संपादकीय : हिंदूंच्या अस्तित्वासाठी जातीपातीचे निर्मूलन !

मध्यप्रदेश उच्च न्यायालय

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने ‘जातीपातीमुळे पुढील १०० ते १५० वर्षांत भारतातून हिंदु धर्माचे अस्तित्व नष्ट होऊ शकते’, अशी भीती व्यक्त केली; मात्र यावर देशपातळीवर किंवा हिंदुत्वनिष्ठ पक्ष अन् संघटना यांत कुठेही चर्चा झाली नाही. यातून असे समजायचे का कि देशात जातपात आवश्यक आहे आणि त्यासाठी हिंदु धर्माचे अस्तित्व संपले, तरी चालेल ? रा.स्व. संघ जातपात मानत नाही, असे म्हटले जाते, तरी त्याच्यावर ब्राह्मणी संघटना म्हणून टीका केली जाते. या देशात जातीपातीच्या राजकारणाखेरीज राजकारण होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. जात विचारल्याविना राजकारणात कुणी टिकूच शकत नाही. पात्रतेऐवजी जातीला सर्वाधिक महत्त्व जगाच्या पाठीवर भारतातच आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. या जातीपातीमुळे भारताची परमावधीची अधोगती झाली आहे आणि होत आहे. भारत पारतंत्र्यात जाण्यालाही जातपातच एक प्रमुख कारण होते, हेही नाकारता येणार नाही. हिंदूंचे सर्वाधिक धर्मांतरही जातीपातीमुळेच झालेले आहे. मोगलांनी हिंदु समाजातील कनिष्ठ समजल्या जाणार्‍या जातींना लक्ष्य करून त्यांना धर्मांतरित केले आणि आताही करत आहेत. तेच कार्य पुढे ख्रिस्ती मिशनरी करत आहेत. ईशान्य भारत याचमुळे आज ९० टक्क्यांहून अधिक ख्रिस्तीबहुल झाला आहे. पंजाबही त्याच वाटेवर आहे. हिंदु धर्मात जातपात नव्हती. केवळ ईश्वरनिर्मित वर्णव्यवस्था होती. त्यात कुणीही उच्च किंवा नीच असे नव्हते आणि अस्पृश्यताही नव्हती. व्यासमुनी आजच्या काळानुसार सांगितले, तर कनिष्ठ जातीत जन्माला आले होते; मात्र त्यांची ग्रंथनिर्मिती पाहिल्यास त्यांच्याप्रमाणे श्रेष्ठ कुणी पूर्वी नव्हते आणि नंतरही होऊ शकले नाही. यातून लक्षात येते की, जात ही संकल्पनाच चुकीची आहे. वर्णव्यवस्थेतून पुढे स्वार्थी लोकांमुळे, तसेच भारतावर परकीय आक्रमणांमुळे जातपात चालू झाली आणि त्याला पुढे खतपाणी घातले गेले. ब्रिटिशांनी जातींचा भारतीय समाजाला विभाजित करण्यासाठी पुरेपुर वापर केला आणि त्याची फळे ब्रिटीश भारतातून गेल्यानंतरही भोगावी लागत आहेत. जातपात नष्ट करण्यासाठी संतांनी अनेक प्रयत्न केले. याची अनेक उदाहरणे या देशात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीला महत्त्व दिले नाही. त्यांचे राज्य मराठ्यांचे नव्हते, तर हिंदवी म्हणजे हिंदूंचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी येथे स्थानबद्ध असतांना जातपात निर्मूलनाचे प्रचंड मोठे कार्य केले. ‘हिंदु समाजाच्या एकतेला सर्वांत मोठा धोका बाहेरून नव्हे, तर आतल्या जातीभेदातून आहे’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. आज त्यांना ‘माफीवीर’ म्हणणारे, त्यांच्या हिंदुत्वावर टीका करणारे याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात आणि जातीपातीचे राजकारण करत रहातात. देशातील हिंदु संघटना आणि पक्षही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुष्कळ मोठे कार्य करतांना दिसत नाहीत. तसे असते, तर त्यांचे परिणाम दिसून आले असते. आजही देशातील अनेक गावांमध्ये जातीनुसार वस्त्या दिसून येतात. सरकारी स्तरावर जात निर्मूलनाच्या अनेक योजना आणण्यात आल्या असल्या, तरी त्यामागे राजकीय स्वार्थ असून खर्‍या अर्थाने जातींचे निर्मूलन करण्याचा कोणताही हेतू आहे, असे नाही. जातीमुळे भारताची कशी हानी होत आहे, हेही सांगण्याचा आणि लोकांना योग्य काय करायला हवे, हे सांगण्याचा प्रयत्न होतांना दिसत नाही. उलट जातपातीनुसार वागण्याचा प्रयत्न केला जातो.

जातीपातीला खतपाणी घालणारे राजकारणी !

बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्याचा प्रचार चालू झाला आहे आणि उमेदवारीही घोषित होत आहे. त्यात पाहिले, तर जात हाच मुख्य केंद्रबिंदू आहे. देशातील ग्रामपंचायत ते लोकसभा प्रत्येक निवडणूक जातीवरच आधारित असते. मुंबईसारख्या शहरात भाषा, राज्याची अस्मिता आदी विषयही असतात. असे असेल, तर कोणता राजकीय पक्ष सत्तेत आल्यावर जातपात नष्ट करण्यासाठी पुढाकार घेणार ? देशात स्वातंत्र्यापासून आरक्षणही जातीच्या आधारेच दिले जाते. त्यालाही प्रथम १० वर्षांचीच मर्यादा होती, ती राजकारणामुळे आजही चालू ठेवण्यात आली आहे. आता तर जात जनगणना केली जात आहे. म्हणजे जेथे जात नष्ट करायला हवी, तेथे प्रत्येक जात मोजली जाणार आहे. ही प्रगती म्हणायची का ? जर जातपात नष्ट करायची नाही, तर पर्याय तरी कोण सांगणार ? जर कुणी वर्णाश्रमव्यवस्थेविषयी बोलायला गेला, तर त्याला मनुवादी म्हणून हिणवले जाते. वर्णाश्रमव्यवस्था काय आहे, हेही समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. ज्यांना ती ठाऊक आहे, तेही सोयीस्कर राजकीय स्वार्थापोटी त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजेच आज प्रत्येकाला जात हवी आहे. त्यामुळेच ती जाता जात नाही. ‘मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने जे सांगितले आहे, तेच पुढे खरे झाल्यास आश्चर्य वाटू नये’, असे म्हणावे लागेल. जिहादी आतंकवादी, धर्मांध मुसलमान जेव्हा हिंदूंवर आक्रमण करतात, तेव्हा ते जात पहात नाहीत, तर ‘हिंदु’ म्हणून पहातात आणि आक्रमण करतात; मात्र काही जात्यंध ‘दलित-मुसलमान भाई भाई’च्या घोषणा देऊन आत्मघात करून घेत आहेत. लव्ह जिहादच्या घटनांमध्ये अनेक दलित तरुणींची फसवणूक करण्यात आली आहे. ती दलित म्हणून नव्हे, तर हिंदु म्हणूनच करण्यात आली. जातीपातीचा हाही भाग समजून घेणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या बोलण्याचा अर्थ हाही असू शकतो, हे नाकारता येणार नाही.

‘जातपात नष्ट करण्यासाठी आता पुढाकार कोण घेणार ?’ हा प्रश्न आहे. कारण हे एक मोठे शिवधनुष्य आहे. त्यामुळेच कुणी ते पेलण्यासाठी पुढे येत नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे संघटना आणि पक्ष यांच्या मर्यादा लक्षात घेता हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी स्वतः शंकराचार्य, धर्माचार्य, संत यांनी आता पुढाकार घेऊन समाजात गेले पाहिजे. अनेक धर्माचार्य आणि संत यासाठी प्रयत्नरत आहेतच, तसेच काही धार्मिक संघटनाही यासाठी कार्य करत आहेत; मात्र ते पुरेसे नाहीत. आता त्यांनी संघटित होऊन जनजागृती केली पाहिजे; मात्र त्याच वेळी सरकारी स्तरावरूनही जातीला दूर करता येईल, ते केले पाहिजे. ‘आरक्षण संपवणे आवश्यक आहे’, असे कुणी म्हटले, तर देशात हिंसाचार होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते, अशा वेळी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्याच वेळी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्माचरण करण्यासह साधनेला लावले पाहिजे. यातून बुद्धी शुद्ध होऊन ‘धर्म काय आहे ?’, हे लक्षात येऊन वर्णाश्रमव्यवस्थेचे महत्त्व आणि जातपात धर्म अन् राष्ट्र यांची कशी हानी करत आहे, हेही लक्षात येईल. त्यातूनच पुढे हिंदु समाज जागृत होईल आणि मग तो ‘मी जातीनुसार नाही, तर धर्मनिष्ठ हिंदु म्हणून जगणार. मी पक्षासाठी नाही, तर राष्ट्रासाठी उभा रहाणार. मी विभाजनासाठी नाही, तर समरसतेसाठी झटणार’, असा निश्चय करू शकतो.

जातपात नष्ट करण्याचा निश्चय जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत जात जाणार नाही !