पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत) यांना सोलापूर सेवाकेंद्रातील युवा साधिकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. दीपाली मतकर

१. कु. हिंदवी सोळंखे

१ अ. सेवाकेंद्रात रहाण्याची ओढ : ‘काही वर्षांपूर्वी कु. हिंदवी काही दिवस तिच्या आईच्या समवेत सेवाकेंद्रात आली होती. हिंदवीची आई सेवाकेंद्रातून निघाल्यावर तीही आईच्या समवेत घरी जाण्यास निघाली आणि बसमध्ये बसली. नंतर तिने आईला सांगितले, ‘‘मला आता घरी जायचे नाही. मला सेवाकेंद्रातच रहायचे आहे.’’ त्यानंतर ती बसस्थानकावरून सेवाकेंद्रात आली.

कु. हिंदवी सोळंखे

१ आ. ती सर्व साधकांशी नम्रतेने बोलते.

१ इ. शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ

१. तिने गृहव्यवस्थापनाशी संबंधित सेवा शिकून घेतली आणि ती सेवा मनापासून करू लागली. गुरुदेवांच्या कृपेने त्या सेवेतून तिच्यातील गुण वृद्धींगत झाले.

२. एकदा सेवाकेंद्रातील साधक प्रचाराच्या सेवेला जाणार असल्याने स्वयंपाकघरात सेवेसाठी अडचण येत होती. त्या वेळी एका साधिकेने हिंदवीला भाजी, आमटी, भात करायला शिकवले. आता हिंदवी नियमित वेळेत ही सेवा करू लागली आहे.

३. तिने विज्ञापनांची संरचना करण्याची सेवाही शिकून घेतली. ती अर्धा दिवस स्वयंपाकघरात सेवा करते आणि नंतर विज्ञापनांच्या संरचनेची सेवा करते.

४. तिच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील बालसंस्कारवर्ग घेण्याचे दायित्व आहे. ही सेवा शिकण्यासाठी तिची तळमळ असते.

५. तिला एखादी सेवा सांगितली, तर ती ‘जमेल का ?’, असा विचार न करता सेवा शिकण्याचा प्रयत्न करते.

६. हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि अन्य शिबिरे यांसाठी बाहेरील जिल्ह्यांतून साधक सेवाकेंद्रात निवासाला येतात. तेव्हा हिंदवी साधकांच्या निवासव्यवस्थेच्या संदर्भातील सेवा चिकाटीने करते. एकदा हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आलेल्या साधकांची निवासव्यवस्था विठ्ठल मंदिरात केली होती. तेव्हा १ मास ६० साधक आणि शेवटचे २ दिवस १०० साधक निवासासाठी होते. या साधकांची निवासव्यवस्था आणि त्यांना अंथरूण, पांघरूण देणे, ही सेवा हिंदवीने परिपूर्ण केली. त्या वेळी प्रतिदिन साधकांची संख्या न्यून-अधिक होत होती. तेव्हा तिने विचारून घेऊन नियोजन केले. या सेवेत कितीही पालट सांगितले, तरी ती लगेच ते पालट स्वीकारत असे.

७. सेवाकेंद्रात साधकसंख्या अल्प असतांना हिंदवी सेवाकेंद्रातील अतिरिक्त सेवा, स्वयंपाकघरातील सेवा करून विज्ञापनांच्या संरचनेची सेवाही वेळेत करते.

८. तिला कुणीही काही सेवा सांगितली, तरीही ती सेवा करण्यासाठी सिद्ध असते.

१ ई. स्वीकारण्याची वृत्ती : तिला साधक काही ना काही सेवा सांगत असतात; मात्र तिची कधी चिडचिड होत नाही किंवा ‘तिने प्रतिक्रिया दिली’, असेही होत नाही. ती सर्व परिस्थिती स्वीकारते.

१ उ. नामजपादी उपाय आणि सेवा केल्यामुळे पालट होणे : ती लहान असतांना तिने आईला होणारा त्रास पाहिल्याने तिच्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे आरंभी ती सेवाकेंद्रात कुणाशी बोलत नसे. ती सेवाकेंद्रात आल्यावर तिला आरंभी काही सुचायचे नाही. तिला वैयक्तिक आवरण्यासाठी अधिक वेळ लागत असे. नंतर नामजपादी उपाय करणे आणि सेवा यांमुळे तिच्यामध्ये पुष्कळ पालट झाला.’

कु. समृद्धी सोळंखे

२. कु. समृद्धी सोळंखे

२ अ. स्वावलंबी आणि हुशार : ‘कु. समृद्धीची आई सोलापूर सेवाकेंद्रात राहून लातूर येथील प्रचारासंबंधी सेवा पहाते. तिची आई अधिक दिवस लातूर येथे आणि काही दिवसच सोलापूर सेवाकेंद्रात असते. समृद्धी स्वतःचे स्वतः आवरते. तिला अभ्यासाविषयी कधीच सांगावे लागत नाही. तिचा वर्गात प्रथम क्रमांक येतो.

२ आ. शिकण्याची वृत्ती : ती नवीन गोष्टी त्वरित शिकते. ‘सेवाकेंद्रातील सण, उत्सव यांची सिद्धता कशी करायची ?’ , याविषयी तिला एकदाच सांगितले. नंतर तिने या सेवेची व्याप्ती काढून सेवा पूर्ण केली.

२ इ. प्रेमभाव : साधिका रुग्णाईत असल्यास समृद्धी त्यांना प्रसाद देणे, त्यांचे डोके किंवा पाय चेपून देणे इत्यादी स्वत:हून प्रेमाने करते.

२ ई. प्रत्येक गोष्ट तळमळीने करणे

१. ती शाळेत जाऊन आणि अभ्यास करून उपलब्ध वेळेत तिच्या क्षमतेनुसार सेवा करते. गुरुपौर्णिमा आणि हिंदु राष्ट्र-जागृती सभा यानिमित्त ती सेवाकेंद्रातील साधकांच्या समवेत प्रचारासाठी जाते अन् समाजातील व्यक्तींना निमंत्रण देण्याच्या सेवेत सहभागी होते. ती सांगत असलेली सूत्रे समाजातील व्यक्ती कौतुकाने ऐकतात आणि ‘आम्ही नक्की येतो’, असेही सांगतात.

२. दिवाळीच्या वेळी ‘आगाशीत लावण्यासाठी किती पणत्या लागतील ? पणत्या कुठे ठेवायच्या?’, याची सिद्धता तिने रात्रीच करून ठेवली आणि पहाटे ४ वाजता उठून पणत्या लावल्या. ‘कोणत्या सणाला कोणती रांगोळी काढायची ?’, हे ती लक्षात ठेवून तसे नियोजन करते. सण झाल्यावर ती सर्व पूजासाहित्य स्वच्छ करून जागेवर ठेवते.

२ उ. चुकांविषयी संवेदनशील : समृद्धीला कुणी तिची चूक सांगितल्यास ती लगेच स्वीकारते आणि फलकावर लिहून त्या चुकीसाठी क्षमायाचनाही करते. ‘आपल्याकडून अशी चूक का झाली ? साधकांना ही चूक आपल्याला सांगावी लागली’, याची तिला खंत वाटते.’

– (पू.) दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत, वय ३६ वर्षे), सोलापूर (१२.७.२०२५)

(क्रमशः)

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/975995.html