‘वास्तूशास्त्रा’ची माहिती देणारी लेखमाला !
मागील लेखामध्ये आपण ‘मत्स्यपुराणा’तील वास्तूपुरुषाच्या जन्माची कथा वाचली. आता राष्ट्र आणि वास्तूशास्त्र यांचे शास्त्र जाणून घेऊया. ‘भूरेव मुख्यं वास्तु ।’, म्हणजे पृथ्वी ही मुख्य वास्तू आहे. वास्तूशास्त्राचे जे नियम आपल्या वास्तूला लागू होतात, तेच नियम या विश्वातील विविध भूखंडांनाही लागू होतात. प्रत्येक राष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आणि रचना यांचा तेथील विविध गोष्टींवर परिणाम होतो. परिणामी त्या राष्ट्रातील जनतेला त्याची फळे भोगावी लागू शकतात. विविध राष्ट्रांची रचना आणि भौगोलिक स्थिती यांचा वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केला, तर वास्तूशास्त्र हे संपूर्ण विश्वाला कसे लागू पडते, ते आपल्या लक्षात येईल.
(भाग ४)
भाग ३ वाचण्याकरिता क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/979214.html

१. भारत
अ. भारत देशाच्या ईशान्य दिशेला पाणी आणि खड्ड्यांऐवजी अतीविशाल हिमालय पर्वत निर्माण झाला आहे. ईशान्येला वास्तूपुरुषाचे शिर येते आणि तोच भाग न्यून झाल्याने वास्तूशास्त्राच्या अगदी विरुद्ध झाले आहे.
आ. भारताच्या पूर्वेला बंगालची खाडी आहे, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंद महासागर आहे. अर्थात् आग्नेय दिशेला पाणी असल्याने स्त्रियांना कष्ट असे फल आहे. नैऋत्येलाही पाणी असल्याने भारतावर आजपर्यंत अनेक आक्रमणे झाली आहेत.
इ. आधी भारताची पूर्व दिशा मोठी होती; परंतु आता म्यानमार, बांगलादेश हे देश भारताच्या नकाशात नाहीत. त्यामुळे भारताकडे आता पूर्वीप्रमाणे समृद्धता नाही. भारत देश पूर्व दिशेकडे झुकलेला आहे. यामुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक बाजू संपूर्ण विश्वावर प्रभाव टाकत रहातील.
ई. मुंबईच्या आग्नेय दिशेस ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’ आहे. आग्नेय दिशेचे तत्त्व हे अग्नितत्त्व आहे, तसेच मुंबईच्या पश्चिमेस वरुणाच्या दिशेला समुद्र आहे. या दोन्ही गोष्टी वास्तूशास्त्राप्रमाणे योग्य झाल्याने मुंबईची प्रगती उल्लेखनीय आहे.
उ. गोवा राज्याच्या ‘गोमंतक’ या वृत्तपत्रामध्ये १ जानेवारी २०२५ या दिवशीच्या दैनिकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘उत्तरेत धामधूम, दक्षिणेत सामसूम !’, असा त्याचा मथळा होता. गोव्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांच्या उपस्थितीविषयी माहिती देणार्या लेखाच्या मथळ्यावरून वास्तूशास्त्राचा नियम आपल्याला शिकायला मिळतो. उत्तर दिशा समृद्धीची आहे, तर दक्षिण दिशा संघर्ष आणि कष्ट देणारी आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या पर्यटकांचा ओढा उत्तरेकडे अधिक होता.
ऊ. काश्मीर राज्यामध्ये ईशान्य कोपरा चीनच्या कह्यात असल्याने वास्तूपुरुषाचे शिर त्या भागात येत असल्याने एकप्रकारे तो दोष निर्माण झाला आहे. परिणामी त्याचे अनिष्ट परिणाम काश्मीर राज्याला भोगावे लागतात.
२. जपान

अ. जपानचे क्षेत्रफळ जरी अल्प असले, तरी त्याची प्रगती कौतुकास्पद आहे; कारण त्याच्या ईशान्य भागात प्रशांत महासागर आहे.
आ. नैऋत्य आणि दक्षिण दिशा पाण्याने व्यापलेल्या असल्याने जपानला बर्याच वेळा भूकंपांना सामोरे जावे लागते.
इ. जपानची पूर्व बाजू बरीच मोठी आहे. त्यामुळे त्याची सातत्याने प्रगती होत असते. जपान ईशान्येकडे झुकलेला आहे.
ई. जपानची राजधानी टोकियो ही पूर्व दिशेस आहे. त्याच्या पूर्वेस प्रशांत महासागर आहे. हा वास्तूशास्त्राच्या दृष्टीने चांगला भाग आहे.
३. इंग्लंड
अ. देशाच्या पश्चिम दिशेला अटलांटिक महासागर आहे. ईशान्येला समुद्र आहे. इंग्लंडचा विस्तार पूर्व-उत्तर भागाकडे अधिक दिसून येतो. पूर्व बाजूची लांबी दक्षिण दिशेपेक्षा अधिक असल्याने त्याने सर्व जगावर राज्य केले.
आ. इंग्लंडची राजधानी लंडन आग्नेय दिशेस आहे. महानदी थेम्स ही पूर्वेस वहात जात आहे. लंडनच्या वायव्य खंडात प्राणीसंग्रहालय, रिजेन्टस् पार्क, सेंट जोसेफ वूड (जंगल) असून ते पूर्व-उत्तर बाजूकडे आहे, म्हणजे ती बाजू मोकळी आहे. ‘बीबीसी ऑफ लंडन’ हे वायव्य खंडात आहे.
इ. लंडनचे विद्यापीठ हे ईशान्य दिशेस आहे.
वरील सर्व गोष्टी वास्तूशास्त्राप्रमाणे असल्याने इंग्लंडने संपूर्ण जगावर त्याची छाप सोडली आहे.
४. उत्तर अमेरिका
अ. या देशाचा पूर्व भाग पश्चिम भागापेक्षा मोठा असून ईशान्य कोपरा वाढत गेलेला आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन पूर्वेस आहे; पण ईशान्य दिशेकडे असणार्या न्यूयॉर्क शहराने अधिक प्रगती केली आहे.
आ. अमेरिकेच्या पूर्व भागात उत्तर अटलांटिक समुद्र असून ईशान्य भागातही पाण्याची मोठमोठी सरोवरे आहेत. अमेरिकेच्या पश्चिम भागात अतीउंच पर्वत आहेत. यामुळे अमेरिकेची भौगोलिक रचना बर्यापैकी वास्तूशास्त्राप्रमाणे असल्याने त्याचा लाभ होऊन अमेरिका प्रगत राष्ट्र झाले आहे.
‘वास्तू वास्तूशास्त्राप्रमाणे आहे का ?’, याचा अभ्यास सर्वंकष करावा !
स्वतःची सदनिका ज्या इमारतीत आहे, त्याच्या रचनेचा परिणाम सदनिकेवर होत असतो. इमारतीत असणार्या पायर्यांची रचना, पाण्याची टाकी, वाहनतळ, ‘सेप्टिक टँक’ (मलकुंड) आदींचा परिणामही वास्तूवर होत असताे; म्हणून ‘एखादी वास्तू वास्तूशास्त्राप्रमाणे आहे का ?’, याविषयी अभ्यास करतांना मुख्य सोसायटी, इमारत, सदनिका या तिन्ही दृष्टींनी अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा किंवा उपाययोजना करतांना तिन्ही गोष्टींचा विचार व्हायला हवा.
– श्री. श्रेयस पिसोळकर
५. वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तू बांधून संबंधित परिणामांना सामोरे जाण्याची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक !
वरील सूत्रे भौगोलिक दृष्टीने राष्ट्रावर परिणाम करणारी आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या गावात रोगाची साथ पसरली, तर गावातील सर्वांचाच रोगामुळे मृत्यू होतो, असे नाही, तर ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते, त्यांच्यावर न्यून परिणाम होतो किंवा काहींवर परिणाम होतही नाही. त्याचप्रमाणे जरी भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसली, तरी आपण स्वतःची वास्तू वास्तूशास्त्राप्रमाणे बांधून संबंधित परिणामांना सामोरे जाण्याची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो; कारण भौगोलिक परिस्थिती स्वतःच्या हातात नसते.
भारतामध्ये भौगोलिक परिस्थिती जरी काही प्रमाणात प्रतिकूल असली, तरी ऋषिमुनींनी देशाला दिलेले वास्तूशास्त्राचे ज्ञान, उभारलेली जागृत मंदिरे, शक्तीपिठे इत्यादींमुळे एकप्रकारे या भौगोलिक प्रतिकूलतेला सामोरे जाण्यासाठी शक्तीच दिलेली आहे. याउलट इतर राष्ट्रांमध्ये भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली, तरी त्यांनी अंतर्गत रचना स्वतःच्या सोयीनुसार केली आहे. ती वास्तूशास्त्रानुसार योग्य असेलच, असे नाही. त्यामुळे इतर राष्ट्रांमध्ये कुटुंबव्यवस्था लयास जातांना दिसत आहे. त्यासह भौगोलिक परिस्थितीचा लाभ त्यांना मिळत नाही.
६. वास्तूसह परिसराचाही अभ्यास करायला हवा !
ज्याप्रमाणे आपण राष्ट्राचा भौगोलिक दृष्टीने विचार केला, तसाच तो गावाच्या किंवा इमारतीच्या दृष्टीनेही करावा लागतो; कारण इमारतीच्या रचनेचा परिणामही आपल्यावर होतो. रस्ता आपल्या घरापर्यंत येत असतो किंवा मुख्य पाण्याच्या टाकीतून आपल्या वास्तूपर्यंत पाणी येत असते. त्यामुळे एखाद्या वास्तूचा अभ्यास करतांना त्याच्या परिसराचा अभ्यास करणेही आवश्यक असते.
७. वास्तूचा सखोल विचार करून अभ्यास करावा !
वास्तूचा अभ्यास करतांना देवघर, स्वयंपाकघर किंवा शयनकक्ष कुठे असावा ? अशा वर वर गोष्टींचा अभ्यास करून त्यानुसार वास्तूशास्त्राचा विचार करणे योग्य ठरणार नाही; कारण भूमीचा आकार-उतार, यजमानाच्या कुंडलीनुसार भूमीची त्याच्या दृष्टीने असलेली शुभाशुभता, विथीशुला दोष (घराच्या दिशांमुळे निर्माण होणारा दोष), भूगर्भीय ऊर्जा, विद्युत् ऊर्जा, प्रवेशद्वार, वृक्ष, चित्रकर्म इत्यादी अनेक गोष्टींचा सखोल विचार करून वास्तूचा अभ्यास करायला हवा. अन्यथा वास्तू उपाय करतांना आपण दुसरा दोष निर्माण करत नाही ना ? याचा विचार करणे आवश्यक आहे.
– श्री. श्रेयस पिसोळकर, वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न; फोंडा, गोवा.
भाग ५ वाचण्याकरिता क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/983822.html
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !