‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त झालेल्या ‘महाधन्वन्तरि यागा’च्या वेळी साधिकेला भगवान धन्वन्तरीचे सूक्ष्मातून अस्तित्व दर्शवणार्‍या आलेल्या अनुभूती !

आज धन्वन्तरि जयंती आहे. त्या निमित्ताने…

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त १९.५.२०२५ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सर्व साधकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे आणि सनातन राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी’, यांसाठी ‘महाधन्वन्तरि याग’ करण्यात आला. या यागाच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त १९.५.२०२५ या दिवशी संपन्न झालेला ‘महाधन्वन्तरि याग’ !

१. ‘महाधन्वन्तरि याग’ क्षीरसागरात होत असल्याचे जाणवणे

महाधन्वन्तरि यागाचा आरंभ झाल्यावर वातावरणात ‘निर्गुण तत्त्व’ अधिक प्रमाणात असल्याचे मला जाणवत होते. मला क्षीरसागरातील लाटा आणि पाणी यांचा आवाज ऐकू येत होता. ‘कार्यक्रमस्थळी असलेला ‘श्रीनिवास मंडपम्’, हा पृथ्वीवर नसून क्षीरसागरात आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे मला आध्यात्मिक स्तरावरील थंडावा जाणवत होता. मला थंड वार्‍याचा स्पर्श होत होता आणि तो वाराही दैवी जाणवला. संपूर्ण वातावरणात एक वेगळाच दैवी सुगंध होता. तो ‘क्षीरसागरातील दैवी गंध आहे’, असे मला जाणवले.

भगवान धन्वन्तरी

२. ध्यानात धन्वन्तरीच्या करकमलातील प्रकाशमान ‘अमृत कलशा’चे दर्शन होणे 

त्यानंतर मला भगवान धन्वन्तरीच्या करकमलांमध्ये असणार्‍या ‘अमृत कलशा’चे दर्शन झाले. तो पुष्कळ प्रकाशमान होता. ‘हे दृश्य मला ध्यानात दिसत होते’, असे जाणवले. सभामंडपातील निर्गुण स्तर वाढल्याने आणि यागाच्या चैतन्यामुळे माझे ध्यान सहज लागत होते.

कु. अपाला औंधकर

३. हवनकुंडातून प्रक्षेपित पांढर्‍या वलयांच्या माध्यमातून सर्व साधक आणि संत यांच्या भोवती धन्वन्तरीचे संरक्षककवच निर्माण होणे  

त्यानंतर मला सभामंडपात आकाशी रंगाचा प्रकाश दिसला. हवनकुंडातून पांढर्‍या रंगाची अनेक वलये बाहेर पडत होती. त्यामुळे सर्व साधक, संत आणि सद्गुरु यांच्या भोवती श्री धन्वन्तरीचे अभेद्य संरक्षककवच निर्माण होत होते. तेव्हा माझ्या मनाला पुष्कळ शांतता जाणवत होती.

४. ध्यानात भगवंताने भगवान धन्वन्तरीचे वर्णन करणे 

त्यानंतर माझे ध्यान लागले आणि ध्यानावस्थेत भगवंताने अकस्मात् मला रोग अन् विकार यांविषयी काही विचार सुचवले, तसेच त्याने भगवान धन्वन्तरीचे वर्णन सांगितले. भगवंताने सांगितले, ‘सत्ययुगात आरंभी रोग, विकार इत्यादी काहीच नव्हते; परंतु सुर-असुरांच्या संग्रामामुळे हे सर्व निर्माण झाले आहेत. भगवान श्रीविष्णूने श्री धन्वन्तरीच्या रूपात अवतार धारण केला. तो समुद्रमंथनातून प्रगट झाला. त्याच्या हातात ‘जळू’ (टीप) हे त्याचे शस्त्र असून ते व्याधी दूर करते. त्याच्या हातात सुंदर अमृतकलश आहे. भगवान धन्वन्तरीला प्रसन्न केल्याने आपण ‘अमर’ होऊ शकतो. श्रीविष्णूच्या हातांतील सुदर्शनचक्र आणि शंख हे धन्वन्तरीच्या हातांत शोभून दिसतात.’ देवाने हे विचार दिल्यावर ‘हे माझ्या बुद्धीपलीकडील आहे’, असे मला वाटले. तेव्हा मला दीर्घ काळ सुगंध येत होता.

टीप – जळू : हा एक प्राणी असून त्याचा वापर विशिष्ट आजारांवरील उपचारांसाठी केला जातो.

५. सभामंडपात भगवान शिव आणि विष्णु यांचे दर्शन होणे 

यानंतर मला सभामंडपामध्ये भगवान शिव आणि भगवान विष्णु यांचे दर्शन झाले. तेव्हा माझा शरणागतभाव दाटून आला. त्या वेळी माझे मन निर्विचार होऊन मी अत्यंत स्थिरता अनुभवत होते.

६. पंचतत्त्वे आणि श्री धन्वन्तरिदेवतेच्या करकमलांमध्ये असणारी आयुधे / यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती यांचा एकमेकांशी असणारा संबंध 

७. श्री धन्वन्तरीच्या ‘कमलासनारूढ’  तारक रूपाचे दर्शन होणे

त्यानंतर मला ‘कमलासनारूढ भगवान श्री धन्वन्तरीचे रूप दिसले. ‘ते धन्वन्तरीचे तारक रूप आहे’, असे मला जाणवले. समस्त व्याधींचे निवारण केल्यावर श्री धन्वन्तरि भक्तांना अभय देतो. तेव्हा ‘तो कमलासनावर विराजमान होऊन आशीर्वाद देत आहे’, असे दृश्य मला दिसले.

८. धन्वन्तरिलोकात असल्याचे जाणवणे 

वातावरणात पुष्कळ पालट झाला होता. मी ‘श्री धन्वन्तरिलोकात आहे’, असे मला जाणवत असल्याने मला पृथ्वीवरील वेळेचे भान राहिले नाही.

९. हवनाच्या ठिकाणी २ अश्विनीकुमारांचे दर्शन होणे 

मुख्य हवनाच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना मला २ अश्विनीकुमारांचे दर्शन झाले. ‘हे दोघे अश्विनीकुमार, म्हणजे श्री धन्वन्तरि देवतेची प्रगट आणि अप्रगट शक्ती आहे’, असे मला जाणवले.

१०. त्यानंतर काही वेळ मला वातावरणात शिवतत्त्व आणि दत्ततत्त्व जाणवले. 

११. त्यानंतर तेथील पुरोहितांनी ‘अष्टलक्ष्मी स्तोत्रा’चे पठण केले. तेव्हा ‘एक एक कमलपुष्प उमलत आहे आणि त्यावर लक्ष्मीदेवी दर्शन देत आहे’, असे दृश्य मला दिसले. 

१२. यज्ञकुंडातून प्रत्यक्ष भगवान धन्वन्तरि प्रगट झाल्याचे जाणवणे 

यज्ञकुंडाकडे पाहिल्यावर मला त्यात सगुण आणि निर्गुण तत्त्व जाणवत होते. यज्ञकुंडाभोवती सूक्ष्मातील सहस्रो दैवी कण होते, तसेच यज्ञकुंडातून चैतन्याचा प्रचंड स्रोत बाहेर पडत होता. यज्ञकुंड कमळाच्या आकाराचे होते आणि भगवान धन्वंन्तरि मला एका दृश्यात कमलासनारूढ दिसले होते. त्यामुळे त्या ‘यज्ञकुंडातून प्रत्यक्ष भगवान श्री धन्वन्तरि प्रगट झाला आहे’, असे मला जाणवले.

१३. गुरुदेवांच्या भेटीच्या वेळी मंत्री, उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ इत्यादी सर्व जण त्यांच्या पुढे नतमस्तक होत असणे आणि ते पाहून भावजागृती होणे 

श्री धन्वन्तरि यागाच्या समाप्तीनंतर अनेक मान्यवर, संत आणि साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट घेत होते. मंत्री, उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ इत्यादी सर्व जण गुरुदेवांपुढे नतमस्तक होत होते. तेव्हा ‘आपण कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठे पद प्राप्त केले, तरीही साक्षात् देवापुढे आपण अज्ञानी बालकच असतो’, असे मला जाणवत होते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवही त्यांच्याशी प्रेमाने संभाषण करत होते. श्री गुरूंचे दर्शन घेतल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यांतील भाव पहाण्यासारखे होते. कोणाचा व्यक्त भाव, तर कोणाचा अव्यक्त भाव होता. प्रत्येकाच्या डोळ्यांतील आनंद गगनात मावत नव्हता. ते सर्व पहातांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती.

‘हे श्री धन्वन्तरि, हे श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेवा, ‘आपल्याच अनंत कृपेमुळे मला स्थुलातून हा दैवी याग अनुभवता आला आणि सूक्ष्मातून साक्षात् भगवंताचे दिव्य दर्शनही घडले’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १८ वर्षे), फोंडा, गोवा. (३०.५.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक