UN Security Council India : भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्यात यावे ! – पॅलेस्टिनी राजदूतांची मागणी

जेरूसलेम (इस्रायल) – स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना आणि आखाती प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यात भारत अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी भूमिका राहू शकते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिका नेहमी इस्रायलच्या बाजूने ‘व्हेटो’चा (विशेषाधिकार) वापर करते. त्यामुळे भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व देण्यात यावे, अशी मागणी पॅलेस्टिनी राजदूत अब्दुल्ला अबू शावेश यांनी केली आहे. राजदूत शावेश म्हणाले, ‘‘भारत आमचा मोठा भाऊ आहे. मोहनदास गांधी यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व भारतीय नेते पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहिले आहेत.’’

१. शावेश यांनी सांगितले की, सध्या गाझामध्ये युद्ध चालू नाही, तरी इस्रायलचे सातत्याने एकतर्फी आक्रमण चालू आहे. या आक्रमणात आतापर्यंत अनुमाने ६७ सहस्र निरपराध पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (हे निरपराध पॅलेस्टिनी हमासच्या आतंकवाद्यांना पाठिंबा देत होते. तसे नसते, तर त्यांनी हमासचा विरोध केला असता ! – संपादक)

२. ७ ऑक्टोबर २०२३ ला हमासने इस्रायलमध्ये घुसून निरपराध नागरिकांची हत्या आणि अपहरण केले होते, या संदर्भात विचारले असता शावेश म्हणाले की, ७ ऑक्टोबरला जे घडले त्याचे समर्थन करता येत नाही; परंतु त्या घटनेच्या नावाखाली गेल्या २ वर्षांपासून गाझामध्ये चाललेला नरसंहारही योग्य ठरू शकत नाही. (हा नरसंहार याचसाठी चालू आहे कारण गेल्या २ वर्षांत हमासने ओलीस ठेवलेल्यांची अद्यापही सुटका केलेली नाही. उलट त्यातही काही जणांची हत्याही केली आहे, हे शावेश का सांगत नाहीत ? – संपादक)