नाव चोरलेला चित्रपट !

१. प्रेक्षकांच्या भावविश्वाशी खेळणारा चित्रपट !

आजच्या मराठी चित्रपटसृष्टीत वेगळीच प्रवृत्ती वाढतांना दिसते, ती म्हणजे नाव, विचार, तत्त्वज्ञान किंवा संतपरंपरा यांतील शब्द वापरून लक्ष वेधून घेण्याची !

थोडक्यात प्रेक्षकांच्या भावविश्वाशी खेळण्याची ! आता याच प्रवृत्तीचा परमोच्च बिंदू गाठणारा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याचे नाव ‘मनाचे श्लोक’ ठेवले गेले आहे. हेच मनाचे श्लोक समर्थ रामदासस्वामींचे अमूल्य चिंतन, त्या दिव्य स्फूर्तीरचना, त्या २०५ अमर ओव्या, ज्यांनी असंख्यांच्या जीवनाला दिशा दिली, आत्मबळ दिले आणि संयमाचे, श्रद्धेचे, कर्माचे सार शिकवले, ते नाव आज एका अशा चित्रपटासाठी वापरले गेले आहे, जो त्या मूळ विचारांच्या पूर्ण विरुद्ध उभा आहे !

२. मनाचे श्लोक म्हणजे काय ?

मन म्हणजे मानवी अस्तित्वाचे मूळ. शरीर, बुद्धी, कर्म या सगळ्यांवर राज्य करणारा केंद्रबिंदू म्हणजे मन. समर्थ रामदासस्वामींनी या मनाचे शुद्धीकरण, नियंत्रण आणि उन्नती हेच आयुष्याचे खर्‍या अर्थाने साध्य ठरवले. त्यांनी अवघ्या २०५ श्लोकांमध्ये आयुष्य जगण्याचे संपूर्ण तत्त्वज्ञान मांडले.

३. ‘सद्गुणविकृती’तून समाजहानी !

समर्थांनी १२ वर्षांची कठोर तपश्चर्या केली, १४ वर्षे अखंड भारतभ्रमण केले आणि उर्वरित आयुष्य लोककल्याणासाठी वाहिले. त्यांच्या चिंतनातून ‘मनाचे श्लोक’ जन्माला आले. ते कोणत्याही काळात, तसेच परिस्थितीत माणसाला योग्य मार्ग दाखवू शकतात. आचार्य विनोबा भावे यांनी संतसाहित्य वाचल्यावर अनेक संतांच्या रचनांमधून त्यांना भावलेले श्लोक निवडले; पण मनाच्या श्लोकातील एकही श्लोक वगळला नाही; कारण प्रत्येक ओवी पूर्ण आहे, प्रत्येक वाक्य हे जीवनाचे सार आहे. अशा पवित्र, दिव्य, चिंतनशील नावाचा वापर चित्रपटासाठी झाला आहे, हे सूत्र अनेकांच्या अंतःकरणाला चटका लावते. ‘नावात काय ?’, असे वाटणार्‍यांची उदासीनता, हीच ‘सद्गुणविकृती’ (सद्गुणविकृती म्हणजे एखाद्या चांगल्या गुणाचा अतिरेक होऊन तो स्वतःसाठी आणि समाजासाठी घातक ठरणे) समाजाची हानी करत आहे. आज मराठी समाज सहनशीलतेच्या विकृतीच्या पातळीवर पोचला आहे. येथे केवळ नाव चोरलेले नाही, तर अर्थ पायदळी तुडवला गेला आहे.

४. मूळ विचारांच्या विरुद्ध चित्रपट !

चित्रपटाच्या कथानकता एका ठिकाणी मुलगा बापासमवेत बसून मद्यपान करतांना दाखवला, तर मुलगी द्वैअर्थी बोलते, तर कुणीतरी दुसर्‍याच्या बायकोच्या प्रेमात पडतो. या सगळ्या बौद्धिक शेणगोळ्याला ‘मनाचे श्लोक’ नाव दिले. असे नाव ठेवणे म्हणजे ‘रामायण’ नावाचा चित्रपट काढून त्यात रावणाचा उदो उदो करणे होय. संस्कृतीवरील डल्ला आहे. आज आपण शांत बसलो, तर उद्या ‘ज्ञानेश्वरी’ नावाची एखादी अर्धनग्न वेब सीरिज येईल; ‘दासबोध’ नावाच्या नाईट क्लबमध्ये चित्रीकरण होईल आणि ‘तुकाराम’ नावाचा कुख्यात गुन्हेगार दाखवला जाईल.

५. चित्रपटाशी संबंधित असलेल्यांना आर्थिक फटका बसल्यासच ती खरी शिक्षा ठरेल !

चित्रपट काढणार्‍यांमध्ये संवेदनशीलता असती, तर त्यांनी हे नाव ठेवण्याआधीच दोनदा विचार केला असता. आता उपाय काढणे म्हणजे चित्रपट पहायला सहस्रो लोक गेलेच नाहीत, तर संबंधितांना आर्थिक फटका बसेल. तीच त्यांच्यासाठी खरी शिक्षा आहे; पण तिथेच थांबायचे नाही. त्या तिकिटाच्या पैशांइतकी मनाच्या श्लोकांची पुस्तके खरेदी करा आणि मुलांना वाटा. त्या पैशांत सज्जनगड, शिवथरघळ, चाफळ, ११ मारुति अशा समर्थस्थानांना भेट द्या. तिथे सेवा करा, दर्शन घ्या, पुण्य मिळवा. ज्याने संस्कृतीचा अपमान केला, त्याच्या व्यवसायाला हातभार न लावता समर्थांनी दाखवलेला मार्ग लोकांपर्यंत पोचवणे हीच संस्कृतीरक्षणाची खरी लढाई आहे.

– श्री. विनित मोरे, संपादक, ‘आपला माणूस’. (८.११.२०२५)