‘वर्ष १९८९ पासून सलग १० वर्षे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा प्रत्यक्ष (स्थुलातून) सत्संग लाभला. त्यांच्या समवेत असतांना मला अविस्मरणीय प्रसंग अनुभवायला मिळाले. त्या प्रसंगांना व्यावहारिक दृष्टीने विशेष महत्त्व नसले, तरी ते प्रसंग अध्यात्म आणि साधना यांच्या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे होते अन् त्यातून मला पुष्कळ शिकता आले. ‘प्रत्यक्ष भगवंतानेच मला शिकवले’, अशी मला कृतज्ञतापूर्वक जाणीव होत असते. त्यातील मला आठवत असलेले काही प्रसंग पुढे दिले आहेत.

१. पाठकोर्या आणि टाकाऊ लहान कागदांवर लिहिणे अन् काटकसरीपणा हा ईश्वरी गुण शिकवणे
‘माझे अभियांत्रिकी शिक्षण होईपर्यंत मी वह्या आणि कागद यांचा उपयोग काटकसर किंवा कसलाही विचार न करता करायचो. त्यानंतर मी ‘शिपिंग कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लि.’ या मोठ्या आस्थापनात वरिष्ठ पदावर नोकरी करत होतो. तिथे कागद वापरण्यास विशेष निर्बंध नव्हते. त्यामुळे तेथील कर्मचारी मनाला येईल, तसे कोर्या आणि चांगल्या प्रतीच्या कागदांचा मुक्तहस्ते वापर करत असत.
वर्ष १९८९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या जीवनात आले. तेव्हा ‘ते बसच्या तिकिटाच्या मागील कोर्या भागावर, त्यांना पोष्टाने आलेली पाकिटे आणि आंतरदेशीय पत्रे यांच्या कोर्या भागांवर, अन्य लहान पाठकोर्या कागदांवर लिहित आहेत’, असे मी पाहिले. विशेष म्हणजे त्यांचे लिखाण अध्यात्म आणि साधना या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे असायचे. तरीही ‘ते अशा टाकाऊ कागदांवर लिहितात’, हे पाहून मला आश्चर्य वाटले. परात्पर गुरु डॉक्टर मुंबईबाहेर असतांना मी त्यांना काही पत्रे पाठवली होती. त्यांनी मी पाठवलेल्या कागदांच्या कोर्या भागांवर उत्तरे लिहून ती पत्रे मला परत पाठवली. यातून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्यांच्यातील ईश्वरी गुण शिकवले, उदा. काटकसरीपणा, पर्यावरणाचा र्हास रोखणे, इतरांचा विचार करणे.
२. दाढी करत असतांना साधकांशी बोलणे आणि सेवेविषयी शंकानिरसन करणे
सकाळी मी कार्यालयाला जातांना अधूनमधून सेवेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासस्थानी जात असे. एकदा सकाळी ८ वाजता मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ते हस्तप्रक्षालनपात्राच्या (‘वॉशबेसिन’च्या) पुढे उभे राहून दाढी करत होते. त्यांच्या अंगावर केवळ पायजमा होता. हे पाहून ‘त्या वेळी मी त्यांना माझ्या सेवेतील अडचणी विचारणे अयोग्य आहे’, असे मला वाटले. मी संकोचलो आणि ‘‘थोड्या वेळानंतर तुमच्याकडे येतो’’, असे सांगून मी तिथून जाऊ लागलो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही माझी वाट पहात बसू नका. तुम्हाला पुढे कार्यालयात जायचे आहे. आताच आपण बोलून घेऊ.’’ माझ्या आयुष्यात असा इतरांचा विचार करणारी आणि सहजावस्थेत रहाणारी पहिलीच महनीय व्यक्ती मला भेटली होती. तेव्हा माझा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला. या प्रसंगातून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला अनेक दैवी गुण शिकवले, उदा. इतरांचा पराकोटीचा विचार करणे, प्रतिमा न जपणे, जवळीक साधणे, अनौपचारिक वागणे, वेळेचा सदुपयोग करणे, सहजता इत्यादी.

३. प्रवासाला निघण्यापूर्वी परिपूर्ण नियोजन करणे आणि प्रवास करत असतांना वाचन करणे
१९९० ते १९९८ या कालावधीत मी बर्याच वेळा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत चारचाकी गाडीने प्रवास केला. ते सकाळीच बाहेरगावी जाण्यास निघायचे. ते घरून निघण्यापूर्वी ‘गाडीचा चालक कोण असेल ? कोणते साधक साधना शिकण्यासाठी समवेत घ्यायचे ?’ इत्यादींचे नियोजन करत असत. तसेच साहित्याची सूची करून गाडीत योग्य रितीने साहित्य भरत असत. मुंबईहून निघाल्यावर ‘प्रथम लागणार्या गावात थांबून तेथील साधकांना काही साहित्य किंवा खाऊ द्यायचा असेल, तर ते साहित्य अन्य साहित्याच्या वर आणि लगेच सहजपणे मिळेल’, असे गाडीमध्ये ठेवायला साधकांना सांगत. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना जागरण करावे लागत असे. गाडीमध्ये साधकसंख्या आणि साहित्य एवढे भरलेले असे की, गाडीत थोडीसुद्धा जागा शेष रहात नसे.
त्याच किंवा दुसर्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रवचन, सत्संग किंवा साधकांना मार्गदर्शन यांचे नियोजन केलेले असे. त्यासाठी किंवा ग्रंथ लिखाणासाठी ते प्रवासात गाडीमध्ये बसून वाचन करत असत. त्यांनी आम्हाला ‘साधना आणि सेवा म्हणून प्रवास करणे, गाडीने साहित्य नेणे, वेळ इत्यादींचे नियोजन कसे करावे ?’ हे शिकवले.
परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘प्रत्येक कृती सत्यम्, शिवम् आणि सुंदरम् अशी केली, तर साधना होते’, हा साधनेचा मूलमंत्रच दिला.
४. जेवतांना साधकाच्या सेवेतील शंकांचे निरसन करणे
वर्ष १९९२ मध्ये एके दिवशी दुपारी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काही शंका विचारायला गेलो होतो. त्यांच्या सदनिकेत प्रवेश केल्यावर आरंभी स्वयंपाकघर आहे. मी तेथून पुढे जात असतांना मला परात्पर गुरु डॉक्टर स्वयंपाकघरात महाप्रसाद घेत असलेले दिसले. ते जेवण करत असतांना ‘मी अयोग्य वेळी आलो’, असे मला वाटले आणि मी परत फिरलो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला बोलावले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला काय विचारायचे ? ते विचारू शकता.’’ याचे मला आश्चर्य वाटले; कारण ‘एखादी महनीय व्यक्ती असेल, तर त्यांना जेवण करतांना कुणी भेटणे किंवा बोलणे मुळीच आवडत नाही’, असा माझा अनुभव होता. ‘मला निदान जेवण तरी शांतपणे घेऊ द्या’, असे सर्व जण सांगत असतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी स्वयंपाकघरातील एका स्टुलावर बसून त्यांच्याकडून शंकानिरसन करून घेतले.
त्यानंतर मला पुष्कळ गहिवरून आले आणि माझी भावजागृती झाली. त्यांनी मला त्यांच्या कुटुंबियांतील सदस्यासारखे वागवले, तसेच आपुलकी दाखवून प्रेम दिले. त्यांनी स्वतःला महत्त्व दिले नाही. ‘प्रेमभाव, साधकांचा वेळ आणि वेळेची काटकसर कशी करावी ?’, हे मला शिकवले.
५. साधकांचा वाढदिवस साजरा करून कौतुक करणे
माझा जन्म एका खेडेगावात झाला. ‘वाढदिवस साजरा करायचा असतो’, हे मला ठाऊक नव्हते. मी सेवेसाठी मुंबई येथील सेवाकेंद्रात जात असे. माझा जन्मदिवस आणि श्री. दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५८ वर्षे) यांचा जन्मदिवस एकाच दिवशी आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर आम्हा दोघांचा वाढदिवस प्रतिवर्षी त्याच दिवशी आवर्जून साजरा करत असत. ते सेवाकेंद्रातील भाव असलेल्या एखाद्या साधिकेला आमचे औक्षण करण्यास सांगत. आम्हाला मिठाई आणि आईस्क्रीम देत असत. तेव्हापासून आतापर्यंत साधक आणि संत माझा वाढदिवस साजरा करून मला आशीर्वाद देत आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या आचरणातून माझ्याशी कौटुंबिक नाते जोडले. त्यांनी माझ्यावर प्रीतीचा अखंड वर्षाव केला आणि ‘गुरुमाऊलीची माया कशी असते ?’, ते शिकवले. त्यांना आम्हाला ‘हे विश्वची माझे घर आणि वसुधैव कुटुम्बकम् ।’ हे सूत्र शिकवायचे आहे.
६. कर्मकांडाच्या पलीकडे गेलेले परात्पर गुरु डॉ. आठवले
जुलै मासात एके दिवशी पुष्कळ पाऊस पडत होता. संध्याकाळी कार्यालयातून सुटल्यावर मी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून वडापाव घेऊन मुंबई सेवाकेंद्रात गेलो. सर्व साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वडापाव दिला. सर्वांनी तो आवडीने खाल्ला. शेवटी एका साधिकांना वडापाव द्यायला गेलो. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘आज आषाढी एकादशी आहे. माझा उपवास आहे. मी वडापाव कसा खाणार !’’ तेव्हा मला माझी चूक लक्षात आली.
परात्पर गुरु डॉक्टरांनीही वडापाव खाल्ला होता. त्यातून मला शिकायला मिळाले, ‘परात्पर गुरु डॉक्टर कर्मकांडाच्या पलीकडे गेले आहेत. ‘भगवंत भावाचा भुकेला असतो’, असे त्यांचे आहे. जसे श्रीरामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली, तसेच परात्पर गुरु डॉक्टर हे प्रभु श्रीरामच आहेत.’
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रेल्वेने रात्रीचा प्रवास करत असतांना बरोबरच्या सर्वांनी एकाच ‘कंपार्टमेंट’मध्ये झोपण्याचा विचार न करता जिथे जागा मिळेल, तिथे झोपून प्रवास करणे चांगले
वर्ष १९९४ मधील दिवाळीसाठी आम्हाला प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील आश्रमात जाण्याची संधी मिळाली. मी आणि माझी पत्नी (सौ. बैजू वटकर) अन् २ मुले (नितीन आणि स्वाती) इंदूरला रेल्वेने गेलो होतो. आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या समवेत रेल्वेने प्रवास करत होतो. रात्रीची वेळ होती. आम्ही सर्व जण एका बोगीत होतो; पण एका ‘कंपार्टमेंट’मध्ये नव्हतो. परात्पर गुरु डॉक्टरांचा आसन क्रमांक शेजारच्या ‘कंपार्टमेंट’मध्ये होता. मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्हाला आमच्या ‘कंपार्टमेंट’मध्ये येण्यासाठी मी अन्य प्रवाशाला विनंती करतो.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘असे करण्याची आवश्यकता नाही. आपण रात्री झोपूनच जाणार आहोत.’’ हे असे कुणीतरी म्हटल्याचे मी प्रथमच ऐकले; कारण अन्य लोक प्रवास करतांना एकत्रित आणि गप्पागोष्टी करत प्रवास करता यावा; म्हणून आटापिटा करतात. यातून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला साधनेविषयी अनेक सूत्रे शिकवली, उदा. परिस्थिती स्वीकारणे, सहजता, सकारात्मक विचार करणे, भावनाशील न होणे, इतरांचा विचार करणे.
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७९ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.५.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/971442.html
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !