कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणारे ज्ञान यांतील भेद !

‘सध्या जगभरातील लोक कृत्रिम बुद्धीमत्ते (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय)द्वारे विविध विषयांवर काही क्षणांत माहिती मिळवत आहेत, तसेच गत १५ वर्षांपासून सनातनच्या काही साधकांना श्री गुरुकृपेने धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भात सूक्ष्मातून ज्ञान मिळत आहे. या संदर्भात आमची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी यापूर्वी भेट झाली आणि त्यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले. तेव्हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) आणि सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणारे ज्ञान यांतील भेद’, हा विषय चर्चेत आला. तेव्हा देवाच्या कृपेने मला वरील विषयाच्या संदर्भात सुचलेली सूत्रे लेखबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

१. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळणारे ज्ञान यांतील भेद

सुश्री (कु.) मधुरा भोसले

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप, श्री. निषाद देशमुख आणि माझे विविध विषयांवरील अनेक लेख सतत प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे हे लेख वाचल्यावर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तुलनेत श्री गुरुकृपेने साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान किती श्रेष्ठ आहे’, याची ग्वाही मिळते आणि माझे मस्तक कृतज्ञतेने श्री गुरुचरणी लीन होते.’

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.२.२०२५, दुपारी १२.२८)


दैवी ज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांतील भेद

‘सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेची पुष्कळ चर्चा आहे. अनेक संकेतस्थळांद्वारे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करता येतो. त्याचे लाभ, मर्यादा, त्यामुळे होणारी हानी आणि ईश्‍वराकडून प्राप्त होणारे ज्ञान यासंदर्भातील माहिती आपण या लेखात पहाणार आहोत.

१. कृत्रिम बुद्धीमत्तेचे परिणाम

श्री. विक्रम भावे

१ अ. लाभ : कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे ‘अनेक गोष्टी सोप्या होतात’, असे म्हटले जाते, उदा. या कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे पत्र लिहिणे, चित्रे काढणे, अशा अनेक गोष्टी करता येतात; मात्र त्यासाठी त्या कृत्रिम बुद्धीमत्तेला काही तरी माहिती द्यावी लागते किंवा तशा प्रकारचे किंवा त्यासंदर्भातील काहीतरी काम यापूर्वी तिने केलेले असावे लागते, तरच तिला आपण दिलेले काम पूर्ण करता येते. कृत्रिम बुद्धीमत्तेला आपण सांगितले की, उडणारे मांजर बनव, तर पंखवाल्या मांजराचे चित्र आपल्याला बनवून मिळते.

१ आ. मर्यादा : या चित्रामध्ये उडणे, पंख आणि मांजर या ३ गोष्टी प्रमुख आहेत. या तिन्ही गोष्टींविषयी एकत्रितपणे किंवा वेगवेगळ्या वेळी ही माहिती कुणीतरी शोधलेली असते. अशा ‘सर्च’चा अभ्यास करून कृत्रिम बुद्धीमत्ता ते चित्र बनवते. ज्या गोष्टींचा शोध इंटरनेटवर फारसा घेतला गेला नाही, अशी गोष्ट कृत्रिम बुद्धीमत्तेला करण्यास सांगितल्यास तिला ती करणे सहज शक्य होत नाही. ती आणखी काहीतरी संदर्भ मागते. कुठल्या तरी सामान्य माणसाच्या हत्येच्या प्रकरणावरील पुस्तकाला प्रस्तावना सुचवण्यास सांगितली, तरी कृत्रिम बुद्धीमत्तेला ते शक्य होत नाही. ती आणखी संदर्भ मागते. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे आपल्याला दृश्य जगाविषयी नवीन माहिती मिळू शकते; परंतु ज्ञान मिळू शकत नाही.

१ इ. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे होणारी हानी : कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे जशी आपली काही कामे सोपी होतात, आपला वेळ वाचतो, तसेच त्याचे काही तोटेही आहेत. सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता ही जगातील काही मोजक्या देशांची मक्तेदारी आहे. अशा देशांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर माहिती संकलनासाठी केला जातो, म्हणजेच प्रत्येक देशात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे काय काय बनवले जाते, काय काय शोधले जाते, या सगळ्याची माहिती त्या कृत्रिम बुद्धीमत्ता निर्माण करणार्‍या देशांकडून संकलित केली जाते. ही माहिती संकलन करण्याची प्रक्रिया अव्याहत चालू असते. त्यातून त्या देशातील समाज मन, त्यात होणारे पालट, त्या त्या देशातील संस्कृती, तेथील उद्योग-व्यवसाय, या सगळ्यांची माहिती गोळा करतात. भविष्यात त्या राष्ट्राच्या संदर्भात जी धोरणे आखायची आहेत, त्यासाठी त्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या राष्ट्रावर सांस्कृतिक आक्रमण करण्यासाठी किंवा त्या राष्ट्रात धार्मिक फूट पाडण्यासाठी अथवा त्या राष्ट्र्रात धार्मिकता न्यून करून तेथे साम्यवादी विचारसरणी पेरण्यासाठी इत्यादी काहीही करण्यासाठी त्या त्या देशांविषयी संकलित माहितीचा उपयोग केला जातो.

२. साधकांना ईश्‍वराकडून किंवा अंतःप्रेरणेने प्राप्त होणारे दैवी ज्ञान

अ. याउलट साधना करणार्‍या व्यक्तींना किंवा साधकांना जे दैवी ज्ञान प्राप्त होते, ते अंतःप्रेरणेने प्राप्त झालेले असते. त्यासाठी त्या व्यक्तींना किंवा साधकांना कुठल्याही संदर्भाची आवश्यकता नसते.

आ. ज्ञान प्राप्त करणार्‍या साधकाचा त्या क्षेत्रातील अभ्यास नसला, तरीही ते ज्ञान त्याला प्राप्त होते. त्याचे मुख्य कारण ज्ञान प्राप्तकर्त्या साधकांचा ‘हे ज्ञान ईश्‍वराने दिले आहे आणि मी केवळ माध्यम आहे’, असा भाव असतो.

इ. ज्ञान हे ईश्‍वर आणि धर्म यांच्याशी संबंधित असल्याने ईश्‍वराप्रती भाव असलेले अन् ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता असलेले साधकच ते मिळवू शकतात.’

– श्री. विक्रम भावे, फोंडा, गोवा. (२७.२.२०२५)