Pakistan Airstrikes On Afghanistan : युद्धविरामाचे उल्लंघन करत पाककडून अफगाणिस्तानवर हवाई आक्रमण

  • आक्रमणात अफगाणिस्तानचे ३ क्रिकेटपटू ठार

  • सीमावर्ती भागातील अनेक घरांना लक्ष्य केले

काबुल / इस्लामाबाद : स्वतःच युद्धविरामाची मागणी करणार्‍या पाकने १७ ऑक्टोबरला त्याचे उल्लंघन करत अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई आक्रमण केले. यात ३ अफगाण क्लब क्रिकेट खेळाडूंसह ८ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने (‘एसीबी’ने) दिली. या आक्रमणात ७ नागरिक घायाळ झाले. तालिबानने दावा केला की, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हे हवाई आक्रमण केले, जे दोन्ही देशांच्या सीमेजवळ असलेल्या ‘ड्युरंड’ रेषेजवळ आहे.

१. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणार्‍या ‘तिरंगी टी-२०’ क्रिकेट मालिकेतून माघार घेण्याची घोषणा अफगाणिस्तानने केली. ‘एसीबी’ने म्हटले आहे की, मृतांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांचे संघ सहभागी होणार होते.

२. अफगाणिस्तानातील वृत्तवाहिनी ‘टोलो न्यूज’च्या मते या आक्रमणात अर्गुन आणि बारमल जिल्ह्यांमधील अनेक घरांना लक्ष्य करण्यात आले. तथापि अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

३. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानवर नागरी क्षेत्रांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे, तर पाकिस्तानने म्हटले की, त्यांनी आतंकवाद्यांच्या स्थळांवर आक्रमण केले.

४. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात अफगाणिस्तानातील ६ प्रांतांमध्ये पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात ३७ नागरिकांचा मृत्यू, तर ४२५ जण जखमी झाले.

अफगाणिस्तानात ‘टीटीपी’चे २ गट पाकविरुद्ध एकत्र

अफगाणिस्तानातील ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)’च्या २ गटांनी पाकिस्तानविरुद्ध एकत्र येण्याची घोषणा केली. एका गटाचे नेतृत्व कुर्रम जिल्ह्यातील मुफ्ती अब्दुर रहमान आणि दुसर्‍या गटाचे नेतृत्व खैबर जिल्ह्यातील ‘तिरह व्हॅली’चे कमांडर शेर खान करत आहेत. या दोन्ही कमांडर्सनी ‘टीटीपी’शी निष्ठा दर्शवली आहे.

(म्हणे) ‘तालिबान भारतासाठी छुपे युद्ध लढत आहे !’ – पाकिस्तानचे संरक्षण मंत्री

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी १७ ऑक्टोबरला आरोप केला की, तालिबानच्या संदर्भातील निर्णय देहलीत घेतले जात आहेत आणि अफगाणिस्तान भारतासाठी ‘छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर)’ लढत आहे.