
१. शंकराचार्यांनी जिव्हेविषयी सांगितलेले श्लोक
‘रसना (जिव्हा किंवा जीभ) आणि जननेंद्रिय या २ इंद्रियांत रसना अधिक महत्त्वाची ! रसनेवरच जननेंद्रिय अवलंबून असते. रसना जिंकणार्याला वासना स्पर्शतच नाही. तो वासनारहित होतो. सगळीच इंद्रिये तिच्या नियंत्रणात येतात. या संदर्भात शंकराचार्यांचे काही श्लोक पुढे दिले आहेत.
अ. मत्प्रियसखि मज्जिह्वे मय्यनुकम्पां कुरुष्व नौमि त्वाम् ।
अन्यापवादरहिता भज सततमों नमः शिवायेति ।।
अर्थ : हे जिव्हे, खरोखर तू माझी अत्यंत आवडती मैत्रीण आहेस. माझ्यावर दया कर. मी तुला नमस्कार करतो. दुसर्या कुणाचीही निंदा किंवा चहाडी न करता ‘ॐ नमः शिवाय ।’ हा मंत्र सतत जपत जा.
आ. वाणीगुणानुनिलये त्वां वन्दे मा कुरुष्व परनिन्दाम् ।
त्यज सकललोकवार्तां भज सततमों नमः शिवायेति ।।
अर्थ : (ओज, प्रसाद, माधुर्य इत्यादी) जे वाणीचे गुण आहेत, ते सर्व तुझ्या ठिकाणी विराजमान आहेत. मी तुला नमस्कार करतो. दुसर्याची निंदा करू नकोस. लोकांच्या सर्व व्यवहारांची चर्चा सोडून दे. ‘ॐ नमः शिवाय ।’ या मंत्राचा सतत जप कर.
इ. कट्वम्ललवणतिक्तस्वादुकषायादिसर्वरसवाञ्छाम् ।
जिव्हे विहाय भक्त्या भज सततमों नमः शिवायेति ।।
अर्थ : हे जिव्हे, तू तिखट, आंबट, खारट, कडू, गोड आणि तुरट इत्यादी सर्व रसांची इच्छा सोडून दे अन् भक्तीभावाने सर्व काळ ‘ॐ नमः शिवाय ।’ हा मंत्र जपत जा.
ई. रसने रचितोयमञ्जलिस्ते परनिन्दापरुषैरलं वचोभिः ।
दुरितापहं नमः शिवायेत्यमुमादिप्रणवं भजस्व मन्त्रम् ।।
अर्थ : हे जिव्हे, मी तुला नमस्कार करतो. परनिंदेचे कठोर शब्द बोलण्याचे काम थांबव. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा मंत्र सर्व पापांचा नाश करणारा आहे. तू प्रणवपूर्वक त्याचाच उच्चार करत रहा.

२. साधनेला अनुकूल असा आहार घ्यावा
आहारावर साधकाने कटाक्षाने लक्ष द्यावे. चित्त शांत राहील, योग साधनेला अनुकूल असेल, रजोगुण आणि तमोगुण बळावणार नाहीत, असाच सात्त्विक आहार असावा. शुद्ध आहार असावा.
जेवण मौज म्हणून नसावे ! जीभेचे चोचले पुरवण्याकरता नसावे, तसेच शरीर पुष्ट होण्याकरता मांसाहार नसावा. अंतरीची बैठक पुष्ट करायची आहे. शरिराचे रक्षण होईल, इतकाच आहार असावा. सहज पचेल असा, म्हणजेच पचवण्यात शक्ती खर्ची पडता कामा नये, असा आहार असावा. सगळी शक्ती ध्यानात वेचायची आहे. आहाराचा नेम असावा आणि तो नेमका असावा. (नेम म्हणजे नियमित आणि प्रमाणबद्ध मात्रा) त्याची वेळ आणि प्रमाण ठरलेले असावे.
३. सात्त्विक आहारातील काही पदार्थ
रुचतील तेच पदार्थ घ्यावेत. तांदुळ, गहू, जव, मूग, दूध, तूप, लोणी, सुंठ, सैंधवमीठ, सुरण, कंद, खडीसाखर, म्हणजे शुद्ध, सात्त्विक आणि तेलमसाले रहित पदार्थ खावेत. दूध, तूप बेतानेच घ्यावे.
४. आहार घेतांना काय टाळावे ?
अतीआंबट, तुरट, तिखट, तेलकट वर्ज्य करावे. दही, कांजी (तांदळाची पेज, आंबवलेले पेय), मोहर्या, मसाले, शिळे अन्न (३ घंटे आधी शिजवलेले अन्न) आणि परत गरम केलेले अन्न खाऊ नये. हा राजस आहार आहे.
कांदे, लसूण खाऊच नये. गाजर, फळेही नकोत. तेल, हिंग, उडीद सर्वथा वर्ज्य. चहा, कॉफी घेऊ नये. ते उत्तेजक असतात. सुपारी नको. गरम पाणी नको. फार जेवू नये. फार निजू नये. फार बोलू नये. फार चालू नये. ‘अति सर्वत्र वर्जयेत् ।’ म्हणजे ‘सर्व गोष्टी अति करणे टाळावे.’ भूक असेल, तरच नेमके सात्त्विक खावे. दुर्जनांची संगत टाळावी.
एकांतात असावे. अखंड सावध असावे. ध्यानातच असावे. देश, काळ आणि प्रसंग यांनुसार मनाची धारणा टिकेल. ध्यान विकसित होईल. प्रसन्नता, शांती आणि प्रसाद वाटेल, असा आहार घ्यावा. ध्यान आणि भगवंत यांपासून दूर नेणारा आहार, विहार अन् संगती कटाक्षाने टाळावी.
गुरुमहाराज कडुनिंबाचा पाला खातात. दूध आणि फळे यांवर असतात. तपस्या करतात. हे साधन आहे. चित्तशुद्धीचे साधन आहे. अंतःकरण शुद्ध झाले, तरच वृत्तीशून्यता, आत्मसाक्षात्कार ! मगच ज्ञान ! भगवंतप्राप्ती झालेला कोटी-कोटीत एखादाच असतो. जरी असला, तरी त्याची ओळख पटत नाही. तो ओळखच होऊ देत नाही.
५. युक्त आहार हे चित्तशुद्धीचे साधन असणे
असंख्य रोगी उपवास करतात. असंख्य लोकही उपवास करतात. आरोग्याकरता कडुनिंब खातात. युक्त आहार हे साधन आहे. चित्तशुद्धीचे साधन आहे.
कडुनिंबाचा पाला खाणारे असंख्य आहेत. दूध आणि फलाहार घेणारे पुष्कळ आहेत. उपवास करणारेही आहेत. दूध आणि फळे यांवर राहून, कडुनिंबाचा पाला खाऊन देव मिळत असता, तर ते फार सोपे झाले असते. केवळ उपवास करायचा किंवा दूध आणि फळे एवढाच आहार घ्यायचा. कडुनिंब खायचे. मुक्ती ही फार सोपी गोष्ट होईल !
संसर्गाने रोग होतात; तर संसर्गाने आरोग्य का नाही लाभणार ? ‘शांती’ स्वयंप्रकाश आहे. त्याच्या सान्निध्यात प्रकाशच लाभतो. त्यातून साक्षात्कार आणि आनंद यांचा स्वाद मिळतो.
६. आहारशास्त्राचे जातीय परिणाम
आहारशास्त्राचे जे जातीय परिणाम होतात, त्यांची पौर्वात्य किंवा पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राला माहिती नाही. त्यामुळे वैद्यकशास्त्राला समाजव्यवस्था आणि त्याच्या अंतर्गत तोंड घालण्याचा एका काडीचाही अधिकार नाही.
ब्राह्मण वर्णाला मांसाहार निषिद्ध का ? क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना मात्र मांसभक्षणाचा निषेध नाही. ‘आहार हा जातीनिष्ठ का ? कशाकरता ?’, असे हे आमचे परिवर्तनवादी, महामहापंडित, महामहोपाध्याय नवा आचारधर्म प्रस्थापित करतांना विचारतात. त्यांच्या मतानुसार आहारपद्धत ही जातीनिष्ठ असू नये. पाश्चात्त्य विकृतीने प्रभावित झालेल्या या हिंदु पंडितांचे गुरु पाश्चात्त्य पंडित डेव्हिड काट्झ (David Katz) काय सांगतो ?, ते ध्यानी घ्यावे. तो स्पष्ट बजावतो, ‘आहार हा जातीनिष्ठच असला पाहिजे !’
आहारातील भेद हे जातीविभागणीचे एक साधन मानावे. या सुधारकांचा नवा आचारधर्म तत्त्वमीमांसेवर आधारलेला नाही आणि तेथे समाजशास्त्रही नाही. केवळ अहंकाराने ते ‘टरो टरो’ करतात इतकेच. ’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२२)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !