उद्या, २ नोव्हेंबर या दिवशी ‘कार्तिकी एकादशी’ आहे. त्या निमित्ताने…

१. दिंडी म्हणजे सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भागवत धर्माचा सोहळा !
‘दिंडी सोहळा हा संत आणि वारकरी यांचा अत्यंत आवडता सोहळा आहे. दिंडी म्हणजे भक्तांचा समुदाय. सगुण भक्तीमार्गाच्या उपासकांचा मेळावा. भागवत धर्माचा सोहळा. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आणि सर्वांना एका स्तरावर आणण्यासाठी संत निवृत्तीनाथ यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना वारीची दीक्षा दिली. ह.भ.प. हैबतबाबा यांनी दिंडी सोहळ्याचे महत्त्व आणि वैभव वाढवले.

२. पंढरीला दिंडी नेणे, हा विठ्ठलभक्तांच्या जीवनातील ‘एक महामंत्र’
‘माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।’ – संत ज्ञानेश्वर महाराज
अर्थ : ‘मला हातात पताका घेऊन पंढरपूरला वारीला जावे, याची फार आवड आहे’, असे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
वरील अभंगाप्रमाणे प्रत्येक वर्षी पंढरपूरच्या वारीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीतून दिंडी-पताक्यांच्या परंपरने नेल्या जातात. पंढरीला दिंडी नेणे, हा सर्व विठ्ठलभक्तांच्या जीवनाचा ‘एक महामंत्र’ आहे. प्रत्येक वर्षी पालखीचे प्रस्थान आळंदीहून आषाढ शुद्ध प्रतिपदेला होते आणि आषाढ कृष्ण नवमीला पालखी आळंदीला परत येते.
३. ‘विठ्ठलाच्या भेटीचा आनंद लुटणे’, हा वारकर्यांचा उत्कट भाव !
दिंडीला निश्चित ध्येय असते आणि ते म्हणजे विठ्ठलाची ओढ ! ‘विठ्ठलही भक्तांची वाट पहात उभा असतो’, असे म्हटले जाते.
‘वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ।। – तुकाराम गाथा, अभंग १०९६
अर्थ : पांडुरंग भक्तांच्या भेटीसाठी पुष्कळ उतावीळ असतो आणि तो सारखी भक्तांची वाट पहात असतो.
यावरून ‘टाळ मृदंगांच्या नादघोषात नाचत, भजन करत विठ्ठलाचे दर्शन घेणे आणि त्याच्या भेटीचा आनंद लुटणे’, हा दिंडी वारकर्यांचा एक आध्यात्मिक भाव असतो.

४. विठ्ठलाच्या नामातून ब्रह्मरस आवडीने सेवन करणे
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम ।
आणिकांचे काम नाही तेथे ।। १ ।।
लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष ।
सेवूं ब्रह्मरस आवडीने ।। २ ।। – तुकाराम गाथा, अभंग १७९६
अर्थ : आम्ही केवळ एका विठोबाचेच नाम गाणार आहोत. आता या ठिकाणी अन्य कुणाचेही काहीच काम नाही. आम्ही मृदंग, वीणा स्वरात लावू आणि टाळांचा घोष करून ब्रह्मरस आवडीने सेवन करू.
५. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी लोकांना दिंडीची महती सांगून कर्मठांचा विरोध मोडून काढणे !
अशा या नादब्रह्माचा आरंभ ७४८ वर्षांपूर्वी झाला. संत निवृत्तीनाथ यांनी संत ज्ञानेश्वर यांना वारीची दीक्षा दिली. त्या वेळचा सामाजिक तणाव संत ज्ञानेश्वरांना ठाऊक होता. उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य हा माणसातील भेदभाव त्यांना बेचैन करत होता आणि हीच सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी संत ज्ञानेश्वर यांनी दिंडीचे आयोजन केले. दिंडी सोहळ्याचा मार्ग सर्वसामान्यांसाठी इतर मार्गाहून, म्हणजे ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि कर्ममार्ग या मार्गापेक्षा सुलभ होता; मात्र कर्मठांचा विरोध हा दिंडी मार्गातील एक मोठा अडसर होता. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी या कर्मठांचा विरोध मोडून काढण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. गावागावांतून, नगरानगरांतून भ्रमंती केली. लोकांना दिंडीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वर यांनी दिंडीची महती ‘ज्ञानेश्वरी’च्या ९ व्या अध्यायात अनेक उदाहरणांनी स्पष्ट केली आहे.
६. संत ज्ञानेश्वर यांच्या मार्गात कर्मठ ब्राह्मणांनी अडथळे आणणे आणि त्यावर मात करून भक्तीभावाने दिंडीला आरंभ होणे
कोणत्याही गोष्टीचे महत्त्व त्या त्या काळाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. त्या काळी अस्पृश्यांच्या सावलीचा विटाळ मानला जात होता. अस्पृश्य आणि नीच लोकांनी स्वतःची थुंकी रस्त्यावर न टाकता स्वतःच्याच गळ्यात अडकवलेल्या गाडग्यात (भांड्यात) टाकण्याचा तो काळ होता. अशा काळी सामाजिक समतेचा उच्चार आणि प्रचार संत ज्ञानेश्वर यांनी केला. ‘वारकर्यांना अस्पृश्यांचा विटाळ नाही. मनाच्या शुद्धतेसाठी वैचारिक खंडण आवश्यक नाही’, अशा प्रकारचे प्रगत विचार त्यांनी प्रसारित केले. संन्याशाची मुले म्हणून संत ज्ञानेश्वर यांचा कर्मठ ब्राह्मणांकडून दुःस्वास होत होताच. त्यात सर्वांना एकाच स्तरावर आणण्याचा संत ज्ञानेश्वर यांचा प्रयत्न कर्मठांना कसा आवडावा ? त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या मार्गात अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला; परंतु या सर्वांवर मात करून संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी दिंडीचे आयोजन केले. समाजातील सर्व स्तरातील लोक आपापसांतील भेदभाव विसरून मोठ्या भक्तीभावाने दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. अशा रितीने दिंडीला आरंभ झाला.
७. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रसार करणे

संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी भगवी पताका खांद्यावर घेऊन भागवत धर्माचा प्रसार उत्तर भारतात केला. संत ज्ञानेश्वर महाराज ४ वर्षे, तर संत नामदेव १२ वर्षे उत्तर भारतात कार्य करत होते. संत नामदेवांनी थेट पंजाबपर्यंत भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांच्या काही रचना हिंदी आणि गुरुमुखी या भाषांमध्ये आहेत. त्यांनी गुरुमुखी लिपित लिहिलेल्या अभंगांना ‘नामदेवजी की बाणी’ आणि हिंदी भाषेत लिहिलेल्या अभंगांना ‘नामदेवजी की हिंदी बाणी’, असे म्हटले जाते. गुरुमुखी भाषेतील काही रचना शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरुग्रंथसाहिब’ यात आहेत.
८. संत-महात्म्यांनी विकसित केलेला दिंडी सोहळा आजही अखंडितपणे चालू असणे !
विशिष्ट हेतूने प्रेरित झालेल्या दिंडीला लोकाश्रय लगेच मिळाला. दिंडीमागे सामाजिक, सांस्कृतिक, तसेच पारमार्थिक थोर परंपरा आहे. जगद्गुरु संत तुकोबा आणि संत निळोबा यांचा काळ तर दिंडीचा परम उत्कर्ष काळ म्हणावा लागेल. परमेश्वराची सर्व रूपे एकच आहेत. या परमेश्वराचे मूर्त सगुण रूप म्हणजे विठ्ठल आणि ‘सर्व भेद विसरून दिंडी रूपाने विठ्ठलाच्या भेटीला जाणे’, हा त्याच्या चरणी लीन होण्याचा मार्ग होय. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी चालू केलेला अन् संत तुकाराम आदी अनेक संत-महात्म्यांनी विकसित केलेला दिंडी सोहळा आजही अखंडितपणे चालू आहे आणि ही परंपरा अशीच पुढे रहाणार आहे.’
– नामदेव शेटे
(साभार : मासिक ‘दीपावली अंक’, १९७८)
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !