सनातनचे ५३ वे संत पू. (कै.) सीताराम विठ्ठल देसाई रुग्णालयात असतांना आणि त्यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

२३.१०.२०२५ या दिवशी सनातन संस्थेचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई (वय ८४ वर्षे) यांनी देहत्याग केला. ३.११.२०२५ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या संदर्भात आणि त्यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. (कै.) सीताराम देसाई

१. श्री. चंद्रशेखर सीताराम देसाई (पू. (कै.) सीताराम देसाई यांचा मोठा मुलगा), प्रियोळ, गोवा.

१ अ. पू. बाबांची सेवा करतांना भाव जागृत होणे : ‘पू. बाबांना रुग्णालयात भरती केल्यावर मी त्यांची सेवा करण्यासाठी गेलो. त्या वेळी त्यांची स्थिती पाहून मला भीती वाटली. नंतर काही वेळाने माझा नामजप चालू झाला. मी ‘पू. बाबांची सेवा ही देवाची सेवा आहे’, या भावाने सेवा केल्यावर माझी भीती न्यून झाली. माझा मधून मधून भाव जागृत होत होता.

१ आ. इतरांचा विचार करणे : रुग्णालयातील शेवटच्या३ -४ दिवसांत पू. बाबांना ‘त्यांचे हे शेवटचे दिवस आहेत’, असे जाणवत होते.

१. पू. बाबांना पुष्कळ त्रास होत असूनही ते त्यांना भेटायला येणार्‍या व्यक्तींना ‘बसा’, असे सांगत होते.

२. ते हाताने घट्ट मूठ करून आम्हाला ‘चांगले रहा’, असे सांगत होते. ते आम्हाला ‘नामजप आणि प्रार्थना करा’, असे खुणेने सांगत होते.

३. ते रुग्णालयात असतांना काही दिवस कुटुंबातील सर्वांची विचारपूस करत होते. ते माझी पू. आई (पू. (श्रीमती) मालिनी देसाई, सनातनच्या ५२ व्या संत, वय ७९ वर्षे), माझा भाऊ आणि नातवंडे यांना सांगत होते, ‘‘काळजी करू नका.’’ मी २ दिवस त्यांच्याजवळ नव्हतो. त्या वेळी ते माझ्याविषयी विचारत होते.

१ इ. पू. बाबांनी देहत्याग केल्याच्या २ दिवस आधी मला त्यांच्या चेहर्‍यावर पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

१ ई. पू. बाबांनी देहत्याग केल्याच्या आदल्या दिवशी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा माझ्याकडून ‘देवा, तुझी जशी इच्छा आहे, तसे घडू दे’, अशी प्रार्थना झाली. 

१ उ. पू. बाबांची स्थिती गंभीर झाल्यावर ‘ते ध्यानावस्थेत आहेत’, असे मला जाणवत होते.

१ ऊ. पू. सीताराम देसाई यांनी देहत्याग केल्यावर जाणवलेली सूत्रे

१. पू. बाबांचे पार्थिव घरी आणल्यावर ‘ते शांत झोपले आहेत’, असे मला वाटत होते.

२. नातेवाईक आणि समाजातील लोक त्यांच्या पार्थिवाला हार आणि तुळस वहात असतांना ‘देवाची पूजा होत आहे’, असे मला वाटत होते.

३. ‘पू. बाबांचे अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत कुटुंबीय आणि गावातील व्यक्ती यांचे चांगले सहकार्य लाभले’, ही पू. बाबांची पुण्याई अन् गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) कृपाच आहे.’

२. सौ. सुमेघा चंद्रशेखर देसाई (पू. (कै.) सीताराम देसाई यांची सून) आणि कु. रक्षंदा अन् कु. योगिनी देसाई (पू. (कै.) सीताराम देसाई यांच्या नाती), प्रियोळ, गोवा.

अ. ‘पू. बाबांनी देहत्याग केला आहे’, असे आम्हाला वाटत नाही. ‘ते आमच्यात आहेत. ते आश्रमात रहात आहेत’, असेच आम्हाला वाटते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २६.१०.२०२५)


पू. (कै.) सीताराम देसाई यांचा देहत्याग आणि देहत्यागानंतरचा सूक्ष्मातील प्रवास यांचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

२३ ऑक्टोबर २०२५ या दिवशी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई (वय ८४ वर्षे) यांनी देहत्याग केला. देवाच्या कृपेने त्यांचा देहत्याग आणि त्यानंतरचा त्यांचा सूक्ष्मातील प्रवास यांच्या संदर्भात माझ्याकडून झालेल्या सूक्ष्म परीक्षणाची सूत्रे येथे लेखबद्ध केली आहेत.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू आणि संतांचा देहत्याग यांतील भेद 

सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात तिच्या स्थूल देहाविषयी पुष्कळ आसक्ती असते. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला मृत्यूच्या वेळी प्राण स्थूलदेहातून बाहेर पडत असतांना पुष्कळ संघर्ष करावा लागतो. या तुलनेत संतांच्या मनात त्यांच्या स्थूलदेहाविषयी आसक्ती अल्प असते, तसेच त्यांना मृत्यूचे भय वाटत नाही. संतांचा अंतकाळ जवळ आल्यावर ते मृत्यू सहजतेने स्वीकारतात. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती तिच्या अंगावरील जुनी वस्त्रे काढून नवीन वस्त्रे धारण करते, त्याप्रमाणे संत सहजतेने त्यांच्या स्थूलदेहाचा त्याग करून मृत्यूला सामोरे जातात. पू. देसाईआजोबांनाही अनुमाने १ मासापूर्वी मृत्यूची चाहूल लागली होती. त्यांनी अंतकाळ जवळ आल्यावर ईश्वरेच्छा समजून आनंदाने देहत्याग केला.

२. व्यक्तीचे प्राण देहाच्या कोणत्या अवयवातून बाहेर पडतात, त्यावरून मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला मृत्यूत्तर मिळणारा सूक्ष्म लोक निर्धारित होत असणे 

पू. देसाईआजोबा यांचे प्राण त्यांच्या आज्ञाचक्रातून बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा लिंगदेह जनलोकात गेला.

३. व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीनुसार तिचा लिंगदेह घेण्यासाठी विविध प्रकारच्या दैवी शक्तींनी त्यांचे विविध गण किंवा दूत यांना पाठवणे 

टीप – पू. देसाईआजोबांवर शिवाची विशेष कृपा असल्यामुळे त्यांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांचा लिंगदेह घेण्यासाठी ११ वा रुद्र, म्हणजे हनुमान आला होता.             (क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २४.१०.२०२५)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे  जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात. 

पू. (कै.) सीताराम देसाई यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर साधिकेला जाणवलेली सूत्रे

सुश्री (कु.) कल्याणी गांगण

१. ‘पू. सीताराम देसाई  यांची देहत्यागाची वेळ जवळ आली आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे 

‘दिवाळीच्या २ दिवस आधी पू. देसाईआजोबा यांना ‘व्हेंटिलेटर’वर (रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वास करण्यास साहाय्य करणारे साधन) ठेवले होते. तेव्हा त्यांच्यावर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांनी ‘पू. आजोबांची देहत्यागाची वेळ जवळ आली आहे’, असे सांगून त्यांना आश्रमात न्यायला सांगितले होते.

२. ‘पू. देसाईआजींच्या खोलीत सूक्ष्मातून मोठे युद्ध चालू असून पू. देसाईआजोबा आजच देहत्याग करतील’, असे वाटणे आणि भ्रमणभाषवर भक्तीसत्संग लावल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील चैतन्याने वातावरणातील दाब नष्ट होऊन खोलीत चैतन्य प्रक्षेपित होणे 

या दिवशी मला पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई यांच्या समवेत बसायला सांगितले होते. तेव्हा ‘त्यांच्या खोलीत सूक्ष्मातून मोठे युद्ध चालू आहे’, असे मला जाणवत होते. ‘पू. देसाईआजोबा आजच देहत्याग करतील’, असे मला वाटत होते. त्या वेळी मी भ्रमणभाषवर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजातील ‘भक्तीसत्संग’ लावला. त्यांच्या वाणीतील चैतन्याने वातावरणातील दाब नष्ट होऊन खोलीत चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्या दिवशी पू. आजोबांना आश्रमात न आणता त्यांच्यावर दुसर्‍या आधुनिक वैद्यांचे उपचार चालू केले. त्या उपचारांनी पू. आजोबा काही प्रमाणात बरे झाले. त्यानंतर दिवाळीच्या तिसर्‍या दिवशी पुन्हा त्यांना अस्थम्याचा त्रास चालू झाला.

३. पू. देसाईआजोबांनी देहत्याग केल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. पू. आजोबांनी देहत्याग केल्याचे समजल्यावर ‘ते सतत नामजप करत आहेत. ते खोलीत बसून नामजप करत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसत होते.

आ. ‘पू. आजोबा ज्योतीरूपात जनलोकात जात आहेत आणि त्या तेजस्वी ज्योतीतून नामजपाचे चैतन्य बाहेर पडत आहे’, असे मला सूक्ष्मातून  दिसले. ती ज्योत दिसल्यावर मला शांत वाटत होते.

इ. संत नेहमी साधकांचा विचार करतात. ‘आपल्यामुळे कुणाला त्रास व्हायला नको’, असे संतांचे वागणे असते. ‘साधकांना दिवाळी आनंदात साजरी करता यायला यावी’, यासाठी पू. आजोबांनी दिवाळी झाल्यावर देहत्याग केला’, असे मला जाणवले.’

– सुश्री कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१०.२०२५)

  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक