Indigenous Youth Organisation : ईटानगर (अरुणाचल प्रदेश) येथे बांगलादेशी घुसखोर आणि बेकायदेशीर मशिदी यांच्याविरोधात युवकांचे आंदोलन

ईटानगर (अरुणाचल प्रदेश) – येथे २४ ऑक्टोबर या दिवशी ‘अरुणाचल प्रदेश इंडिजिनस युथ ऑर्गनायझेशन’ या संघटेच्या नेतृत्वाखाली ‘ऑल कॅपिटल कॉम्प्लेक्स युथ वेलफेअर असोसिएशन’ आणि ‘ऑल नाहरलागुन युथ वेलफेअर असोसिएशन’ या संस्थांच्या शेकडो युवक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बांगलादेशी घुसखोर अन् अवैध मशिदी यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यांच्या हातात ‘बांगलादेशी घुसखोर परत जा’ आणि ‘अरुणाचल प्रदेश वाचवा’, अशा घोषवाक्यांचे फलक होते. या वेळी ‘सरकारने १५ दिवसांत कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल’, अशी चेतावणी देण्यात आली.

अरुणाचलमध्ये मिशनरींकडून धर्मांतर आणि मुसलमानांची घुसखोरी

म्यानमारच्या सीमेलगत असलेल्या अरुणाचल प्रदेशात सध्या ख्रिस्ती मिशनरींकडून होणारे धर्मांतर आणि मुसलमानांची घुसखोरी ही २ गंभीर संकटे निर्माण झाली आहेत. या घुसखोरीमुळे स्थानिक समाज त्रस्त झाला असून युवकांचा संताप उसळला आहे. आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की, ईटानगर आणि नाहरलागुन या शहरांमध्ये मुसलमानांनी  बेकायदेशीरपणे भूमी कह्यात घेऊन १५ ते २० मशिदी अन् धार्मिक स्थळे उभारली आहेत. प्रशासनाने ती तात्काळ हटवावीत.

अरुणाचलची सांस्कृतिक ओळखच धोक्यात !

‘अरुणाचल प्रदेश इंडिजिनस युथ ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष तारो सोनम लियाक यांनी सांगितले की, प्रतिदिन अनुमाने १-२ सहस्र मुसलमान ‘इनर लाईन परमिट’ (शेजारील देशांतील नागरिकांना भारतीय भूमीत काही अंतरापर्यंत प्रवेश करण्याचा परवाना) दाखवून अरुणाचल प्रदेशात प्रवेश करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, हे लोक परवाना दाखवतात; पण नंतर गर्दीत लपून बसतात आणि परत आपल्या मूळ ठिकाणी जात नाहीत. वाढत्या इस्लामी लोकसंख्येमुळे राज्याचे लोकसंख्यात्मक स्वरूप पालटत आहे, तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक सुरक्षा यांनाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. बाहेरच्या लोकांच्या वाढत्या ठिकाणांमुळे अमली पदार्थ आणि व्यसनाधीनता यांच्या समस्या वाढत असून स्थानिक युवक त्याच्या विळख्यात अडकत आहेत. सरकारने वेळेवर पावले उचलली नाहीत, तर अरुणाचलची सांस्कृतिक ओळखच धोक्यात येईल.

राज्याच्या मुख्य सचिवांना दिले पत्र !

या समस्यांविषयी आंदोलन करणार्‍या संस्थांनी अरुणाचल प्रदेशच्या मुख्य सचिवांना २ पानी निवेदन दिले आहे. या पत्रात ‘राजधानी परिसरातील सर्व बेकायदेशीर मशिदी आणि मदरसे तात्काळ हटवावेत अन् बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करावे’, अशी मागणी करण्यात आली आहे. यात पत्रात पुढे म्हटले आहे, ‘१३ सहस्र ७३० मुसलमान रहातात, त्यापैकी २० टक्के बांगलादेशी आहेत, जे स्थानिक लोकांसाठी गंभीर धोका ठरत आहेत, तसेच राज्य सरकारच्या माहितीसह १० हून अधिक अवैध मशिदी चालवल्या जात आहेत. त्यामुळे या भागात केवळ २ अधिकृत मशिदींना अनुमती द्यावी आणि उर्वरित सर्व हटवाव्यात.’

साप्ताहिक बाजारांवर निर्बंधांची मागणी

राजधानी परिसर आणि आसपासच्या दोईमुख, होलोंगी यांसारख्या भागांतील साप्ताहिक बाजारांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या बाजारांत मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी व्यापारी म्हणून येतात आणि भाड्याच्या खोल्यांत रहातात, ज्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

‘इनर लाईन परमिट’चा गैरवापर वाढला !

सीमेवरील राज्य असल्याने अरुणाचल प्रदेशात बाहेरील नागरिकांना प्रवेशासाठी ‘इनर लाईन परमिट’ अनिवार्य आहे; परंतु स्थानिक संघटनांचे म्हणणे आहे की, या अनुमतीचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर अवैध वसाहती निर्माण केल्या जात आहेत, ज्यामुळे राज्याच्या ओळखीवर गंभीर धोका निर्माण झाला आहे.

संपादकीय भूमिका

जनतेला असे आंदोलन का करावे लागते ? सरकार घुसखोरांना बाहेर का काढत नाही ? अवैध मशिदींवर कारवाई का करत नाही ?