगणसूत्रधार, अपराजितपृच्छा, मानसार, वाल्मीकि रामायण, महाभारत)

– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा.

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/979214.html