आपल्या मेंदूला जपा !

माझ्याकडे एक रुग्ण आले होते. मी त्यांना एका पाठोपाठ एक शांतपणे काही गोष्टी सांगत होते. ४- ५ सूचना असतील. ‘आता अधिक ताक नको, वेलीवरच्या फळभाज्या खा…ज्यात दुधी भोपळा, पडवळ, भेंडी, दोडका या भाज्या जेवणात अधिक करून ठेवा, रात्री हळद दूध नको, औषधात अमुक इतके अंतर ठेवा’, असे सांगितले. रुग्ण व्यक्तीने पेन काढून लिहून घेईपर्यंत तेवढ्यातील तेवढ्यात ते विसरून गेले आणि त्यांनी मला तेच प्रश्न ३-४ वेळा विचारले. सगळे सतत लिहून घेणे, भ्रमणभाषची सुविधा किंवा ‘पिरियड’ (मासिक पाळी) दिनांकासाठी असलेले ॲप यांमुळे आपण साध्या साध्या गोष्टीही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणेही सोडून दिले आहे. त्यातून सतत असलेला मनोरंजनाचा भडिमार यामुळे मेंदूवर झालेले परिणाम याने रुग्णांचे सोडा, आपल्यात किंवा आपल्या नातेवाईकांमध्येही गप्पा चालू असतांना चाललेल्या गोष्टींचा ‘ट्रॅक’ जाणे (भरकटणे) किंवा बोललेले लक्षात न रहाणे असे होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

१. एका ठिकाणी अधिक वेळ लक्ष लागून रहाण्याची समस्या

सतत मनोरंजनाच्या विविध साधनांनी, ‘रील’च्या (छोट्या ध्वनीचित्रफिती) न्यून झालेल्या वेळेमुळे आणि ‘स्क्रोलिंग’च्या सोयीमुळे मेंदूमध्ये माहितीपर घटना पटपट आदळत रहातात. पहिल्या ५ सेकंदात ‘रील’ आवडले नाही की, आपण पुढे जातो. या ‘माईंडलेस स्क्रोलिंग’ने (विनाविचार भ्रमणभाष किंवा संगणकावरील लिखाण पुढे खाली-वर करणे) होणार्‍या न्यून झालेल्या एकाग्रतेच्या लक्षणाला ‘पॉपकॉर्न ब्रेन सिंड्रोम’ असे चविष्ट नाव दिले गेले आहे. न्यून झालेली एकाग्रता या व्यतिरिक्त मानसिक ताण, कुठल्याही गोष्टीसाठी वाट पहाता न येणे, ‘ब्रेन फॉग’ (मेंदूवर चढलेला धूसरपणा), ‘इम्पल्सिव्ह’ (भावनावश) वागणे, ही लक्षणेही दिसतात. ज्याप्रमाणे ‘पॉपकॉर्न पॉप’ होत असतांना (लाह्या भाजल्या जात असतांना) थोडा वेळ उड्या मारत असतात, त्याप्रमाणे स्वतःचा मेंदू नवीन ‘रिल’ किंवा माहिती मिळाली की, ‘डोपामिन’मुळे (मेंदूतील एक रसायन) खूश होतो आणि बाहेरचे मनोरंजन अजून अजून शोधत रहातो. यामुळे हळू हळू एक ठिकाणी अधिक वेळ लक्ष लागून रहाणे अवघड होते.

२. मेंदूशी संबंधित आजाराची शक्यता

लहान मुलांमध्ये ही गोष्ट घडणे अधिक धोकादायक आहे. अभ्यासातील सातत्य आणि एकाग्रता यांमुळे न्यून होतांना दिसते. ‘ए.डी.एच्.डी.’ (‘ए.डी.’ – अटेंशन डेफिसिट (दुर्लक्ष), ‘एच्.’ – हायपरॲक्टिव्हिटी (अतीक्रियाशीलता), ‘डी.’ – डिसऑर्डर (आवेग)) निदान झाले नसले, तरी तशा लक्षणांची आणि एका जागी स्थिर बसू न शकणारी कित्येक मुले दिसतात. सध्या मेंदू आणि त्याच्याशी निगडीत ज्ञानेंद्रिये यांकडे आपण लक्ष देण्याची अत्यावश्यकता आहे. सगळ्यांचे मेंदू एका वेळी बिघडू लागले, तर काय होत जाते, ते कळायला ‘आयडियोक्रसी’ हा इंग्रजी चित्रपट अवश्य बघा.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

३. पुढील काही गोष्टी करता येतील !

अ. मुलांना ‘स्क्रीनटाईम’ देणार असाल, तेव्हा भ्रमणभाष हातात देण्याऐवजी टीव्ही लावलेले परवडते. आपलेही टीव्हीकडे लक्ष रहाते आणि मुले एक गोष्ट सलग बघतात.

आ. ‘रील्स’ बघणे टाळा. त्यापेक्षा ‘फोकस्ड पॉडकास्ट’ (एखाद्या विषयाशी संबंधित ध्वनिचित्रफीत), मालिका किंवा पुस्तक वाचणे, हा मनोरंजनाचा त्रासदायक न ठरणारा पर्याय आहे.

इ. स्वतःची दिनचर्या बसवून घेणे फार महत्त्वाचे आहे. रात्री भ्रमणभाष हातात घेण्याआधी पायाला तेल लावणे, ध्यान करणे या गोष्टी करून मग तो हातात घ्यावा. आपल्याला ‘स्क्रोलिंग’ करायचे नाही, हे जाणीवपूर्वक मनाशी घोका.

ई. मेंदूची झालेली झीज अजून होऊ नये, यासाठी छंद जोपासा. जसे एखादे वाद्य शिकतांना त्याचे बोल तुम्ही लक्षात ठेवाल, स्वर पाठ कराल; गीता पाठ करणार असाल, तर पाठांतर केले जाईल; लिखाण केले, तर त्या निमित्त वाचन होईल, अशाने मेंदूला नवीन आणि उपयोगी चालना मिळेल.

उ. आयुर्वेदातील नस्य, शिरोधारा, मेंदूवर काम करणारी रसायन औषधे या गोष्टींनी इंद्रियांची झीज व्हायचा वेग न्यून होतो. सध्या दिसणारे विस्मरण, झोपेच्या तक्रारी, न्यून ऐकू येणे, न्यून दिसणे या सगळ्या गोष्टी मज्जासंस्थेतील बिघाड दर्शवतात. आधीपासून घेतलेले थोडेसे कष्ट पुढचे मोठे त्रास वाचवतात, हे नक्की !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (४.११.२०२५)