भारताच्या संरक्षण व्यवस्थेच्या संदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिलेले एक स्वप्न आता पूर्ण होतांना दिसत आहे ! – डॉ. नीलेश लोणकर

केडगाव (पुणे) येथील ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा !

‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करतांना (डावीकडून) श्री. सुधीर अवचट, श्री. समीर कुळकर्णी, डॉ. नीलेश लोणकर, श्री. महेश पाठक, श्री. मुकुंद भिसे

केडगाव (जिल्हा पुणे), २० ऑक्टोबर (वार्ता.) – भारत सर्व प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत सक्षम आहे आणि भारताची संरक्षणव्यवस्था अतिशय उत्तम आहे, अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिलेलेच एक स्वप्न आता पूर्ण होतांना दिसते. समीर कुळकर्णी यांच्या माध्यमातून दिवाळी अंकाचे प्रकाशन होणे, हे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीकारक, तसेच सर्व न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले हिंदुत्वनिष्ठ यांचा सन्मानच केल्यासारखे आहे, असे मत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी व्यक्त केले. २२ वर्षे पूर्ण झालेल्या ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. स्वा. सावरकर युवा विचार मंचाच्या वतीने श्री बोरमलनाथ मंदिर सभागृह, चौफुला-बोरीपार्थी येथे नुकतेच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील निर्दोष मुक्तता झालेले धर्मवीर श्री. समीर कुळकर्णी, श्री. सुधीर अवचट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक, श्री. मुकुंद भिसे आदी मान्यवरांसह बहुसंख्येने हिंदू उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘समर्थ मंडळ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रा’चे संचालक श्री. संदीप टेंगले यांनी केले आणि आभार श्री. शुभम लव्हे यांनी मानले.

गेले १८ वर्षे चाललेल्या न्यायालयीन संघर्षामध्ये देव माझ्या पाठीशी उभा होता ! – समीर कुळकर्णी, धर्मवीर

देव, देश, धर्मावर जे शत्रू देशाबाहेरून भारतावर आक्रमण करत होते, त्या सगळ्यांचा बंदोबस्त ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या देशाचे जे शत्रू आहेत, त्यांना लक्ष केले गेले. ‘ऑपरेशन सिंदूर’चे मुखपृष्ठ असलेल्या दिवाळी अंक ‘स्वयंभू’मध्ये या माध्यमातून हेच दाखवले गेली आहे. गेले १८ वर्षे चाललेल्या न्यायालयीन संघर्षामध्ये देव माझ्या पाठीशी उभा होता, हे आम्हाला क्षणोक्षणी जाणवले, असे विधान मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील निर्दोष मुक्तता झालेले धर्मवीर श्री. समीर कुळकर्णी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांनी सांगितले की, आम्ही क्रांतीकारक पाहिले नाहीत; पण हिंदुत्वासाठी लढणारे हिंदुत्वनिष्ठ आम्ही पाहिले. हिंदु राष्ट्राच्या इतिहासात या सर्वांना मानाचे स्थान असेल. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावर अनेक प्रकारची जिहादी आक्रमणे होत आहेत, ही आक्रमणे परतवून लावण्यासाठी आता हिंदूंनी सिद्ध व्हायला हवे.