थंडीमध्ये विशेषकरून वाढलेला कोरडेपणा न्यून करण्यासाठी अंगाला प्रतिदिन तेल लावण्याचे महत्त्व !

तेल, तूप सदृश स्निग्ध पदार्थांना आयुर्वेदात ‘स्नेह’ असा पुष्कळ सुंदर शब्द आहे. स्नेह म्हणजे स्निग्धता आणणारे पदार्थ आजच्या काळात ज्याला आपण ‘फॅट्स’ संबोधतो, त्या सदृश पदार्थ. प्रामुख्याने तेल, तूप हे स्नेहपदार्थ प्रतिदिनच्या खाण्यात आणि अंगाला लावण्यासाठी वापरले जातात. 

अंगाला तेल लावण्याविषयीचे प्रातिनिधिक चित्र

१. शरिरातील वात बिघडल्याची लक्षणे

स्वभावात आलेली चंचलता, कोरडेपणा, छोट्या गोष्टीवरून होणारी चिडचिड, परिस्थिती पालटता येणार नसेल, तरी ती सहन करण्याप्रती न्यून झालेली स्थिरता / असहिष्णुता, भावनिक रुक्षता या सगळ्याच गोष्टी मानसिक स्तरावर वाताची प्रतिबिंबे आहेत. अंगाला आलेला कोरडेपणा, सांध्यातून आवाज येणे, केस कोरडे पडणे, डोळ्याला ताण वाटणे, थंडी अधिक वाजणे, पोटात गॅस (वायू) धरणे, वायू न सरकणे, पोट साफ न वाटणे, खडा होणे ही लक्षणे ढोबळपणे वात बिघडल्याची शारीरिक लक्षणे आहेत.

२. आताच्या काळात आवश्यक स्नेह म्हणेजच प्रेम !

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

मराठी किंवा संस्कृत भाषेत स्नेह म्हणजे प्रेमसुद्धा. स्पर्शातून जाणवणारा स्नेह, प्रेमाने बोलणे, वागणे, काळजी घेणे या गोष्टी मनाची अशांतता न्यून करायला साहाय्य करतात, तसेच स्थैर्य आणतात. ‘काय मग काय म्हणता काकू ?’ किंवा ‘व्हाल हा बर्‍या पटकन…’, असे खांद्यावर थोपटून बोललेले दोनच शब्द त्या रुग्णाच्या मनात स्थिरता आणि डॉक्टरांप्रती विश्वास निर्माण करायला कारणीभूत ठरतात.

सध्याच्या व्यक्तीगत बेटांच्या जगात थोडा वेळ मुद्दाम काढून थंडीच्या दिवसांत आपल्या मुलांना, आई-बाबांना आपण प्रेमाने लावलेले कोमट तेल ही त्यांच्या शरिरातील वाताची लक्षणे न्यून करतातच; पण त्यानिमित्त आपण त्यांच्यापाशी बसतो, त्यांच्याशी बोलतो, स्पर्श करतो त्यातून त्यांच्या मनाला जो स्नेह जाणवतो, त्याने वृद्धापकाळात शरिरात वात वाढलेला असतांना नक्कीच शांतता मिळते. या सगळ्यात स्वतःला तेल लावायला विसरू नका, कधीतरी मध्येच दुसर्‍याकडून अभ्यंग (सर्वांगाला तेल लावून घेणे) करून घेतला, तरी चालेल.

३. वात, सांधेदुखी, स्नायूदुखी न्यून करण्यासाठी प्रतिदिन तेल लावणे महत्त्वाचे !

थंडीमध्ये विशेषकरून वाढलेला कोरडेपणा न्यून करायला अंगाला प्रतिदिन तेल लावावे. प्रतिदिन पूर्ण शरिराला जमले नाही, तरी किमान डोके, कान आणि पाय यांना तेल लावावे. साधारण लहान मुले (१० वर्षापर्यंत किमान), खेळाडू, वयस्कर व्यक्ती, ज्यांना प्रतिदिन जागरण होते, ज्यांच्या स्नायूंची शक्ती अल्प आहे, त्वचेला पुष्कळच कोरडेपणा आहे, ज्यांच्या गुडघ्यामधून कट-कट आवाज येतो त्यांनी मात्र न चुकता अंगाला तेल लावावे. अंगाला तिळाचे औषधी सिद्ध तेल, तसेच डोक्याला खोबरेल लावता येईल.

आहारात खाल्लेले आणि बाहेरून लावलेले स्नेह त्वचेचा नरमपणा तर वाढवतातच अन् शरिरातील वात, सांधेदुखी, स्नायूदुखी न्यून करायला साहाय्य करतात; शरीर अवयवांना बळकट करतात. लहान मुलांना अभ्यंग ‘बेबी ऑईल’ने करू नये. तीळ तेलात / औषधी सिद्ध केलेल्या तेलाने करावा. लहान मुलांच्या बाजारात मिळणार्‍या तेलांमध्ये बर्‍याचदा ‘मिनरल ऑईल’ (खनिज तेल) असते, जे टाळावे.

४. प्रतिदिनच्या अभ्यंगासाठी काही सोप्या सूचना

अ. स्वतःच स्वतःला पाठीला तेल लावणे शक्य होत नाही. जेवढे जमेल तेवढे लावावे. कंबरेला गोलाकार आणि आडवा अभ्यंग करावा. मानेला वरून खाली खांद्याच्या दिशेने करावा.

आ. पोटाला अभ्यंग घड्याळ जसे फिरते त्याप्रमाणे (क्लॉकवाईज) करावा.

इ. सर्व सांध्यांना अभ्यंग गोलाकार करावा.

ई. पाय आणि पोटरी यांना विशेष करून तेल लावावे.

उ. प्रतिदिन कानात तेल टाकणे शक्य नसेल, तर कानातून तेलाचे बोट फिरवावे.

ऊ. डोक्याला प्रतिदिन थोडे तरी तेल लावावे.

ए. हात आणि पाय यांना हृदयाच्या दिशेने मसाज करावा.

ऐ. उत्तम त्वचा, दणकट स्नायू आणि मजबूत हाडे यांसाठी आबालवृद्धांनी प्रतिदिन अभ्यंग नक्की करावा.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंडये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१२.११.२०२५)