शौचविधीच्या वेळी आपणही ही चूक करत आहात का ?

‘बेथ इस्रायल डीकनेस मेडिकल सेंटर (BIDMC)’ येथे ‘रुटीन कोलोनोस्कोपी’ (मोठे आतडे आणि गुदाशयातील पालट पडताळण्यासाठी केली जाणारी एक वैद्यकीय चाचणी) करत असलेल्या १२५ प्रौढ व्यक्तींच्या अभ्यासात संशोधकांच्या पथकाने सहभागींना त्यांच्या शौचालयाच्या सवयी, स्मार्टफोनचा वापर, आहार आणि शारीरिक हालचाली यांविषयी विचारले अन् नंतर त्या प्रतिसादांची तुलना थेट ‘कोलोनोस्कोपी’च्या निष्कर्षांशी केली. या परिणामांमधून काही चिंतनीय गोष्टी समोर आल्या :

१. ३ पैकी २ सहभागींनी शौचालयात भ्रमणभाष वापरत असल्याची स्वीकृती दिली.

२. शौचालयात ‘स्मार्टफोन’चा वापर हा मूळव्याध होण्याचा ४६ टक्के वाढीव धोक्याशी संबंधित असल्याचे आढळले.

३. भ्रमणभाष वापरकर्ते प्रत्येक वेळी ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ शौचालयात बसण्याची शक्यता इतरांपेक्षा ५ पटींनी अधिक होती.

४. विशेषतः तरुण प्रौढांमध्ये ही सवय अधिक प्रमाणात दिसून आली.

५. ‘स्मार्टफोन’ वापरकर्त्यांनी भ्रमणभाष न वापरणार्‍यांच्या तुलनेत आठवड्यातून कमी व्यायाम करत असल्याचे सांगितले.

वैद्य परीक्षित शेवडे

आचार्य वाग्भट यांनी शौचविधीविषयी सांगितलेले नियम आजही तितकेच लागू !

‘अष्टांगसंग्रह’ या ग्रंथात शौचविधीचे नियम सांगतांना आचार्य वाग्भट यांनी ‘प्रयतः’ असा शब्द वापरला आहे. ‘इंदुकृत शशिलेखा टिके’त याचा अर्थ ‘प्रयतः अनन्यकार्यः’, म्हणजेच ‘शौचालयात ज्या कामासाठी गेला आहात, त्या व्यतिरिक्त अन्य काही न करणे’, असा दिला आहे.

या व्यतिरिक्त संग्रहात दिलेले आणि आजच्या काळात लागू असलेले नियमही यानिमित्ताने लक्षात घ्या :

१. उकिडवे बसून मलत्याग करावा.

२. संपूर्ण नग्नावस्थेत बसून मलत्याग करू नये.

३. थंडीच्या दिवसांत विशेषत: डोकेही झाकून घ्यावे.

४. शौचाचा वेग पूर्णतः आला नसल्यास बळजोरीने कुंथून निर्माण करू नये.

आयुर्वेद कसा संबंधित आहे, याचे आणखी एक उदाहरण !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२९.१०.२०२५)