‘दीपावली नरकचतुर्दशी २०२५’ निमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांना अलंकार परिधान !

अलंकाराने सुशोभित श्री विठ्ठल-रुक्मिणीमाता

पंढरपूर – नरकचतुर्दशीनिमित्त पोशाखाच्या वेळी प्रत्येक वर्षी प्रथा-परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, हिर्‍याचा कंगन जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी १ पदरी, मोत्याची कंठी २ पदरी, १० लोलक असलेला शिरपेच, मस्त्य जोड, तोडे जोड, सूर्यकळ्यांचा हार, सोन्याचे पैंजण जोड, तुळशीची माळ १ पदरी, नक्ष्मी टोप इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

श्री रुक्मिणीमातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. श्री राधिकामातेस नक्षी टोप, ठुशी, मोत्याचा कंठा मोठा, पुतळ्यांची माळ आणि श्री सत्यभामा मातेस सिद्धेश्वर टोप, मोत्याचा कंठा, ठुशी, पुतळ्यांची माळ, इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रूप पहाण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.