संपादकीय : कथित स्त्रीवादाची रूपे ! 

मुस्कान, सोनम आणि सिया गोयल

लोहगडावरील केतन अगरवाल हत्याकांडाचे प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्याची हत्या करणारी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. कुणी त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर कुणी सियाला लोहगडाच्या कठड्यावरून खाली ढकलून देण्याची शिक्षा देण्यास सुचवले आहे. पोलीस चौकशीतून आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर येतील. आणखी काही आठवडे त्यावर चर्वितचर्वण होईल आणि एक ना एक दिवस दोन्ही आरोपी जामिनावर सुटून उजळ माथ्याने समाजात वावरतील. तोपर्यंत जनता ते प्रकरण विसरलीही असेल. अशी अनेक हत्याकांडे होत रहातात. वर्ष २०२५ मध्ये गाजलेले राजा रघुवंशीचे प्रकरणही गंभीर होते. राजा आणि सोनम यांचा विवाह झाला; पण सोनमचे दुसर्‍या तरुणासमवेत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने प्रियकर आणि मित्र यांच्या साहाय्याने राजाची हत्या केली. नौदल अधिकारी असणार्‍या सौरभ राजपूत याचीही हत्या मुस्कानने केली. का ? तर म्हणे तिला तिच्या प्रियकरासमवेत लग्न करायचे होते. मुस्कानने हत्येनंतर सौरभच्या शरिराचे १५ तुकडे केले. बोटांचे ठसे नष्ट करण्यासाठी त्याचे मनगट तोडले आणि ओळख पटण्यास अडथळा निर्माण करण्यासाठी त्याचे शिर धडावेगळे केले. पालकांचा आपल्या प्रेमसंबंधांना विरोध होता; म्हणून श्वेताने प्रियकराच्या साहाय्याने स्वतःचे वडील, आई आणि बहीण यांची निर्घृण हत्या केली. तिने त्या सर्वांवर अनेक वेळा वार केले. असे क्रूर कृत्य करण्याची बुद्धी होते कशी ? सोनम, मुस्कान, सिया ही उदाहरणे आज समाजाच्या समोर आली आहेत; पण आणखी अशी किती प्रकरणे असतील ? पटत नाही किंवा स्वतःच्या इच्छेविरुद्ध होत आहे; म्हणून एखाद्याचा जीव घेण्याची तरुणींमधील ही वाढती मनोवृत्ती भीतीदायक आहे. समाजधुरिणांनी यावर विचार करणे आवश्यक !

मानवतावादी संघटना गप्प का ? 

स्त्रियांवर कुठे अत्याचार झाला की, लगेचच विविध महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, तथाकथित मानवतावादी संघटना, स्त्रीमुक्ती संघटना लगेच सक्रीय होतात; पण मग पुरुषांवर महिलांकडून अन्याय झाला, तर याच संघटना आणि कार्यकर्ते कोणत्या बिळात जाऊन लपतात ? अशा वेळी मानवाधिकारवादी गट किती सक्रीय असतात ? क्रूर हत्या करणार्‍या सोनम, मुस्कान, श्वेता, सिया यांच्या विरोधात या संघटनांनी मत प्रदर्शित केल्याचे कुठे पहाण्यात किंवा वाचणात आले नाही. महिलांची राक्षसी वृत्ती या संघटनांना दिसली नाही का कि दिसूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले ? येथे स्त्री किंवा पुरुष या दृष्टीने न बघता न्याय, समानता, माणुसकी या पार्श्वभूमीवर विचार करायला हवा. पीडित पुरुष किंवा त्याचे कुटुंबीय यांनाही न्याय मिळाला पाहिजे. या संघटना गुन्हेगार महिलांच्या विरोधात आंदोलने का करत नाहीत ? का निवेदने देत नाहीत ? न्यायाचा मापदंड सर्वांसाठी समान का नाही ? स्त्रीवादी चळवळींचे स्वरूप एकांगी होत चालल्याने त्यांच्याविषयीची विश्वासार्हता न्यून होत आहे का ? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. जर एखाद्या पुरुषाने केवळ आई-वडिलांच्या दबावामुळे भावी पत्नीची हत्या केली असती, तर त्याला उत्तरदायी धरून कठोर शिक्षेची मागणीही करण्यात आली असती. मग स्त्रियांचेच समर्थन का ? काही स्त्रीवाद्यांनी मध्यंतरी एका स्त्रीद्वेषी विनोदावरून एका तरुणाचा जीव घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, तसेच देशातील प्रत्येक पुरुषाला हिणवण्यासाठी आठवडाभर सहस्रो ‘रिल्स’ही बनवली; पण याच स्त्रीवादी आज खुनाचा आरोप असलेल्या २० वर्षांच्या सियाला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. हा दुतोंडीपणा नव्हे का ? काही स्त्रीवादी महिला सामाजिक माध्यमांवर निरर्थक पद्धतीने व्यक्त होत आहेत. निर्दयी पद्धतीच्या हत्यांचे समर्थन करत आहेत. पीडित तरुणाच्या कुटुंबियांविषयी त्यांच्या मनात ना आदर आहे, ना सहानुभूती ! या संघटनाचा पाया खरोखर न्याय आहे कि केवळ स्त्रीमुक्तीच्या नावाखाली पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणे आहे, याचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. स्त्रीवाद म्हणजे काय, हेच ठाऊक नसणार्‍या अशा संघटनांची निष्क्रीयता पहाता भविष्यात पुरुषवादी किंवा पुरुषमुक्ती संघटना आणि चळवळी उभ्या राहिल्यास आश्चर्य वाटू नये. या सर्वच सूत्रांच्या जोडीला ‘मानवाधिकार’ या संकल्पनेची पुनर्व्याख्या करणे अपरिहार्य आहे.

कायद्याचा धाक हवा ! 

‘आधुनिक भारतात महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत आहेत’, असे काही काळापूर्वी म्हटले जायचे; पण आता तर पुरुषांच्या एक नव्हे, तर २ – ४ पावले पुढे, अशी त्यांची वाटचाल चालू आहे. गुन्हेगारी जगतात महिलांचे प्रमाण लक्षणीय होत चालले आहे. याला नेमके कोण कारणीभूत आहे ? गुन्हेगार महिलांमध्ये धाडस वाढले आहे कि हिंसकता ? सिया गोयल प्रकरणानंतर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या जनमत चाचणीत नागरिकांनी ‘कायद्याचा धाक नसणे’ या पर्यायाला अधिक प्रमाणात मते दिली होती. पैसा, सामाजिक माध्यमे, स्वैराचार असे अन्य पर्यायही त्यात दिले होते. ‘कायद्याचा धाक नसणे’ या सूत्राकडे सरकार, प्रशासन आणि पोलीस यांनी गांभीर्याने पहायला हवे. हा धाक निर्माण करण्यासाठी, तसेच संवेदनशील समाजमन घडवण्यासाठी काय करायला हवे ? यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. न्यायालयीन प्रक्रियेला होणार्‍या विलंबातूनही अशा प्रवृत्ती बळावत नसतील कशावरून ? त्यामुळे न्याययंत्रणाही अधिक सक्षम आणि तत्पर व्हायला हवी. ‘गुन्हेगारांना निर्भय होऊ देण्याची संधी न्यायालयाने उपलब्ध करू नये’, असे जनतेला वाटते. शिक्षा ही निश्चित आणि जलद गतीने व्हायला हवी. गुन्हेगारी पुरुषाप्रमाणे गुन्हेगारी स्त्रीला शिक्षा व्हायलाच हवी. जर पीडित स्त्रियांना न्याय मिळतो, तर पीडित पुरुषांनाही तो मिळायला हवा. संवेदनशीलता ही दोन्ही बाजूंसाठी असली पाहिजे. तसे झाल्यासच ती खरी समानता ठरेल.

‘एकम न्याय फाऊंडेशन’ या संस्थेने जून २०२६ मध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी पतीची हत्या केल्याच्या देशभरातील ४२ घटना नोंदवल्या आहेत. ही आकडेवारी कदाचित् अधिकही असू शकते. त्यामुळे या घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रसारमाध्यमांनीही अशा घटनांना प्रसिद्धी देतांना राष्ट्रीय विषय झाल्याप्रमाणे त्या जनतेसमोर वारंवार आणू नयेत. त्यावर नियंत्रण आणायला हवे. स्वकेंद्रित मानसिकतेतूनही कोणत्याही थराला जाण्याचे सध्याचे वाढते प्रकार पहाता देशाला नैतिक अधिष्ठानाची आवश्यकता आहे. हे नैतिक बळ धर्माचरण आणि ईश्वराची आराधना यांतूनच प्राप्त होऊ शकते. यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केल्यास सुसंस्कृत आणि न्यायनिष्ठ समाजाचा भक्कम पाया निर्माण होईल.

स्त्रीद्वेषी विनोद करणार्‍याचा जीव घेऊ पहाणारा आणि हत्या करणार्‍या तरुणीला वाचवणारा असा दुतोंडी स्त्रीवाद समाजासाठी कितपत योग्य ?