पथ्ये पाळा आणि मनसोक्त फराळ करा !

दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट आणि चविष्ट फराळाचे भरलेले ताट ! दिवाळीचा उत्सव प्रत्येकासाठी आनंदाचा सण असतो; पण याचसमवेत त्या काळात आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. दिवाळीतील फराळाचे प्रमाण आणि विविधता यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ?, हे समजून घेणे आवश्यक आहे.

दिवाळीच्या फराळातील पदार्थ

फराळाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पथ्य पाळा !

दिवाळीच्या फराळामध्ये चिवडा, चकली, लाडू, करंज्या आणि बरेच पदार्थ असतात. हे पदार्थ स्वादिष्ट असतात; पण त्यात साखर, तूप आणि मैदा यांचे प्रमाण अधिक असल्याने फराळाचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढणे, रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये वाढ होणे आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवणे यांचा धोका अधिक असतो. त्यामुळे दिवाळीच्या फराळाचा आनंद घ्यायचा असेल, तर काही पथ्ये पाळणे आणि स्वतःला काही नियम घालून घेणे आवश्यकच आहे.

असा खा दिवाळीचा फराळ !

१. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या फराळात तूप आणि साखर यांचे प्रमाण अल्प असलेले पदार्थ निवडा. त्यामुळे बाजारातील वेगवेगळ्या मिठाई अधिक प्रमाणात खाण्यापेक्षा कडधान्यांचा वापर करून बनवलेले फराळाचे पदार्थ खा.

२. बाहेरच्या खाद्यपदार्थांपेक्षा घरी बनवलेल्या पदार्थांची निवड करा. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रकृतीला मानवेल, अशा पदार्थांपासून बनवलेले पदार्थ खाता येतील, तसेच ज्या पदार्थांचे अपथ्य आहे, ते टाळता येतील.

३. फराळाचे पदार्थ एका वेळी भरपूर प्रमाणात खाण्याऐवजी थोडे थोडे खा.

नियमित व्यायाम आणि आहार यांकडे लक्ष द्या !

१. दिवाळीत फळे आणि भाज्या खाण्यावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेल्या पोषणतत्त्वांचे प्रमाण वाढवता येईल.

२. या दिवसांत आहारात बरेच पालट होत असल्यामुळे भरपूर पाणी प्या.

३. दिवाळीच्या उत्सवात व्यायाम करण्याचा तुमचा नित्यक्रम कायम ठेवा. नियमित ३० मिनिटे चालणे किंवा तुम्ही नेहमी करत असलेले व्यायामप्रकार करणे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतील.

४. या काळात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. यामुळे शरिराला आवश्यक ऊर्जा मिळेल.

योग्य प्रमाणात फराळ आणि आहार घेऊन तुम्ही दिवाळीचा आनंद लुटून आरोग्याचीही काळजी घेऊ शकता.

लेखिका : आकांक्षा डिंगरे, आहारतज्ञ, ‘झायवी व्हेंचर्स’

(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’)