‘वर्ष १९८९ पासून सलग १० वर्षे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा प्रत्यक्ष (स्थुलातून) सत्संग लाभला. त्यांच्या समवेत असतांना मला अविस्मरणीय प्रसंग अनुभवायला मिळाले. त्या प्रसंगांना व्यावहारिक दृष्टीने विशेष महत्त्व नसले, तरी ते प्रसंग अध्यात्म आणि साधना यांच्या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे होते अन् त्यातून मला पुष्कळ शिकता आले. ‘प्रत्यक्ष भगवंतानेच मला शिकवले’, अशी मला कृतज्ञतापूर्वक जाणीव होत असते. त्यातील मला आठवत असलेले काही प्रसंग पुढे दिले आहेत. यातील काही प्रसंग २८ ऑक्टोबर या दिवशी पाहिले. आज उर्वरित प्रसंग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/971202.html

८. नवीन चारचाकी गाडी विकत घेतांना ‘स्वतःचे स्वभावदोष आड न येता सर्व बाजूंनी कसा विचार करावा ?’ याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे
एकदा मला नवीन चारचाकी वाहन विकत घ्यायचे होते. माझ्या कुटुंबियांच्या काही अपेक्षा होत्या, उदा. मोठी गाडी घेणे, त्यांना आवडणार्या आस्थापनांची गाडी घेणे, अमुक रंगाची घेणे इत्यादी. त्यामुळे माझे मन थोडे गोंधळले होते. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आपल्याला ‘अ’ ठिकाणाहून ‘ब’ ठिकाणी जायचे असते. तो प्रवास करण्यासाठी आवश्यक तेवढे प्रवासी आणि साहित्य घेऊन जाणारी चारचाकी घेतली की, झाले. गाडीसाठी लागणारी दुरुस्ती आणि पेट्रोल यांचा व्यय अल्प असावा.’’ परात्पर गुरु डॉक्टरांकडेही लहान आणि साधी (मारुती ८००) चारचाकी होती. त्यांनी गाडी विकत घेण्याविषयीचे सूत्र सहजपणे सांगितल्यामुळे माझे मन सकारात्मक आणि उत्साही झाले. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपोआप घडत गेले. या प्रसंगातून त्यांनी मला अनेक सूत्रे शिकवली, उदा. प्रतिमा न जपणे, काटकसरीपणा, प्रतिष्ठेचा विचार न करणे, ‘आपल्याला आणि कुटुंबियांना काय आवडेल ?’ याऐवजी ‘देवाला काय आवडेल ?’ असे करणे.
९. महाड येथील हॉटेलमध्ये आवडेल तो पदार्थ खाणे
डिसेंबर १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रायगड जिल्ह्याचा पहिला प्रसारदौरा होता. त्यांच्या समवेत कै. पू. विनय भावे (सनातनचे ३५ वे (व्यष्टी) संत), डॉ. (सौ.) कुंदा आठवले आणि मी चालक म्हणून होतो. तेव्हा अध्यात्माचा प्रसार नवीन ठिकाणी असल्यामुळे आम्ही जिथे मिळेल, तिथे रहात आणि खात होतो. हे ईश्वरी कार्य असल्यामुळे आणि परात्पर गुरु डॉक्टरूपी ईश्वर समवेत असल्यामुळे त्या ५ दिवसांच्या दौर्यात आम्हाला कशाचीही उणीव भासली नाही. आम्ही सकाळी महाड येथून पुढे जात होतो. तेव्हा एका उपाहारगृहासमोर आम्ही चारचाकी थांबवली. त्यामध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी मसाला डोसा आणि कॉफी घेतली. आम्ही मसाला डोसा आणि ज्याला आवडेल, ते पदार्थ खाल्ले.
सप्तर्षि ‘जीवनाडीपट्टी’, तसेच विविध नाडीभविष्य ग्रंथांमध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे. तरीही ते अत्यंत साधेपणाने आणि सहजतेने वागतात. ‘भक्त किंवा शिष्य बनण्यात जो आनंद आहे, तो महाराज किंवा गुरु बनण्यात नाही’, हे परात्पर गुरु डॉक्टरांचे सुवचन ते स्वतःच्या आचरणातून शिकवतात.

१०. मानसरोवर यात्रा करण्यासाठी साधकाला प्रोत्साहन देणे
वर्ष २००५ मध्ये माझ्या पत्नीने (सौ. बैजू वटकर, तेव्हाचे वय ५३ वर्षे) मला मानसरोवर आणि कैलाशपर्वत यात्रेला जाण्याविषयी आग्रह केला. थोडी थंडी असली, तरी मला सर्दीचा त्रास होतो. कैलाश आणि मानसरोवर येथे पुष्कळ थंडी, अल्प ऑक्सिजन आणि प्रतिकूल हवामान असते. त्यामुळे मी यात्रेला जाण्याचे टाळत होतो. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही मानसरोवर आणि कैलाश यात्रेला जाऊ शकता. अशा पवित्र ठिकाणी जाण्याची संधी सर्वांना मिळत नाही. आयुष्यात कधीतरी संधी मिळत असते.’’ हे ऐकून मला आश्चर्य वाटले. ‘ते माझ्या प्रकृतीचा विचार करून ‘जाऊ नका’, असे सांगतील’, असे आरंभी मला वाटत होते; पण त्यांनी सांगितल्यामुळे मी यात्रेला जाण्याचे धाडस केले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला कसलाही त्रास झाला नाही. मी काठमांडू (नेपाळ) ते मानसरोवर आणि परत काठमांडू हा १७ दिवसांचा प्रवास सुखरूपपणे करू शकलो. माझ्या समवेत असलेले बरेच प्रवासी आजारी पडले. ही यात्रा आध्यात्मिक स्तरावर झाली आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला बर्याच अनुभूती आल्या. या प्रसंगातून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधनेसंदर्भात अनेक सूत्रे शिकवली, उदा. ईश्वरेच्छेने मिळालेली संधी स्वीकारणे, प्रतिकूल वातावरणाचा नकारात्मक विचार न करता गुरूंवर श्रद्धा ठेवून कृती करणे, गुरूंचे आज्ञापालन करणे, आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने रहाणे.
११. प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून वापरल्या जाणार्या ‘इलेक्ट्रॉनिक डायरी’सारख्या मायेतील वस्तूंविषयी आसक्ती न्यून करणे
पूर्वी दूरभाष (लँडलाईन फोन) होते. मी माझ्या संपर्कातील लोकांचे दूरभाष क्रमांक नोंदवहीत लिहित असे. तेव्हा काही जणांकडे दूरभाष क्रमांक लिहिणे आणि गणित सोडवणे यांसाठी ‘इलेक्ट्रॉनिक डायर्या (गणकयंत्रे)’ होती. त्यामुळे मी एका साधिकेला हाँगकाँगवरून ‘इलेक्ट्रॉनिक डायरी’ आणण्यास सांगितली होती. त्या साधिकेने ती ‘डायरी’ आणली आणि ती डायरी मला देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे दिली. मी त्या ‘डायरी’विषयी परात्पर गुरु डॉक्टरांना २ वेळा विचारले; पण त्यांनी ‘ती डायरी नंतर देतो’, असे सांगितले. मला ती ‘डायरी’ पहाण्याची पुष्कळ ओढ लागली होती. त्यानंतर २ आठवड्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ती ‘डायरी’ दिली. प्रत्यक्षात त्या डायरीचा मला विशेष उपयोग झाला नाही. केवळ प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून मी ती डायरी काही दिवस वापरली. यातून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘मायेतील गोष्टीची आसक्ती न्यून करणे, प्रतिमा न जपणे, प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून अनावश्यक वस्तू विकत न घेणे इत्यादी’ शिकवले.
१२. ‘साधकाने अध्यात्म आणि साधना’ या विषयांवरील लिखाण लिहून दिल्यावर त्यातील चुका दाखवणे अन् चुकांतून शिकवून साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे
वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या शेवटच्या आजारपणात परात्पर गुरु डॉ. आठवले प.पू. बाबांच्या समवेत मुंबई बाहेर होते. त्यापूर्वी मी परात्पर गुरु डॉक्टरांचे अनुमाने दीड घंट्यांचे ‘अध्यात्म आणि साधना’ या विषयांवरील प्रवचन १०० हून अधिक वेळा ऐकले होते आणि लिहूनही घेतले होते. मी त्या प्रवचनाविषयीचे लिखाण ‘इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर’वर टंकलिखित करून घेतले आणि ते परात्पर गुरु डॉक्टरांकडे एका साधकांद्वारे पाठवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी ते लिखाण वाचले. त्यांनी त्यातील चुका मी लिखाण केलेल्या कागदांच्या समासातील मोकळ्या भागावर लिहिल्या. त्यांनी ती कागदपत्रे मला परत पाठवली. माझ्याकडून शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या पुष्कळ चुका झाल्या होत्या. परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुम्हाला एवढेही कसे येत नाही ! फार चुका आहेत.’’ तेव्हा माझ्यातील ‘कर्तेपणा घेणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी’ अहंच्या पैलूंमुळे मला वाईट वाटले होते. काही दिवसांनी परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुम्ही टंकलेखन करून घेतले, ते छान केले. आता आपण त्यावर एक ग्रंथ काढू. तो ग्रंथ जिज्ञासूंना आणि साधना या विषयावर प्रवचन घेणार्या साधकांनाही उपयोगी पडेल.’’ त्यानंतर ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा ग्रंथ प्रकाशित केला गेला. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या चुका दाखवून माझ्या साधनेत होणारी हानी थांबवली. त्यानंतर त्यांनी मला प्रोत्साहन देऊन माझे कौतुक करून माझ्याकडून साधना आणि समष्टी सेवा करून घेतली.
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘त्यांचे आचरण, त्यांचे बोलणे आणि वागणे’ यांतून मला शिकवले अन् घडवले. त्यांची प्रत्येक कृती, बोलणे आणि वागणे हे धर्मसंमत अन् नितीनियमाला धरूनच असते. एवढेच नव्हे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले हेच माझ्यासाठी धर्म आणि ब्रह्म आहेत. श्रीकृष्णाने जसे पांडव आणि त्याचे भक्त यांना शिकवले, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आम्हा साधकांना शिकवत अन् घडवत आहेत. त्याबद्दल त्यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
(समाप्त)
– (पू.) श्री. शिवाजी वटकर (वय ७९ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल, (५.५.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !