‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झालेला इशित भट्ट आणि सुसंस्कारांचे महत्त्व !

‘सोनी (हिंदी)’ वाहिनीवर प्रसारित करण्यात येणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय असून या कार्यक्रमाने स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आहे. या कार्यक्रमातून ज्ञान आणि माहिती प्रेक्षकांना मिळते, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या कार्यक्रमात पाचारण करून त्यांच्या कार्याविषयीची माहिती प्रेक्षकांना मिळते. या निमित्ताने अनेकांचे विचार ऐकायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षक बहुश्रुत होतो. अभिनेते अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करतात. त्यांच्या शालीनतेचे दर्शन प्रेक्षकांना होत असते. शाळकरी मुलेसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. या मुलांची हुशारीसुद्धा थक्क करणारी असते, अशी या कार्यक्रमाची जमेची बाजू आहे. 

काही दिवसांपूर्वीच काही शाळकरी मुलांचा सहभाग असलेला कार्यक्रम माझ्या पहाण्यात आला. त्यात इशित भट्ट नावाचा एक १० वर्षांचा मुलगा स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या मुलाचे एकूण वर्तन कुणालाही खटकणारे होते, यात शंका नाही. तो भाग प्रकाशित झाल्यानंतर या मुलाला सर्वांनी चारही बाजूंनी घेरले असल्याचे दिसून येत आहे. त्याच्यावर टिकेची झोड उठवली जात आहे. त्यासह त्याच्या माता-पित्यांवरही टीका केली जात आहे. काहींचे म्हणणे आहे की, या मुलाने त्याच्या शाळेचे नावसुद्धा खराब केले आहे. मानसोपचार तज्ञांनी इशित भट्ट या मुलाच्या वर्तनाचे शास्त्रीय विश्लेषण केले आहे. केवळ १० वर्षे वयाच्या मुलाच्या वर्तनावर सोडण्यात आलेले टीकास्त्र सामाजिक माध्यमांवर सातत्याने फिरत राहिले आहे. या सर्वांचा गंभीरपणे विचार करणे भाग आहे. इशित भट्टचा तो भाग ‘सोनी टीव्ही’ने प्रसारित केला, त्यावर काही भाष्य करणे नितांत आवश्यक आहे.

अमिताभ बच्चन आणि इशित भट्ट

१. इशित भट्टचे वर्तन पाहून वाहिनीच्या अधिकार्‍यांनी त्याला वेळीच समज का दिली नाही ?

‘१० वर्षांचा हा मुलगा मला नियम ठाऊक आहेत. आता मला नियम सांगत बसू नका’, असे सूत्रसंचालन करणार्‍या अमिताभ बच्चन यांना सांगतो, तसेच ‘हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे का ?’, असे एका प्रश्नाच्या वेळी त्याने अमिताभ बच्चन यांना विचारले. अशी बडबड करून या मुलाने त्याच्या वयाला न शोभणारे वर्तन करून त्याच्यापेक्षा वयाने अनेक पटींनी मोठ्या असलेल्या व्यक्तीचा जो अपमान केला, त्यामुळे संताप येणे स्वाभाविक आहे. असे असले, तरीसुद्धा त्या मुलाचे वय लक्षात घेऊन काय करायला हवे होते, ते सांगणे इथे अगत्याचे वाटते.

‘मला नियम ठाऊक आहेत. आता मला नियम सांगत बसू नका’, असे हा मुलगा म्हणताच त्याच्या एकंदर वर्तनाचा अंदाज निश्चित आला असणार. तो लक्षात घेऊन तिथेच चित्रीकरण का थांबवण्यात आले नाही ? त्यानंतर त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना समोर बसवून या कार्यक्रमाचे जे संबंधित प्रमुख आहेत, त्यांनी त्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न का केला नाही ? ‘खेळाचे नियम  समजावून सांगणे, हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. या आखलेल्या चौकटीच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही. प्रत्येक खेळाचे जसे नियम असतात, तसे नियम या खेळाचेही आहेत. या खेळात तू सहभागी झाल्यामुळे तुला या खेळातील सर्व नियमांचे पालन केलेच पाहिजे, तरच तुला खेळात सहभाग घेता येईल’, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न का केला गेला नाही ? या निमित्ताने त्या बालकाचे वर्तन सुधारण्यासाठी एक विशिष्ट उंची गाठलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजकांना तसा प्रयत्न करून, तसेच नव्याने त्याचे चित्रीकरण करून ते सादर करता आले असते.

श्री. दुर्गेश परुळकर

२. आयोजकांनी कार्यक्रमाचा भाग प्रसारित न करणे योग्य !

लहान मुलांकडून कळत नकळत चुका घडत असतात. त्यांच्या वर्तनात दोष असतात. ‘असे वर्तनातील दोष आणि त्यांच्याकडून अजाणतेने घडणार्‍या चुका सुधारून मुलांवर चांगले संस्कारसुद्धा या कार्यक्रमात केले जातात. हा कार्यक्रम लहान मुलांना माहिती, ज्ञान देऊन बहुश्रुततेने समृद्ध करतो, तसेच आर्थिक समृद्धतासुद्धा प्राप्त करून देतो’, असा संदेश या कार्यक्रमाच्या आयोजकांना पालकांद्वारे देण्याची संधी प्राप्त झाली असती. त्याने या कार्यक्रमाची उंची अधिक वाढली असती. आयोजकांना जर हे शक्य नसेल, तर त्यांनी हा भाग प्रदर्शित करण्याचे टाळले असते, तरी पुष्कळ काही साध्य करता आले असते.

३. इशितवरील टीकेचे परिणाम आणि दोष निर्मूलनाची संधी देऊन घडवण्याचे महत्त्व

१० वर्षांच्या या मुलावर सर्व बाजूने होत असलेली टीका ही त्याचे भावी आयुष्य नष्ट करण्यास कारणीभूत ठरणार नाही का ? त्या बालवयाच्या मुलाची वर्तन चिकित्सा करून त्या मुलाचे दोष उगाळत बसणे, हे योग्य आहे का ? याचाही विचार करणे नितांत आवश्यक आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतो. हा तर लहान मुलगा आहे, त्याचे दोष सुधारून त्याला समाजात सुसंस्कारित करून वावरण्याचा मार्ग दाखवण्याची संधी जाणकारांनी गमावली, असे वाटते.

घडल्या प्रकाराने पालकांना झालेला पश्चात्ताप आणि मुलाचे भवितव्य घडवण्यासाठी त्याच्यातील दोष दूर करून त्याला सुजाण नागरिक म्हणून समाजात वावरता यावे, असा प्रयत्न केला गेला अन् उद्या तो खरच एक सुजाण, सभ्य नागरिक म्हणून समाजात वावरू लागला, तर त्याला त्याने त्याच्या वयाच्या १० व्या वर्षी केलेल्या वर्तन दोषाचा दाखला दिल्यास त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. अशा परिस्थितीला त्या मुलाला (इशित भट्टला) भविष्यात सामोरे जावे लागणार नाही का ? ही शक्यता कार्यक्रम प्रसारित करण्यापूर्वी विचारात घेतली असती, तर ते सयुक्तिक ठरले असते.

४. बालकांमध्ये असलेले दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ! 

थोडक्यात ‘शाळकरी मुलांचे वय लक्षात घेऊन त्यांना सुसंस्कारित करून आणि त्याच्यातील दोष दूर करून त्यांना खेळण्याची संधी दिली जाते’, असा संदेश ‘सोनी’ वाहिनीने समाजाला दिला असता, तसेच बालकांमध्ये असलेले दोष दूर करण्यासाठी एखादी वाहिनी प्रयत्नशील आहे, ही गोष्ट आजच्या काळात मानसिक अन् भावनिक आधार देण्यासाठी पुरेशी ठरली असती.

१८ वर्षांच्या आतील मुलांनी जर काही अपराध केला, तर अशा मुलांना सुधारगृहात पाठवले जाते. त्याच्यावर सुसंस्कार केले जातात. त्यांना सभ्य नागरिक म्हणून समाजात वावरता यावे, म्हणून प्रयत्न केला जातो. या गोष्टीचा आपल्याला विसर पडावा, हे खरेच दुःखदायक आणि चिंतेचे आहे.

इति लेखन मीमांसा !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२१.१०.२०२५)